मध्यपूर्वेतील इस्रायल-गाझा युद्धाच्या संभाव्य विस्तारामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी मंगळवारी दिला.
नागरिकांचा जीव जाणे “अक्षम्य”
त्यांनी या प्रदेशातील जीवितांची झालेली प्रचंड हानी “अक्षम्य” असल्याचे म्हटले. रॉयटर्स नेक्स्ट न्यूजमेकरला दिलेल्या मुलाखतीत बोलताना बंगा म्हणाले की, या युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर आतापर्यंत तुलनेने कमी परिणाम झाला आहे.
ते म्हणाले की, संघर्षाचा होणारा संभाव्य विस्तार, निर्यातदारांसह जागतिक विकासात मोठे योगदान देणाऱ्या इतर देशांवर परिणम करेल.
“सर्वप्रथम, मला वाटते की आतापर्यंत झालेली अविश्वसनीय जीवितहानी-महिला, मुले, इतर नागरिक – सर्व बाजूंनी अक्षम्य आहे,” असे बंगा म्हणाले.
युद्धाचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम
“या युद्धाचा आर्थिक परिणाम किती होतो हे या युद्धाची व्याप्ती किती वाढते यावर बऱ्यापैकी अवलंबून आहे”.
“जर युद्धाची व्याप्ती प्रादेशिक स्तरावर पसरली तर तो एक आणखी महत्त्वाचा मुद्दा बनतो कारण आता हे युद्ध अशा ठिकाणी पोहोचले आहे जो प्रदेश जागतिक अर्थव्यवस्थेत खूप मोठे योगदान देतो. फक्त डॉलरच्याच बाबतीत नाही, तर खनिजे, धातू आणि तेल तसेच यासारख्या इतरही बाबतीत.”
युद्धविरामासाठी अधिक प्रयत्न करणे
काही पाश्चिमात्य देश इस्रायल, लेबनॉन तसेच गाझामध्ये युद्धबंदी व्हावी यासाठी दबाव आणत आहेत.
इस्रायलचा सर्वात जवळील सहकारी असलेल्या अमेरिकेने सातत्याने इस्रायलला आपला पाठिंबा व्यक्त केला असून त्याला क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा आणि सैन्य यांचा पुरवठा करत आहे.
7 ऑक्टोबर रोजी दहशतवादी गट हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने हमासविरुद्ध युद्ध सुरू केले. इस्रायली आकडेवारीनुसार या हल्ल्यात 1हजार 200 इस्रायली नागरिक मारले गेले तर सुमारे 250 लोकांना गाझाला ओलीस म्हणून ठेवण्यात आले.
गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायलकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 42 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात लेबनॉनमध्ये झालेल्या इस्रायली हल्ल्यांमध्ये किमान 2 हजार 350 लोक मारले गेले आहेत तर सुमारे 11 हजार जखमी झाले आहेत. याशिवाय 12 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.
इस्रायली हल्ल्यांमुळे गाझात झालेले नुकसान
गाझावरील इस्रायली हल्ल्यांमुळे झालेले नुकसान आता कदाचित 14 ते 20 अब्ज अमेरिकन डॉलर्स या श्रेणीत आहे. आता इस्रायलने दक्षिण लेबनॉनवर केलेल्या बॉम्बहल्ल्यांनंतर झालेल्या विध्वंसामुळे त्या प्रादेशिक नुकसानीत भर पडेल, असे बंगा म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, जागतिक बँकेने पॅलेस्टिनी प्राधिकरणाला या संकटाचे व्यवस्थापन करण्यात मदत करण्यासाठी 300 दशलक्ष डॉलर्सची मदत दिली आहे – जी सर्वसाधारणपणे दिली जाते त्याच्या सहापट अधिक आहे.
मात्र तरीही आवश्यक असलेल्या “मोठ्या मदतीच्या” तुलनेत ही मदत लहानच आहे, अशी टिपण्णी त्यांनी केली.
तज्ज्ञांचा गट
जागतिक बँकेच्या अध्यक्षांनी सांगितले की, बहुपक्षीय विकास बँकेने जॉर्डन, इस्रायल, पॅलेस्टाईन, युरोप, अमेरिका आणि इजिप्तमधील तज्ज्ञांचा एक गट तयार केला आहे, जेणेकरून शांतता करार झाला तर पुढच्या काळात अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी कशी पावले उचलली जाऊ शकतात याचा अभ्यास करता येऊ शकेल.
तृप्ती नाथ
(रॉयटर्स)