बांगलादेश आणि पाकिस्तानने, गुरुवारी सकाळी ढाकामध्ये परराष्ट्र सचिव पातळीवरील ‘फॉरेन ऑफिस कन्सल्टेशन (FOC)’ चर्चेला पुन्हा सुरुवात केली. तब्बल 15 वर्षांनंतर दोन्ही देशांमध्ये झालेला हा पहिला कूटनैतिक संवाद होता, ज्याद्वारे द्विपक्षीय संबंध नव्याने स्थापन करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.
ही चर्चा, गुरुवारी सकाळी सुमारे 10 वाजता, ‘स्टेट गेस्ट हाऊस पद्मा’ येथे सुरू झाली. यावेळी बांगलादेशचे परराष्ट्र सचिव एम. जशीम उद्दीन आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव आमना बलोच यांनी आपापल्या प्रतिनिधीमंडळांचे नेतृत्व केले.
राजकीय पार्श्वभूमीतील बदल
बांगलादेशातील अवामी लीग सरकार, 5 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या जनआंदोलनामुळे सत्तेवरून पायउतार झाले होते, त्यानंतर या नव्या कूटनैतिक संवादाचा प्रारंभ झाला. या चर्चेद्वारे ढाका आणि इस्लामाबादमधील संबंध सामान्य करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
FOC नंतर सचिव आमना बलोच, या बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस आणि परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसैन यांची भेट घेणार आहेत.
तसेच त्या संध्याकाळी ढाकामधील स्थानिक विचारमंचांचे सदस्य आणि पाकिस्तानी डायस्पोरा समुदायासोबत एका गोलमेज चर्चेतही सहभागी होणार आहेत.
या चर्चेपूर्वी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार, हे 27 आणि 28 एप्रिल रोजी ढाका येथे भेट देणार आहेत. ही गेल्या दशकातील पहिली उच्चस्तरीय भेट ठरणार आहे.
संबंध सुधारण्याचे प्रयत्न
बांगलादेशचे हंगामी प्रमुख मुहम्मद युनूस आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, यांच्यात मागील वर्षी दोन अनौपचारिक भेटी झाल्या होत्या, एक सप्टेंबर महिन्यात न्यूयॉर्कमध्ये UN महासभेच्या वेळी झाली होती आणि दुसरी डिसेंबरमध्ये कैरो येथे D-8 परिषदेच्यावेळी झाली होती. त्यानंतर परस्पर संबंध सुधारण्याच्या हालचालींना सुरुवात झाली.
तेव्हापासून बांगलादेशने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा निर्बंध सैल केले आहेत आणि थेट शिपिंग सेवा सुरू केली आहे. पाकिस्ताननेही सांस्कृतिक देवाणघेवाणी, व्यापार, पर्यटन आणि गुंतवणूक यामध्ये सहकार्य वाढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
“पाकिस्तानला बांगलादेशात आपल्या निर्यात वाढीची उत्तम संधी दिसते, विशेषतः जर उत्पादनांटची किंमत स्पर्धात्मक राहिली तर..” असे मत पाकिस्तानमधील बांगलादेशचे उच्चायुक्त इक्बाल हुसेन खान (जे या चर्चेसाठी सध्या ढाक्यामध्ये आहेत) यांनी व्यक्त केले. “पाकिस्तानला कापूस, साखर, तांदूळ आणि गहू या वस्तूंमध्ये विशेष रस आहे,” असेही ते म्हणाले.
द्विपक्षीय व्यापार
2023–24 या आर्थिक वर्षात बांगलादेशने पाकिस्तानकडे $61.98 दशलक्ष डॉलर्सची निर्यात केली, तर पाकिस्तानकडून $627.8 दशलक्ष डॉलर्सचा माल आयात केला.
इक्बाल हुसेन खान यांनी असेही सांगितले की, “जर वाहतूक खर्च कमी ठेवण्यात आले तर, पाकिस्तान हा अफगाणिस्तान आणि इराणमधून बांगलादेशकडील आयातीसाठी एक ट्रांझिट हब म्हणून काम करू शकतो.”
थेट हवाई संपर्क प्रस्थापित करण्यासाठीही चर्चा सुरू आहेत, ज्यामुळे परस्पर संबंध आणि पर्यटनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
याआधीची FOC चर्चा
2010 मध्ये झालेल्या याआधीच्या FOC मध्ये, 1971 च्या युद्धातील पाकिस्तानकडून माफी, युद्धभरपाई, अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे पुनर्वसन, 1971 पूर्वीच्या मालमत्तेचे वाटप आणि 1970 च्या चक्रीवादळानंतर मिळालेल्या परकीय मदतीच्या परतफेडीचे प्रश्न मांडले गेले होते.
परराष्ट्र धोरणातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, “सध्याचे संवाद सकारात्मक असले तरी, दीर्घकालीन संबंध मजबूत करण्यासाठी इतिहासाशी संबंधित काही प्रश्नांचे निराकरण करणे आवश्यक आहे.”
टीम स्ट्रॅटन्यूज