बंगळुरूमध्ये IPL विजय जल्लोषादरम्यान, क्रिकेट चाहत्यांमघ्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी (Bengaluru Stampede), बंगळुरू पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे, यामध्ये आयपीएलमधील क्रिकेट संघ- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा एक वरिष्ठ अधिकारी आणि एका कार्यक्रम व्यवस्थापन कंपनीतील तीन लोकांचा समावेश आहे. चेंगराचेंगरीच्या या घटनेत एकूण 11 जणांचा मृत्यू झाला असून 47 जखमी झाले असल्याची माहिती, माध्यमांनी दिली आहे.
दरम्यान, टीमच्या प्रवक्त्यांनी रॉयटर्सने केलेल्या प्रतिक्रियेच्या मागणीला तत्काळ उत्तर दिले नाही.
जीवघेणी चेंगराचेंगरी
टीम बंगळुरूने, पंजाब किंग्जविरुद्धच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून IPL चा 18वा सिझ जिंकला. त्यानंतर बुधवारी, चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजय जल्लोषासाठी मोफत पास वाटण्यात आले. संख्येवर मर्यादा असल्याचे संघाने आधीच स्पष्ट केले होते.
परंतु, मोफत पास नसलेले अनेक चाहते प्रवेशद्वारातून आत शिरण्याचा प्रयत्न करत असताना गोंधळ उडाला आणि मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली.
त्यानंतर फ्रँचायझीने ही घटना ‘दुर्दैवी’ असल्याचे म्हणत, मृत पावलेल्या 11 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली.
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, RCB चा एक वरिष्ठ अधिकारी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीतील तिघांना शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली. संघाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
गौतम गंभीर यांची प्रतिक्रिया
भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, यांनी गुरुवारी या प्रकारावर प्रतिक्रिया देत म्हटले की, “विजय साजरा करणे महत्त्वाचे आहे, पण कोणत्याही माणसाचे प्राण त्याहूनही महत्त्वाचे आहेत. जर आपण गर्दी नियंत्रण करू शकत नसू, तर अशा रोड शोचे आयोजन करूच नये.”
पोलीस आयुक्त निलंबित
या दुर्घटनेनंतर, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरू पोलीस आयुक्त बी. दयानंद यांना निलंबित केले आहे आणि CID चौकशीचे आदेश दिले आहेत.
हजारो चाहते स्टेडियमबाहेर जमा झाल्याने सुरक्षेची तयारी अपुरी पडली, हे प्राथमिक तपासात समोर आले आहे. संघटनांमधील समन्वयाचा अभाव आणि गर्दी नियंत्रणात ढिसाळपणा हेही कारण असल्याचे बोलले जात आहे.
राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबांना नुकसानभरपाई आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स आणि IBNS यांच्या माहितीसह)