23 एप्रिल रोजी, पाकिस्तान रेंजर्सकडून ताब्यात घेण्यात आलेला, भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान– पूर्णम कुमार शॉ, यांना बुधवारी पुन्हा भारताच्या ताब्यात देण्यात आले.
अटारी चेकपोस्टवर शॉला भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात सोपवण्यात आले.
बीएसएफच्या निवेदनात म्हटले आहे की, “आज सकाळी 10.30 वाजता कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ, यांना अटारी-वाघा सीमारेषेवर पाकिस्तानकडून बीएसएफने परत घेतले. 23 एप्रिल 2025 रोजी, सकाळी सुमारे 11:50 च्या सुमारास, ऑपरेशनल ड्युटीवर असताना, ते चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते आणि तेथे पाक रेंजर्सकडून त्यांना अटक करण्यात आली होती.”
“बीएसएफने सातत्याने पाकिस्तान रेंजर्ससोबत फ्लॅग मिटिंग्स घेतल्या आणि इतर संप्रेषण माध्यमांचा वापर करून प्रयत्न केले, त्यामुळे या जवानाच्या परताव्याची प्रक्रिया शक्य झाली,” असे निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे.
ही घटना, पाहलगाम हत्याकांडाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 23 एप्रिलला पंजाबमधील सीमेपलीकडे घडली, ज्यामध्ये 26 हिंदू पर्यटकांचा बळी गेला होता.
या हत्याकांडाचा जागतिक स्तरावर निषेध करण्यात आला. 2019 नंतरचा हा जम्मू-काश्मीरमधील पहिला मोठा दहशतवादी हल्ला होता.
या घटनेला प्रत्युत्तर देत, भारताने 7 मे रोजी “ऑपरेशन सिंदूर” सुरू केले, ज्यामध्ये भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान व पीओकेमधील ९ दहशतवादी केंद्रांवर निशाणा साधला.
पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांवर ड्रोन व क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणालीने हे सर्व धोके निष्फळ ठरवले.
या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तानच्या हवाई तळांवर आणि हवाई संरक्षण प्रणालींवर मोठे आघात केले.
भारताकडून पाकिस्तानी अधिकाऱ्याची हकालपट्टी
मंगळवारी, भारत सरकारने दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात कार्यरत असलेल्या एका पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्याला देशाबाहेर हाकलले, कारण त्याच्यावर गुप्तचर क्रियाकलापांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की: “दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात कार्यरत असलेला पाकिस्तानी अधिकारी, त्याच्या पदाला साजेशा नसलेल्या क्रियाकलापांमध्ये सहभागी असल्यामुळे, भारत सरकारने त्याला ‘पर्सोना नॉन ग्राटा’ घोषित केले आहे.”
“त्याला 24 तासांत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कार्यवाह अधिकाऱ्याला या संदर्भात ‘डेमार्श’ जारी करण्यात आले आहे.”
ही हकालपट्टी अशा काळात झाली आहे, जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढलेला आहे आणि एक नाजूक शस्त्रसंधी अस्तित्वात आली आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)