कृत्रिम बुद्धिमत्ता, ६ जी, मशीन लर्निंग अशा तंत्रज्ञानाचा समावेश
दि. १९ मार्च: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशीन लर्निंग, काँटम कॉम्प्युटिंग, ६ जी अशा संप्रेशणाच्या व संज्ञापनाच्या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा भविष्यातील युद्धात होणारा वापर अपरिहार्य आहे, याची जाणीव ठेवून, अशा युद्धाला सामोरे जाण्यासाठी या तंत्रज्ञानाचा लष्करी व व्यूहात्मक बाबीत करावयाच्या समावेशाची पडताळणी व या बाबत सहाय्य करण्यासाठी भारतीय लष्कराने ‘सिग्नल्स टेक्नॉलॉजी ईव्हॅल्युएशन अँड अडपटेशन ग्रुप,’ (एसटीईएजी) या नव्या विभागाची स्थापना केली आहे.
‘सिग्नल्स टेक्नॉलॉजी ईव्हॅल्युएशन अँड अडपटेशन ग्रुप,’ (एसटीईएजी) ही अशा प्रकारची लष्करातील पहिलीच रचना असून, अत्याधुनिक तंत्रज्ञान, त्याचा लष्करातील वापर करण्यासाठी योग्य संधी निवडणे व त्याचबरोबर या क्षेत्रातील सहकार्यासाठी शिक्षणसंस्था व उद्योगातील परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, हा या नव्या विभागाच्या निर्मितीमागचा मुख्य उद्देश आहे, असे लष्कराकडून या प्रसंगी सांगण्यात आले.
नेक्स्ट जेन’ तंत्रज्ञान निर्मितीसाठी सहकार्य
वायर व वायरलेस यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज, मोबाईल संज्ञापन, सॉफ्टवेअर तंत्रज्ञानावर आधारित रेडिओ, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम व त्या पलीकडे जात आवश्यक असलेले नवे तंत्रज्ञान वापरण्याच्या शक्यता तपासणे, संरक्षण दलांसाठी उपयुक्त सहकार्य संधी शोधणे, यासाठी हा विभाग काम करील, तसेच या तंत्रज्ञानाची तांत्रिक क्षमता तपासणे, त्याचे मूल्यमापन व विकास, माहिती व संज्ञापनातील नवकल्पना या सर्वांचा समावेश लष्करासाठी सुलभ करणे व समकालीन तंत्रज्ञान त्याच्याबरोबरीने विकसित करणे, हे मुख्य कार्य या विभागाला देण्यात आले आहे. या माध्यमातून शिक्षणसंस्था व उद्योग जवळ येतील, त्यांच्यात सहकार्य वाढीस लागेल व त्याच्या माध्यमातून स्टार्ट-अप इंडिया व आत्मनिर्भर भारत या दोन्ही योजनांना चालना मिळेल, असे हा अधिकारी म्हणाला. या मुळे या तंत्रज्ञानासाठी इतर देशांवर असलेले आपले अवलंबित्व संपेल व काही मोजक्या देशांच्या मक्तेदारीलाही चाप लागेल, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
सामरिक व्यूहात्मक महत्त्व
नव्या काळात युद्धाचे स्वरूप बदलत आहे. नवी आव्हाने समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नवे तंत्रज्ञान स्वीकारण्यास लष्कर किती सज्ज आहे. लष्कराची नव्या तंत्रज्ञानाच्या स्वीकाराची मानसिकता किती दृढ आहे, हे या नव्या विभागाच्या निर्मितीमुळे समोर आले आहे. या नव्या युद्धातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार अपरिहार्य असल्याचे मत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनीही व्यक्त केले होते. या मुळे आत्मनिर्भरता तर वाढीस लागेलच, त्याबरोबर तंत्रज्ञानाच्या वापराबाबत असलेली दरीही भरून निघेल असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
विनय चाटी