भारतातील एअरस्पेस उत्पादन क्षमतेला मोठी चालना देत, फ्रान्सची एव्हिएशन कंपनी- दसॉ एव्हिएशन आणि भारतातील टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड (TASL) यांनी एक धोरणात्मक करार केला आहे. या भागीदारी कारारांतर्गत, दोन्ही कंपन्यांनी चार प्रॉडक्शन ट्रान्सफर करारांवर स्वाक्षरी केली असून, Rafale जेटच्या Fuselages चे उत्पादन भारतात करण्यात येणार आहे.
हा निर्णय ऐतिहासिक ठरतो, कारण यामुळे प्रथमच राफेल विमानाच्या फ्यूसेलाजचे उत्पादन फ्रान्सबाहेर, म्हणजेच भारतात होणार आहे. हा टप्पा भारत-फ्रान्स संरक्षण सहकार्याच्या वृद्धीचा संकेत देणारा असून, तो ‘मेक इन इंडिया’ तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांशी सुसंगत आहे.
हैदराबादमध्ये आधुनिक उत्पादन युनिट
या कराराअंतर्गत, TASL हैदराबादमध्ये एक अत्याधुनिक उत्पादन युनिट स्थापन करणार आहे. या युनिटमध्ये राफेलच्या महत्त्वाच्या स्ट्रक्चरल घटकांचे उत्पादन केले जाईल. यात मागील फ्यूसेलाजचे लेटरल शेल्स, संपूर्ण मागील भाग, मध्यवर्ती फ्यूसेलाज आणि पुढील विभाग यांचा समावेश आहे.
हे उत्पादन 2028 या आर्थिक वर्षात सुरू होईल. सुरुवातीला दोन संपूर्ण फ्यूसेलाज दरमहा तयार करण्याची क्षमता असणार आहे, ज्यामुळे दसॉ एव्हिएशनच्या जागतिक पुरवठा साखळीत, भारताचा वाटा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
दसॉ एव्हिएशनचे अध्यक्ष व CEO एरिक ट्रापिए म्हणाले की, “भारतात आमची पुरवठा साखळी बळकट करण्याच्या दृष्टीने ही भागीदारी निर्णायक ठरेल. TASL आणि अन्य भागीदारांमुळे राफेलचे उत्पादन वेगाने वाढेल आणि गुणवत्तेच्या आमच्या निकषांनुसार स्पर्धात्मक निकषांवरही ते टिकाव धरेल.”
तर, टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्सचे CEO आणि MD सुखरण सिंग म्हणाले की, “भारतामध्ये संपूर्ण राफेल फ्यूसेलाजचे उत्पादन करण्याची संधी देणे, हा आमच्यावरील दृढ विश्वास आहे. भारताने अत्याधुनिक आणि सक्षम एअरस्पेस उत्पादन प्रणाली निर्माण करण्याच्या दिशेने केलेल्या प्रगतीचे हे प्रतीक आहे.”
हा करार, दसॉ एव्हिएशनच्या भारतातील वचनबद्धतेस अधिक मजबूती देतो. याआधी 28 एप्रिल रोजी, भारत आणि फ्रान्स यांच्यात 26 राफेल मेरीन विमान खरेदीसाठी आंतर-शासकीय करार झाला होता. राफेल मेरीन, जो INS विक्रांत या स्वदेशी विमानवाहू नौकेवरून उड्डाण करेल, तो फ्रान्सबाहेरच्या कोणत्याही नौदलासाठी सेवा देणारा पहिलाच राफेल मेरीन ठरणार आहे.
या प्रगतीशील निर्णयामुळे, आधीच भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट झालेल्या 36 राफेल विमानांच्या ताफ्याला अधिक बळकटी येणार असून, यामुळे भारत-फ्रान्स संरक्षण भागीदारीचा भविष्यातील मार्ग अधिक मजबूत होणार आहे.
टीम भारतशक्ती