Wednesday, March 25, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi भारताबाबत पाकिस्तानचा अविवेकी दृष्टिकोन आणि राजनैतिक अधिकाऱ्यांवर होणारा परिणाम

भारताबाबत पाकिस्तानचा अविवेकी दृष्टिकोन आणि राजनैतिक अधिकाऱ्यांवर होणारा परिणाम

0
राजनैतिक

पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्यांबद्दल कायमच असे म्हटले जाते की, भारताबाबत ते जितकी अधिक कठोर भूमिका घेतील, तितकी जास्त त्यांना ‘सत्ताधाऱ्यांची’ (establishment) पसंती मिळण्याची शक्यता असते. कदाचित याच कारणामुळे, भारतात पाकिस्तानचे उच्चायुक्त (2014-17) म्हणून काम केलेल्या अब्दुल बासित यांनी दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील एका टीव्ही वृत्तवाहिनीवर हे विधान केले असावे:…

“जर कोणी आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर आम्ही कोणताही मागचापुढचा विचार न करता मुंबई आणि नवी दिल्लीवर हल्ला केलाच पाहिजे. त्यानंतर त्यांचे परिणाम काय होतील, ते आपण नंतर बघू. जर आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नाही आणि अमेरिकेने आपल्यावर हल्ला केला… (तसे होण्याची शक्यता नसली तरी)… तरीही जगाला हे माहित असले पाहिजे की, जर कोणी पाकिस्तानकडे वाकड्या नजरेने पाहिले… तर भारतावर हल्ला करण्याव्यतिरिक्त पाकिस्तानकडे दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही,” असे या राजनैतिक अधिकाऱ्याने म्हटले.

अर्थात, बासित आता निवृत्त होऊन बराच काळ लोटला आहे आणि कदाचित पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांशी—ज्यामध्ये ‘डीप स्टेट’चे (deep state) घटक, उदा. आयएसआय (ISI) यांचाही समावेश होतो—देखील आता त्यांचा कोणताही संबंध उरलेला नसावा. भारतात पाकिस्तानचे उच्चायुक्त होण्यापूर्वी पाकिस्तानमध्ये भारताचे उच्चायुक्त (2009-2013) असलेले शरत सभरवाल यांनी मात्र बासित यांच्या या विधानाला फारसे महत्त्व दिलेले नाही.

त्यांनी स्ट्रॅटन्यूजग्लोबलशी बोलताना सांगितले, “त्यांच्या कारकिर्दीच्या अखेरीस, ते स्वतःच्याच सहकाऱ्यांवर टीका करताना दिसत होते. अब्दुल बासित त्यांच्या व्यवस्थेत खरंतर कोणीही नाहीत. मला नाही वाटत की त्यांचे आता प्रस्थापित व्यवस्थेशी काही संबंध उरले आहेत.”

परंतु भारतावर टीका केल्याने पाकिस्तानात मोठी प्रतिष्ठा मिळते आणि बासित यांच्या मनात अजूनही काही महत्त्वाकांक्षा असू शकतात. रंजक बाब ही आहे की, बासित यांनी भारताला जी धमकी दिली आहे, ती कोणत्याही भारतीय हालचालीला प्रत्युत्तर म्हणून नव्हे; तर अमेरिकेकडून पाकिस्तानवर होणाऱ्या एका काल्पनिक हल्ल्यासंदर्भात आहे.

अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुख तुलसी गबार्ड यांनी सिनेट इंटेलिजन्स कमिटीला सांगितले आहे, “रशिया, चीन, उत्तर कोरिया, इराण आणि पाकिस्तान हे आण्विक आणि पारंपरिक पेलोडसह, नवीन, प्रगत किंवा पारंपरिक क्षेपणास्त्र वितरण प्रणालींच्या श्रेणीवर संशोधन आणि विकास करत आहेत, ज्यामुळे आपला देश त्यांच्या टप्प्यात येऊ शकतो,” यानंतर हा मुद्दा अचानक चर्चेत आला.

