‘भारत ऑस्ट्रेलियासोबतच्या आपल्या भागीदारीला निर्णायक आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये विस्तारित करण्यासाठी पूर्णतः कटिबद्ध आहे,’ असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील व्यापक धोरणात्मक भागीदारीला 5 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, नवी दिल्लीतील ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भारत-ऑस्ट्रेलिया धोरणात्मक संबंधांची 5 वर्षे
जयशंकर यांच्यासोबत, ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान व संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस हे देखील उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, “गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांतील संबंधात ‘लक्षणीय वाढ’ झाली आहे.” ‘नवीन क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य विस्तारण्यासाठी नव्याने प्रयत्न करावेत,’ असे आवाहनही त्यांनी केले.
“आम्ही खनिजे, सायबर, तंत्रज्ञान, अंतराळ आणि क्रीडा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये, द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत,” असे मत एस. जयशंकर यांनी सांगितले. त्यांनी या क्षेत्रांना येत्या दशकात दोन्ही देशांसाठी अत्यावश्यक मानले.
ऑस्ट्रेलिया भारताचा सर्वात जवळचा भागीदार
जयशंकर यांनी, सामाजिक क्षेत्रांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरील धोरणात्मक समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. “क्वाड, ईस्ट एशिया समिट, इंडियन ओशन रिम असोसिएशन, संयुक्त राष्ट्रसंघ आणि फ्रान्ससोबतच्या त्रिपक्षीय गटासारख्या यंत्रणांद्वारे आम्ही सहकार्य वाढवत राहू,” असे त्यांनी सांगितले.
संपर्कांतील व्यापक परिवर्तनाची प्रचिती देताना, त्यांनी नमूद केले की, “फक्त एका दशकापूर्वी अशी सखोल आणि विस्तृत भागीदारी शक्य वाटली नसती. मात्र आज ऑस्ट्रेलिया हा आमचा सर्वात जवळचा राजकीय आणि सुरक्षा भागीदार आहे.”
‘विश्वास’ हीच भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांची नीव
गेल्या पाच वर्षांत, भारत आणि ऑस्ट्रेलियाने वार्षिक समिट, परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांचा 2+2 संवाद, तसेच व्यापार, शिक्षण, ऊर्जा आणि कौशल्यविकास क्षेत्रातील नियमित उच्चस्तरीय चर्चासत्रे यांना संस्थात्मक रूप दिले आहे.
या काळात झालेले महत्त्वाचे करार म्हणजे: आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार (ECTA), गतीशीलता व स्थलांतर भागीदारी करार, शैक्षणिक पात्रतेची परस्पर मान्यता, Work and Holiday आणि MATES व्हिसा कार्यक्रम.
याशिवाय, ऑस्ट्रेलियन विद्यापीठे आता भारतात आपले कँपस स्थापन करत आहेत.
एस. जयशंकर यांनी, भारत-ऑस्ट्रेलिया संरक्षण सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचेही नमूद केले. त्यांनी अलीकडील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दर्शवलेल्या एकात्मतेबद्दल आभार मानले.
भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन समुदायाची भूमिकाही त्यांनी अधोरेखित केली, जो आता 10 लाखांहून अधिक लोकसंख्येचा गट असून, दोन्ही लोकशाही देशांना एकमेकांशी जोडणारा ब्रीज बनला आहे.
“दोन्ही देशातील संबंध हे विश्वास, सन्मान आणि सामायिक भविष्यात्मक दृष्टीकोनावर आधारित असून, त्यांना अधिक मजबूतीने पुढे नेण्यासाठी आम्ही पूर्णतः कटिबद्ध आहोत,” असे जयशंकर यावेळी म्हणाले.
टीम स्ट्रॅटन्यूज