जनरल चौहान: चीनशी असलेला सीमावाद भारतासमोरचे मोठे आव्हान
दि. १९ मार्च: ‘जागतिक पटलावर एक महत्त्वाची सत्ता म्हणून चीनचा झालेला उदय हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, नैतिक चौकट नसलेली सत्ताकांक्षा मारक ठरते. त्यामुळे चीनच्या जागतिक सत्ताकांक्षेमुळे जागतिक सत्तासंतुलानाला धोका निर्माण झाला आहे. तसेच, चीनशी असलेला सीमावाद भारतासमोरचे मोठे आव्हान आहे,’ असे मत संरक्षणदल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केले. पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या ‘राइज ऑफ चायना अँड इट्स इम्प्लिकेशन्स फॉर द वर्ल्ड,’ या सुरक्षा विषयक परिसंवादात ते बोलत होते.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग, ‘सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज’ (कॅस) व ‘सेंटर फॉर चायना ॲनालिसिस अँड स्ट्रॅटेजी’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राइज ऑफ चायना अँड इट्स इम्प्लिकेशन्स फॉर द वर्ल्ड,’ या विषयावर तिसरा संरक्षण व सामरिक संवाद (डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक डायलॉग) आयोजित करण्यात आला होता. या वेळी जनरल चौहान यांच्यासह ‘सेंटर फॉर चायना ॲनालिसिस अँड स्ट्रॅटेजी’चे संचालक जयदेव रानडे, ‘सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज’चे (कॅस) संचालक एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त), विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, ‘स्ट्रॅटन्यूज ग्लोबल’ व ‘भारतशक्ती’चे मुख्य संपादक नितीन गोखले उपस्थित होते.
चीनच्या उदयामुळे जगासमोर उभ्या ठाकलेल्या प्रश्नांबाबत चर्चा करताना जनरल चौहान म्हणाले, ‘चीनच्या भूमिकेनुसार विद्यमान परिस्थितीत अथवा येत्या काळात आंतरराष्ट्रीय राजकारणातील समीकरणे बदलत आहेत किंवा बदलतील. चीन ही एक निद्रिस्त शक्ती आहे, ती जागी झाल्यास जगासमोर मोठी आव्हाने उभी राहतील, असे नेपोलियन म्हणाला होता. चीनचा जागतिक समुदायात सध्या असलेला व्यवहार पाहता नेपोलियनचे भाकीत किती खरे होते, याची प्रचीती येते. सध्या जग आशा एका वेगळ्या परिस्थितीचा सामना करीत आहे. जगातील सत्ता समीकरणे सातत्याने बदलत आहेत. जुन्या सत्ता मोडून पडत आहेत, नव्या उदयाला येत आहेत. अशा काळात लष्करी ताकद आणि आर्थिक प्रगती यांचाही समन्वय साधणे गरजेचे झाले आहे. लष्करी ताकद व आर्थिक क्षमतेच्या जोरावर जगातील समीकरणे बदलण्याचा चीनचा प्रयत्न आहे. त्यामुळे आपण सध्या राहतो, ते जग, व्यवस्था वाचविण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर उभे ठाकले आहे. नैतिक चौकट नसलेल्या सत्ताकांक्षेमुळे जागतिक शांतता, परस्पर साहचर्य, इतरांच्या सार्वभौमत्त्वाचा सन्मान, परस्परांच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप न करणे आशा बाबींवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय संबंधांची शिष्टसंमत परिमाणेही धोक्यात आली आहेत.’ या वेळी जनरल चौहान यांनी भारताची जागतिक राजकारणातील भूमिका, हिंदी महासागर क्षेत्र व इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील नौदलाची भूमिका, एक नाविक शक्ती म्हणून भारताचा उदय, चीनशी असलेला सीमावाद आदी विषयांवरही आपले विचार मांडले.
चीनकडून हायब्रीड युद्ध
दुसऱ्या सत्रात ‘स्ट्रॅटन्यूज ग्लोबल’ व ‘भारतशक्ती’चे मुख्य संपादक नितीन गोखले यांनी जयदेव रानडे यांच्याशी चीनचा उदय व त्याचा भारतावर होणारा परिणाम, चीन-रशिया, चीन-अमेरिका संबंध, भारत-चीन सीमावाद, चीनचे गलवानमधील फसलेले लष्करी साहस आधी विषयांवर जयदेव रानडे यांच्याशी संवाद साधला. तिसऱ्या सत्रात गोखले यांनी चीनकडून सुरु असलेल्या हायब्रीड युद्धाबाबतचे विवेचन केले. ‘विनिंग अ वॉर विदाऊट फायटिंग’ या तत्त्वाची मांडणी आपल्या विवेचनात केली. ‘प्रतिस्पर्धी देशातील वृत्तपत्रे, पत्रकारांना धमकावणे, लाच देणे, त्यांच्यावर दबाव टाकून आपल्याबद्दल चांगले मत तयार करणे, असे उद्योग चीन करीत असतो. त्याचे राजनैतिक अधिकारीही या उद्योगात समाविष्ट आहेत. त्या देशातील लोकशाहीचा वापर करून तेथील लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न चीन करीत असतो, हा त्यांच्या हायब्रीड युद्धाचा एक भाग आहे, असे गोखले यांनी सांगितले.
विनय चाटी