व्हिएतनामसोबत व्यापारी संबंध मजबूत करण्याचे शी जिनपिंग यांचे आवाहन

0
जिनपिंग

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी व्हिएतनामची राजधानी हनोई येथे आग्नेय आशियातील तीन देशांच्या दौऱ्याला सुरुवात करताना अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे उद्भवलेल्या परिस्थिती दरम्यान व्हिएतनामशी संबंध मजबूत करण्याचे आवाहन केले.

अनेक आठवड्यापासून नियोजित असलेला हा दौरा बीजिंगला अमेरिकेच्या 145 टक्के आयात शुल्काच्या जाचक नियमांचा सामना करावा लागत असताना सुरू झाला आहे. तर व्हिएतनाम अमेरिकेने लादलेल्या अन्यायकारक 46 टक्के शुल्कामध्ये कपात करण्यासाठी वाटाघाटी करत आहे, जे कदाचित जागतिक स्थगितीची 90 दिवसांची मुदत संपल्यानंतर जुलैमध्ये लागू होईल.

“दोन्ही बाजूंनी उत्पादन आणि पुरवठा साखळीतील सहकार्य बळकट केले पाहिजे,” असे शी जिनपिंग यांनी सोमवारी त्यांच्या आगमनापूर्वी व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नांदन या वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हरित अर्थव्यवस्थेवर हनोईसोबत अधिक व्यापार आणि दृढ संबंध प्रस्थापित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

वॉशिंग्टनच्या दबावामुळे, व्हिएतनाम चीनबरोबरच्या काही व्यापारावरील नियंत्रण कडक करत आहे, जेणेकरून ‘मेड इन व्हिएतनाम’ लेबल असलेल्या अमेरिकेला निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंचे पुरेसे अतिरिक्त मूल्य देशाला मिळत आहे याची खातरजमा करता येईल.

व्हिएतनाम हे आग्नेय आशियातील एक प्रमुख इंडस्ट्रियल आणि असेंब्ली हब आहे. त्याची बहुतांश आयात चीनमधून होते तर अमेरिका ही त्याची मुख्य निर्यात बाजारपेठ आहे. हा देश अमेरिकेसाठी इलेक्ट्रॉनिक्स, पादत्राणे आणि कपड्यांचा एक महत्त्वाचा स्रोत आहे.

या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत हनोईने बीजिंगमधून सुमारे 30 अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीच्या वस्तूंची आयात केली, तर वॉशिंग्टनला त्याची निर्यात 31.4 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती, असे व्हिएतनामच्या सीमाशुल्क आकडेवारीवरून दिसून येते. यामुळे चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंचे मूल्य आणि वॉशिंग्टनला होणाऱ्या निर्यातीच्या चढउतारांशी जवळून जुळणाऱ्या दीर्घकालीन प्रवृत्तीला दुजोरा मिळतो.

रेल्वे लिंक्स

शी जिनपिंग 14 ते 15 एप्रिल दरम्यान व्हिएतनामला आणि 15 ते 18 एप्रिल दरम्यान मलेशिया आणि कंबोडियाला भेट देतील. त्यांनी अनुक्रमे नऊ आणि 12 वर्षांपूर्वी कंबोडिया आणि मलेशियाला शेवटचा दौरा केला होता.

शी जिनपिंग यांच्या 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत झालेल्या दुसऱ्या व्हिएतनाम दौऱ्याचा उद्देश, ट्रम्प प्रशासनाने लादलेले दर टाळण्यासाठी चीनमधील उत्पादकांनी दक्षिणेकडे कूच केल्यामुळे अलीकडच्या वर्षांत कोट्यवधी डॉलर्सची चिनी गुंतवणूक मिळालेल्या धोरणात्मक शेजाऱ्याशी संबंध दृढ करणे हा आहे.

दोन कम्युनिस्ट राजवट असलेले देश अनेक क्षेत्रांतील सुमारे 40 करारांवर स्वाक्षऱ्या करणार आहेत, असे व्हिएतनामचे उपपंतप्रधान बुई थान सोन यांनी शनिवारी सांगितले.

व्हिएतनामचे सर्वोच्च नेते टू लॅम यांनी सोमवारी राज्य माध्यमांवर प्रकाशित केलेल्या एका लेखात म्हटले आहे की हनोईला संरक्षण, सुरक्षा आणि पायाभूत सुविधांमध्ये, विशेषतः रेल्वे लिंक्सवर सहकार्य वाढवायचे आहे.

हे करार बंधनकारक असतील का आणि त्यात आर्थिक बांधिलकी समाविष्ट असेल की नाही हे मात्र स्पष्ट नव्हते.

दोन्ही देशांदरम्यान नवीन रेल्वे बांधण्यासाठी चिनी कर्जाचा वापर करण्यास व्हिएतनामने सहमती दर्शविली आहे, जे एक मोठे आत्मविश्वास निर्माण करणारे पाऊल आहे ज्यामुळे द्विपक्षीय व्यापार आणि संपर्कांना चालना मिळेल.

मात्र, अद्याप कोणताही कर्ज करार जाहीर करण्यात आलेला नाही.

बीजिंग आपल्या कॉमॅक विमानांसाठी खरेदीदार म्हणून व्हिएतनामकडे बघत आहे, कारण  आतापर्यंत चीनला परदेशी खरेदीदार शोधण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला आहे.

रॉयटर्सने पाहिलेल्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेनुसार, रविवारी व्हिएतनामची बजेट विमान कंपनी व्हिएतजेट व्हीजेसीएचएम आणि कॉमॅक यांनी हनोई येथे सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

Vietjet’s livery आणि चीनच्या चेंगडू एअरलाइन्सचा लोगो असलेले एक कॉमॅक सी909 प्रादेशिक विमान सोमवारी हनोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे करण्यात आले होते.

कराराचा आशय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही, परंतु रॉयटर्सने गेल्या आठवड्यात दिलेल्या वृत्तानुसार कराराच्या मसुद्यांतर्गत, व्हिएतजेट दोन देशांतर्गत मार्गांवर चेंगडू एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांद्वारे चालवली जाणारी दोन कॉमॅक सी909 विमाने भाड्याने घेईल.

मजबूत आर्थिक संबंध असूनही, दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त सीमांवरून या दोन्ही देशांमध्ये वारंवार तणाव निर्माण होतो.

आयातशुल्क टाळण्यासाठी व्हिएतनामने अमेरिकेला दिलेल्या सवलतींमुळे चीनचा संताप होऊ शकतो, कारण त्यात एलोन मस्कची स्टारलिंक उपग्रह संप्रेषण सेवा आग्नेय आशियाई देशात तैनात करणे, तसेच मूळ नियमांवरील संभाव्य फसवणुकीवरून चीनबरोबरच्या काही व्यापारावर कारवाई करणे समाविष्ट आहे.

अलिकडच्या काही महिन्यांत व्हिएतनामने अनेक चिनी पोलाद उत्पादनांवर अँटी-डंपिंग शुल्क देखील लादले आहे.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 


Spread the love
Previous articleलांब किनारा, उच्च धोका: अंमली पदार्थविरोधी लढ्यात गुजरात ठरतंय संघर्षबिंदू
Next articleइराणचे परराष्ट्र मंत्री, इराण-अमेरिका चर्चेसाठी रशियाशी सल्लामसलत करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here