माजी राजदूत सभरवाल याबाबत असा युक्तिवाद करतात की, “अमेरिकेने अशी वक्तव्ये करण्याची ही पहिली वेळ नाही. मला वाटते की, पाकिस्तानी काही अधिक लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करण्याचा प्रयत्न करत असल्याची काही माहिती त्यांच्याकडे आहे. आणि जर ते खरे असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही, कारण ते ब्लॅकमेल करण्याचे एक साधन आहे.”

हे देखील लक्षात घेणे औत्सुक्याचे आहे की, गॅबार्ड यांनी जे काही मूल्यमापन करून आपले विचार व्यक्त केले, त्याआधी पाकिस्तानचे अमेरिकेसोबतचे संबंध अत्यंत बहरात होते. फील्ड मार्शल मुनीर यांना व्हाईट हाऊसकडून मिळालेली किमान तीन निमंत्रणे आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांची केलेली भरभरून प्रशंसा, ही याचीच साक्ष होती. याहूनही अधिक रंजक बाब म्हणजे, पाकिस्तानने सौदी अरेबियासोबत केलेल्या संरक्षण कराराबाबत अमेरिकेने चकार शब्दही काढलेला नाही; या करारामध्ये अणुशस्त्रांच्या साहाय्याने संरक्षण पुरवण्याचाही समावेश असल्याची चर्चा आहे.

सौदी विश्लेषक सलमान अल-अन्सारी यांनी कॅनडाच्या ‘CBC News’ ला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “जर सौदींनी आपल्या संपूर्ण ताकदीनिशी युद्धात उतरण्याचा निर्णय घेतला, तर इराणचेच सर्वाधिक नुकसान होईल; कारण सौदी अरेबिया पाकिस्तानसोबतचा आपला द्विपक्षीय संरक्षण करार कार्यान्वित करेल. आपण अक्षरशः असे म्हणू शकतो की, सौदी अरेबियावर एक ‘अणुछत्र’ (nuclear umbrella) विस्तारलेले आहे.”

ही बाब भारताला नक्कीच रुचणारी नाही, परंतु या संदर्भात सध्या काहीही करण्यास भारत कदाचित असमर्थ ठरू शकतो. असे नाही की भारताला सौदींसोबत कोणत्याही संघर्षाची भीती वाटते; उलट, सौदी हे भारतासाठी ऊर्जेचे (इंधनाचे) प्रमुख पुरवठादार आहेत आणि मोठ्या संख्येने भारतीय नागरिक तिथे वास्तव्य करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.

परंतु, पाकिस्तानचे भारताविषयीचे अविवेकी वेड त्याला एक ‘अनिश्चित’ घटक बनवते. अमेरिकेकडून हल्ला झाल्यास भारताला लक्ष्य करण्याबाबत बासित यांनी मांडलेले मुद्दे याच दृष्टिकोनातून पाहिले पाहिजेत. पाकिस्तान अमेरिकेचा सामना करू शकेल अशी आशा बाळगणे मुळातच अशक्य आहे; त्यामुळे, तो आपल्या द्वेषाचा मुख्य लक्ष्य असलेल्या भारतावरच हल्ला करून समाधान मानतो. भारताकडून नक्कीच प्रत्युत्तर दिले जाईल हे पाहता, या कृतीचा पाकिस्तानला काहीच फायदा होत नाही; तरीही, भारताविषयीची पाकिस्तानी मानसिकता अशी आहे की—जरी त्यातून काहीच साध्य होणार नसले—तरीही भारतावर हल्ला करणे हाच एक प्रकारचा ‘विजय’ मानला जाईल.

ऐश्वर्या पारीख  

+ posts
Previous articleरशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवण्यासाठी मोदी मॉस्कोला भेट देणार
Next articleपाकिस्तान जगातील सर्वाधिक प्रदूषित, भारतीय शहरांचाही यादीत समावेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here