हवाईदलाच्या गोरखपूर व सरसावा हवाईतळांवर ‘प्रिडेटर ड्रोन’ तैनात करणार
दि. ०६ मे: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी लष्कर आणि हवाईदल संयुक्तपणे काम करणार असुन, त्यासाठी उत्तरप्रदेशातील गोरखपूर आणि सरसावा येथील हवाईदलाच्या तळांवर ‘एमक्यू-९बी’ ही ‘प्रिडेटर ड्रोन’ तैनात करण्यात येणार आहेत. यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील लडाख ते अरुणाचलप्रदेश या टप्प्यात चिनी हालचालींवर नजर ठेवणे शक्य होणार आहे.
सीमा टेहेळणी आणि मुख्यतः प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून सुरु असणाऱ्या हालचालींवर लक्ष्य ठेवण्यासाठी अमेरिकी कंपनीकडून सुमारे ३१ प्रिडेटर ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तिन्ही सैन्यादालांच्या स्तरावर या विषयी बोलणी सुरु असून, एकूण चार अब्ज डॉलरच्या या प्रस्तावासाठी प्रामुख्याने नौदलाकडून अमेरिकी कंपनीबरोबर बोलणी सुरु आहेत. या ३१ ड्रोन पैकी सागरी सुरक्षा आणि टेहेळणीसाठी नौदलाला १५ ड्रोन देण्यात येणार आहेत, तर लष्कर आणि हवाईदलासाठी प्रत्येकी आठ ड्रोन पुरविण्यात येणार आहेत, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. अमेरिकी कंपनीने भारताचा प्रस्ताव स्वीकारला असून, या ड्रोनसाठी आवश्यक काही सुटे भाग आणि शस्त्रप्रणाली भारतात स्वदेशी उद्योगांमार्फत विकसित करण्याचा कंपनीचा विचार आहे. या करारानुसार काही उपकरणांच्या देशांतर्गत निर्मितीसाठी भारतीय कंपन्यांकडे त्याच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरही करण्यात येणार आहे, असेही हा अधिकारी म्हणाला.
‘एमक्यू-९बी’ ‘प्रिडेटर ड्रोनला उड्डाण करण्यासाठी आणि उतरण्यासाठी मोठ्या धावपट्टीची गरज असते आणि अशी मोठी धावपट्टी हवाईदलाकडे उपलब्ध असल्यामुळे लष्कराची ड्रोन हवाईदलाच्या तळांवर तैनात करण्यात येणार आहेत,असेही या अधिकाऱ्याने सांगितले. ही ड्रोन ४० हजार फुटांच्या उंचीवरून उडू शकतात, तर सलग ३६ तास उड्डाण करण्याची त्यांची क्षमता आहे. या ड्रोनवर हेलफायर ही हवेतून-जमिनीवर मारा करण्यास सक्षम असलेली क्षेपणास्त्रे बसविण्यात आली असून, स्मार्ट-बॉम्बमुले ती अधिक घटक झाली आहेत. या ड्रोनचा वापर गस्ती, टेहेळणी आणि हेरगिरीसाठी करता येणार आहे. या ड्रोनमुळे हिंदी महासागर क्षेत्राची सागरी सुरक्षा व टेहेळणी, तसेच चीन व पाकिस्तान सीमेवर गस्ती आणि टेहळणी करण्याची भारताची क्षमता वाढण्याची शक्यता आहे. भारतीय किनारपट्टीपासून तीन हजार किलोमीटर पर्यंतच्या परिसरातील अतिशय स्पस्ष्ट छायाचित्रे घेण्याची याची क्षमता असल्याने चाचेगिरीविरोधी मोहिमासाठीही याचा उपयोग होणार आहे.
विनय चाटी
(वृत्तसंस्थांच्या ‘इनपुट्स’सह)