खासगी क्षेत्राची आघाडी: अंदाजपत्रकात १.४ अब्ज डॉलरची तरतूद
दि. २८ मार्च: दोन वर्षांहून अधिक काळ बलाढ्य रशियाच्या आक्रमणाशी युक्रेन झुंजत आहे. युद्धाच्या या धामधुमीच्या काळात युक्रेनच्या संरक्षण उद्योगाने मात्र कात टाकली आहे. गेल्या दोन वर्षांत युक्रेनमधील खासगी क्षेत्रातील संरक्षण उद्योगाने देशाच्या एकूण संरक्षण उत्पादनातील ८० टक्के वाटा उचलला आहे.
रशियाशी दोन हात करीत असलेल्या युक्रेनला युद्धाच्या सुरुवातीच्या काळात अमेरिका आणि युरोपमधील देशांनी व ‘नाटो’च्या सदस्यांनी शस्त्र व दारूगोळ्याची मदत केली. मात्र, युद्ध खेचले जाऊ लागले, तशी ही मदत पुरविणे अमेरिकेलाही जड जाऊ लागले. त्यामुळे शस्त्रे व दारुगोळ्याचा पुरवठा व मागणी देशांतर्गत उत्पादकांकडूनच भागविली जावी, या विचाराने युक्रेनने संरक्षण क्षेत्रातील खासगी उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदा चालू वर्षाच्या, २०२४च्या अंदाजपत्रकात युक्रेनने देशांतर्गत शस्त्रनिर्मिती उद्योगांसाठी घसघशीत तरतूद केली आहे. त्याचबरोबर देशाच्या एकूण संरक्षण अंदाजपत्रकातही १.४ अब्ज डॉलर इतकी वाढ करण्यात आली आहे. युद्ध सुरु होण्यापूर्वी असलेल्या अंदाजपत्रकीय तरतुदीपेक्षा ही तरतूद २० पटींनी जास्त आहे.
युक्रेनचे सरकारी संरक्षण उत्पादन क्षेत्र सध्या अडखळतच चालले आहे. आर्थिक व मनुष्यबळाचा तुटवडा ही त्यांच्यासमोरची मोठी अडचण आहे. त्यामुळे आत्मविश्वासाने भरलेले खासगी क्षेत्र युद्ध साहित्याची वाढती गरज भागविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. परिणामी खासगी क्षेत्राकडून करण्यात येणारी शस्त्रखरेदी मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यांनी सरकारी उद्योगांची या क्षेत्रातील मक्तेदारी मोडून काढली आहे. या उद्योगातून निर्मित प्रत्येक नवे क्षेपणास्त्र बल्गेरिया अथवा रोमानियाला पाठविले जाते. तेथे त्यात स्फोटके भरून ते काही दिवसातच युद्ध आघाडीवर तैनात केले जाते. या वेगाने ही शस्त्रनिर्मिती सुरु आहे. युक्रेनच्या बरोबर विरुध्द रशियाची परिस्थिती असून, तेथे संरक्षण उत्पादनाशी संबंधित उद्योग पूर्णपणे सरकारच्या ताब्यात आहे.
युक्रेनच्या शस्त्रनिर्मिती उद्योगात झालेल्या या वाढीला एका अर्थाने अमेरिकाही जबाबदार आहे. अमेरिकेने आश्वासित केलेली ६०अब्ज डॉलरची मदत युक्रेनला देण्यात अमेरिकी कॉंग्रेसने आडकाठी आणल्यामुळे युक्रेनला देशांतर्गत पर्याय शोधावा लागला. आता कॉंग्रेसला सुटी असल्यामुळे या मदतीसाठी युक्रेनला किमान दोन आठवडे तरी वाट बघावी लागणार आहे. मात्र, देशांतर्गत उत्पादन कैकपटीने वाढले आहे. उदाहरणार्थ, युद्धापूर्वी असलेल्या तोफगोळ्यांच्या उत्पादांच्या तुलनेत युद्धकाळात ४० पतीने वाढ झाली आहे, तर तोफांसाठी लागणाऱ्या दारुगोळ्याचे उत्पादन ३० पटींनी वाढले आहे. संरक्षण अंदाजपत्रकातील तरतुदी व्यतिरिक्त तंत्रज्ञान विकासासाठी सरकारने एक अब्ज डॉलरचा निधी दिल्याने ड्रोन तंत्रज्ञानावरील ‘स्टार्ट-अप’मध्ये मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. या क्षेत्रात आता सुमारे दोनशे कंपन्या कार्यरत आहेत.
असे असले तरी, या उद्योगांसमोर प्रत्यक्ष लढणाऱ्या सैनिकाची वाढती मागणी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे. आर्थिक आणि मनुष्यबळ कमतरता ही प्रमुख अडचण आहे. रशियाच्या संरक्षण उद्योगाशी त्यांना उत्पादनाचा वेग राखण्याची स्पर्धा करावयाची आहे. युक्रेनचा एक चतुर्थांश भाग सध्या रशियाच्या ताब्यात आहे आणि त्याच्या आक्रमणाचा वेग वाढतच आहे. सुमारे एक हजार किलोमीटरच्या युद्ध आघाडीवर रशियाचा जोर आहे. ही परिस्थिती सैनिकांचे मनोबल खचविणारी असली, तरी संरक्षण उद्योगातील यशामुळे थोडी उभारी मिळेल, अशी चिन्हे आहेत.
सुब्रत नंदा
(‘एपी’च्या ‘इनपुट्स’सह)