इराणच्या मदतीने रशियाचा अराजकता माजवण्याचा कट असल्याचा दावा ब्रिटनच्या देशांतर्गत गुप्तचर सेवेच्या प्रमुखांनी केला आहे. ब्रिटनने युक्रेनला दिलेल्या पाठिंब्यामुळे रशियाच्या गुप्तचर यंत्रणेचा उद्देश ब्रिटनमध्ये “अराजकता” निर्माण करणे हा आहे. मंगळवारी, केन मॅककलम यांनी सांगितले की एमआय 5 ने जानेवारी 2022 पासून इराण समर्थित 20 कट हाताळले आहेत. या कटांमुळे ब्रिटिश नागरिक आणि इथल्या रहिवाशांना संभाव्य प्राणघातक धोका निर्माण झाला आहे.
मॅककलम यांच्या दाव्यानुसार ब्रिटनमध्ये अराजकता माजवण्याचे काम करण्यासाठी रशिया आणि इराण यांनी गुन्हेगार आणि खाजगी अधिकाऱ्यांची मदत घेतली आहे.
“निरंतर अशांतता कृती”
मॅककलम म्हणाले की, ब्रिटनमध्ये यानंतरच्या काळात रशियाकडून देशात “सातत्याने विविध प्रकारे आक्रमण केले जाण्याची अपेक्षा केली पाहिजे.” त्यांनी इशारा दिला की रशियाची लष्करी गुप्तचर संस्था जीआरयू ब्रिटनच्या रस्त्यांवर “अशांतता निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील” आहे. “आम्ही जाळपोळ, तोडफोड आणि बरेच काही पाहिले आहे,” असेही ते म्हणाले.
इराणबाबत मॅककलम म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत कटकारस्थानांची “गती आणि प्रमाण अभूतपूर्व” होते. मध्यपूर्वेतील घटनांमुळे ब्रिटनमध्ये इराण समर्थित वाढत्या आक्रमणाच्या धोक्याकडे एमआय 5 ने आपले “पूर्ण लक्ष” केंद्रीत केले आहे.
मार्च 2017 पासून, एमआय 5 आणि पोलिसांनी शेवटच्या टप्प्यात 43 हल्ल्यांचे कट उधळून लावले आहेत, ज्यामुळे “असंख्य प्राण” वाचवता आले आहेत, असे मॅककलम म्हणाले. काही कटांचे सूत्रधार सामूहिक हत्येचे नियोजन करण्याच्या शेवटच्या टप्प्यात होते. तिथे ते बंदुका आणि स्फोटके मिळवण्याचा प्रयत्न करत होते, असेही मॅककलम म्हणाले.
अति उजव्या विचारसरणीची विचारधारा
आपल्या विस्तृत भाषणात, मॅककलम यांनी दहशतवादासाठी तपास करताना संशयित मुलांमध्ये “अश्चर्यकारक” पणे अति उजव्या विचारसरणीच्या भूमिकेत वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदवले. संभाव्य दहशतवादी सहभागासाठी एमआय 5द्वारे तपास करत असलेल्यांपैकी 13 टक्के मुले ही 18 वर्षाखालील अहेत. हा आकडा “गेल्या तीन वर्षात तिप्पट झाल्याचे” ते म्हणाले.
मॅककलम यांच्या मते या वाढीमागील “सर्वात मोठा घटक” म्हणजे इंटरनेट आहे. तरुणांना त्यांच्या बेडरूममधून “प्रेरणादायी आणि निर्देशात्मक साहित्य” अत्यंत सहजपणे मिळू शकतं हे लक्षात घेऊन ते म्हणाले की, एमआय 5 च्या तपासात तरुणांना ऑनलाइन अतिरेकीपणाचे आमिष दाखवल्याची “खूप जास्त प्रकरणे” दिसून येत आहेत. त्यांनी यासाठी ‘कॅनी’ इंटरनेट मिम्सच्या वापराकडे लक्ष वेधले.
“अति उजव्या विचारसरणीच्या दहशतवादाकडे विशेषत: तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात झुकतो,” असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. ऑनलाइन संस्कृतीची कशाप्रकारे विशिष्ट प्रपोगंडा चालवते याची सखोल माहिती त्यांच्याकडे आहे. मॅककलम पुढे म्हणाले की, अति उजव्या विचारसरणीची एकच एक सुसंगत विचारधारा नाही, ज्यामुळे त्यांच्या सभासदांची संख्या वाढली आहे.
ब्रिटनमध्ये दहशतवादी हल्ले होण्याची धोक्याची पातळी “लक्षणीय” आहे, म्हणजे हल्ला होण्याची दाट शक्यता आहे. इस्लामिक स्टेट गटाने “दहशतवादाची निर्यात करण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू केले आहेत” असेही मॅककलम यांनी नमूद केले. ते म्हणाले की, गेल्या वर्षात शत्रू राष्ट्रांकडून करण्यात आलेल्या विविध कटांच्या चौकशीत 48 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)