Tuesday, August 4, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi मध्यपूर्वेत सैन्य तैनात केल्यानंतर ट्रम्प यांच्या मते इराणच्या नेते ‘अत्यंत समंजस’

मध्यपूर्वेत सैन्य तैनात केल्यानंतर ट्रम्प यांच्या मते इराणच्या नेते ‘अत्यंत समंजस’

0

अमेरिका आणि इराण यांच्यात “प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष” भेटीगाठी सुरू असून इराणचे नवीन नेते “अत्यंत समंजस” ठरले आहेत; असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा या प्रदेशात अमेरिकेचे आणखी सैनिक दाखल झाले असून तेहरानने आपण कोणत्याही प्रकारचा अपमान खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे.

तेहरान आणि वॉशिंग्टन यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावणाऱ्या पाकिस्तानने, गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले इराण युद्ध संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने येत्या काही दिवसांत “अर्थपूर्ण चर्चा” आयोजित करण्याची तयारी सुरू असल्याचे जाहीर केल्यानंतर, रविवारी ट्रम्प यांची ही विधाने प्रसिद्ध झाली आहेत.

“मला वाटते की आम्ही त्यांच्याशी एखादा करार करू; मला याची खात्रीच आहे. तरीही, आम्ही तसा करार न करणेही शक्य आहे,” असे ट्रम्प यांनी रविवारी संध्याकाळी ‘एअर फोर्स वन’ विमानातून वॉशिंग्टनच्या दिशेने प्रवास करत असताना पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सत्तांतर पूर्ण झाले?

अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बळी गेल्यानंतर, अमेरिकेने तेहरानमधील सत्तांतर आधीच घडवून आणले आहे, असे आपल्याला वाटत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले; मात्र, त्या अधिकाऱ्यांची जागा घेणारे त्यांचे वारसदार “समंजस” (reasonable) वाटत असल्याचे त्यांनी दोनदा नमूद केले.

28 फेब्रुवारी रोजी झालेल्या इस्रायलच्या पहिल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेल्यानंतर ज्यांच्या जागी त्यांचे पुत्र मोजतबा यांची नियुक्ती झाली.

हे युद्ध मध्य-पूर्वेत पसरले असून, त्यात हजारो लोक मारले गेले आहेत, ऊर्जा पुरवठ्यात आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यत्यय निर्माण झाला असून जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार म्हणाले की, रविवारी प्रादेशिक परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेत युद्ध लवकर संपवण्याचे मार्ग आणि इस्लामाबादमध्ये संभाव्य अमेरिका-इराण चर्चेवर विचारविनिमय झाला.

मध्यस्थ म्हणून पाकिस्तान?

ते म्हणाले, “सध्या सुरू असलेल्या संघर्षावर सर्वसमावेशक आणि चिरस्थायी तोडगा काढण्यासाठी, येत्या काही दिवसांत दोन्ही बाजूंमध्ये अर्थपूर्ण चर्चेचे आयोजन आणि सुलभता प्रदान करणे हा पाकिस्तानसाठी सन्मान असेल.” मात्र यासाठी अमेरिका आणि इराण उपस्थित राहण्यास सहमत झाले आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बाकेर घालीबाफ यांनी यापूर्वी अमेरिकेवर असा आरोप केला होता की, अमेरिका संभाव्य वाटाघाटींविषयी संदेश पाठवत असतानाच, दुसरीकडे जमिनीवरून आक्रमण करण्याची योजना आखत आहे. अमेरिकन सैनिक तैनात केले गेल्यास, त्याला प्रत्युत्तर देण्यास तेहरान सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

“जोपर्यंत अमेरिकन लोक इराणने शरणागती पत्करावी अशी अपेक्षा करत आहेत, तोपर्यंत आमचे प्रत्युत्तर हेच असेल की, आम्ही कोणत्याही प्रकारचा अपमान कदापि स्वीकारणार नाही,” असे त्यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या एका संदेशात म्हटले.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने मध्यपूर्वेमध्ये हजारो सैनिक रवाना केले असून, यामुळे ट्रम्प यांच्यासमोर जमिनीवरून लष्करी चढाई करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

एका इस्रायली अधिकाऱ्याने सांगितले की, वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यात संभाव्य चर्चा होण्यापूर्वी इराणवरील हल्ले कमी करण्याचा कोणताही इरादा नाही; तसेच, इस्रायल ज्यांना ‘लष्करी लक्ष्ये’ असे संबोधतो, त्यांच्यावर हल्ले करणे इस्रायलकडून सुरूच राहील.

अमेरिकेचे आणखी सैनिक दाखल

दोन लष्करी अधिकाऱ्यांचा हवाला देत ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने रविवारी दिलेल्या वृत्तानुसार, या प्रदेशात विशेष मोहिमांसाठी  (special operations) असणारे शेकडो जवान दाखल झाले आहेत. अमेरिकेच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी एका ‘अँफिबियस असॉल्ट शिप’द्वारे (जल-स्थलगामी हल्ला जहाज) आलेल्या हजारो ‘यू.एस. मरिन्स’च्या तुकडीव्यतिरिक्त ही अतिरिक्त कुमक आली आहे; ती दोन तुकड्यांपैकी पहिली तुकडी होती.

रविवारी प्रकाशित झालेल्या ‘फायनान्शियल टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी म्हटले की, त्यांना “इराणमधील तेलावर कब्जा करायचा आहे” आणि ते तेलाच्या निर्यातीचे प्रमुख केंद्र असलेले ‘खर्ग बेट’ ताब्यात घेऊ शकतात. खर्ग बेटाचा ताबा घेण्यासाठी जमिनीवरील लष्करी तुकड्यांची (ground troops) आवश्यकता भासेल.

या बेटावरूनच इराणच्या 90 टक्के तेलाची निर्यात हाताळली जाते; त्यामुळे हे बेट ताब्यात घेतल्यास अमेरिकेला इराणचा ऊर्जा व्यापार मोठ्या प्रमाणावर विस्कळीत करण्याची क्षमता प्राप्त होईल आणि यामुळे तेहरानच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव निर्माण होईल.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 

+ posts
Previous articleनेपाळ: माजी पंतप्रधान ओली अटकेत, परिस्थिती निष्काळजीपणे हाताळल्याचा आरोप
Next articleम्यानमारच्या लष्कर प्रमुखांची राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी