अमेरिकने भारताला, पाचव्या पिढीतील F-35 स्टेल्थ लढाऊ विमानांसह अन्य प्रगत शस्त्रे खरेदी करण्याबाबत दिलेल्या ऑफरविषयी, चीन आणि पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “या व्यवहारामुळे प्रादेशिक स्थिरता बाधित होऊ शकते आणि ‘लष्करी असंतुलन’ निर्माण होऊ शकते,” असा इशारा दोन्ही राष्ट्रांनी दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर, एक घोषणा केली की,”या वर्षापासून आम्ही भारतासोबतची लष्करी विक्री अनेक अब्ज डॉलर्सनी वाढवणार आहोत.” ते असेही म्हणाले की, “अखेर यानिमित्ताने भारताला F-35 स्टेल्थ फायटर पुरवण्याचा आमचा मार्ग मोकळा झाला आहे.”
जगातील सर्वात प्रगत लढाऊ विमानांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या- लॉकहीड मार्टिन F-35 ने, अलीकडेच बेंगळुरू येथे एरो इंडिया 2025 मध्ये भाग घेतला होता आणि त्याच्या अत्याधुनिक क्षमतेचे प्रदर्शन थक्क करणारे होते.
चीनची प्रतिक्रिया: “आशिया-पॅसिफिक हे भू-राजकीय खेळांचे मैदान नाही”
संभाव्य खरेदी व्यवहाराबाबत प्रतिसाद नोंदवत, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी, ‘आशिया-पॅसिफिकला जागतिक शक्ती संघर्षांच्या रणांगणात बदलण्यापासून सावध केले.’
“कोणीही चीनला आपसी संबंध आणि सहकार्याचा मुद्दा बनवू नये किंवा गटाचे राजकारण आणि संघर्ष भडकवण्याचा प्रयत्न करू नये. आशिया-पॅसिफिक हे शांतता आणि विकासाचे उत्कृष्ट उदाहरण आहे, ते भू-राजकीय खेळांचे मैदान नाही,” असे गुओ म्हणाले.
“अशा युती प्रादेशिक सुरक्षा वाढवण्याऐवजी कमी करतात,” असा दावा करत गुओ यांनी, या ‘विशेष गटबाजी’चा विरोध केला.
पाकिस्तानची चिंता: “लष्करी असमतोल वाढण्याची शक्यता”
पाकिस्ताननेही या प्रस्तावित कराराचा तीव्र विरोध दर्शवत, दक्षिण आशियातील स्थिरतेवर त्याचे परिणाम होण्याचा इशारा दिला. DAWN च्या म्हणण्यानुसार, “पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी सांगितले की, अशा शस्त्रास्त्र विक्रीमुळे ‘लष्करी असंतुलन वाढेल’ आणि ‘क्षेत्रातील धोरणात्मक स्थिरता कमी होईल’.
“दक्षिण आशियातील टिकाऊ शांततेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही पावले असहाय्य राहतील,” त्यांनी टिप्पणी केली आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांना “जमीन वास्तवापासून विभक्त झालेल्या एकतर्फी भूमिका” स्वीकारण्याऐवजी प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यांचा “संपूर्ण आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन” घेण्याचे आवाहन केले.
भारताची भूमिका: “प्रस्ताव सुरुवातीच्या टप्प्यात”
दरम्यान, या वाढत्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर भारताने स्पष्ट केले की, “F-35 विमानांचा करार अद्याप निश्चित झालेला नाही.” परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी शुक्रवारी माध्यमांना संबोधित करताना याची पुष्टी केली की, “कराराबाबतची चर्चा अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. परंतु मला वाटत नाही की, यासंदर्भात औपचारिक प्रक्रिया अद्याप सुरू झाली आहे.”
F-35 विमानांच्या संभाव्य विक्रीमुळे, दक्षिण आशियाचे धोरणात्मक परिदृश्य लक्षणीयरित्या बदलू शकते. कराराची चर्चा जसजशी पुढे जाईल, तसतसे चीन, पाकिस्तान आणि इतर प्रादेशिक प्रतिस्पर्ध्यांची मत-मतांतरे, इंडो-पॅसिफिकमधील संरक्षण गतिशीलतेचे भविष्य घडवतील.
टीम भारतशक्ती