शी जिनपिंग यांना प्रादेशिक मुद्द्यांवर कोणतीही लवचिकता दाखवणे खूप कठीण वाटते, असे आपले निरीक्षण असल्याचे अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे मुत्सद्दी कर्ट कॅम्पबेल यांनी बुधवारी सांगितले. चीनबरोबरचे तणावपूर्ण संबंध सुधारण्याच्या भारताच्या प्रयत्नांसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत. अमेरिका, भारत आणि चीन यांच्यातल्या संबंधांबद्दल त्यांनी आपले मत व्यक्त केले. विशेषतः भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मंगळवारी केलेल्या वक्तव्याला कॅम्पबेल उत्तर देत होते. दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर जयशंकर म्हणाले होते की, भारत आता चीनबरोबरच्या सीमाप्रश्नांवर तोडगा काढण्यावर लक्ष केंद्रित करेल.
अमेरिकेचे उपसचिव कर्ट कॅम्पबेल यांना वॉशिंग्टन थिंक टँकमध्ये जयशंकर यांच्या वक्तव्यांबद्दल प्रश्न विचारले गेले. “सत्य हे आहे की जेव्हा जेव्हा दोन देश तणाव कमी करण्यासाठी काही प्रमाणात समान उत्तरे शोधू शकतात, तेव्हा मला वाटते की आपण त्याचे समर्थन केले पाहिजे”, असे मत त्यांनी व्यक्त केले. “मला वाटते की आपण भारतीयांना चर्चेसाठी शुभेच्छा देऊया”, असेही ते पुढे म्हणाले. भारताबरोबरच्या आपल्या द्विपक्षीय संबंधांबद्दल अमेरिकेला “खूप आत्मविश्वास असून ते सुस्थितीत” असल्याचे सांगत “आणि आम्हाला ते पुढे सुरू ठेवायचे आहेत,” असेही ते म्हणाले. चीनच्या वाढत्या सामर्थ्याला विरोध करण्यासाठी भारताशी संबंध वाढवण्याचे अमेरिकेचे प्रयत्न कॅम्पबेल यांच्याच नेतृत्वाखाली झाले आहे.
पुढील आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांच्यासोबत आपण भारत भेटीवर जात असल्याचे कॅम्पबेल यांनी सांगितले. “अनेक क्षेत्रांमधील समन्वय वाढवण्यासाठी” असे या भेटीमागचे प्रयोजन त्यांनी स्पष्ट केले. “मला वाटते की आम्हाला या भागीदारीबद्दल खूप चांगले वाटत आहे,” असे सांगत ते पुढे म्हणाले, “चीन आणि भारत यांच्यात काही रचनात्मक समस्या आहेत ज्या मोकळेपणाने सोडवणे कठीण असेल.” कॅम्पबेल यांचा असा विश्वास आहे की चीनबरोबरच्या कोणत्याही सलोख्यासाठी किंवा संबंधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्यासाठी, चीनची वादग्रस्त सीमांबद्दल जी भूमिका आहे त्यामध्ये बदल होईल ही भारताची अपेक्षा आहे. “शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली घडणाऱ्या ज्या काही गोष्टी आम्ही पाहिल्या आहेत त्यानुसार प्रादेशिक बाबींवर तोडगा काढणे किंवा उत्तर शोधणे यासाठी मला वाटते की चीनसाठी कोणतीही लवचिकता दाखवणे किंवा समान पार्श्वभूमी शोधण्याची इच्छा दाखवणे फार कठीण असल्याचे आपले निरीक्षण आहे असेही त्यांनी नमूद केले.
अमिताभ रेवी
(रॉयटर्स इनपुट्ससह)