
रविवारी संध्याकाळी झालेल्या एका महत्त्वाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत, भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या महासंचालकांनी (DGMO) स्पष्ट इशारा दिला की: “ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही आणि पाकिस्तानकडून आणखी कोणत्याही प्रकारची चिथावणी दिल्यास त्याला जलद आणि जबरदस्त प्रत्युत्तर दिले जाईल.”
भारत आणि पाकिस्तान, यांच्यातील 100 तासांच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या देवाणघेवाणीत तात्पुरते खंड पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी, भारतीय सशस्त्र दलांनी पुष्टी केली की, 7 मे ते 10 मे दरम्यान, सीमेपलीकडून केलेल्या अचूक हल्ल्यात 35-40 पाकिस्तानी सैनिक आणि 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले.
‘तुम्ही उल्लंघन करा, आम्ही प्रत्युत्तर देतो’
सशस्त्र दलांनी पुष्टी केली की पाकिस्तानला हॉटलाइन संदेशाद्वारे औपचारिकपणे “सूचना” देण्यात आली होती, आणि इशारा दिला गेला होता की, ‘भविष्यात कोणत्याही युद्धबंदीचे उल्लंघन, मग ते आज रात्री असो किंवा काही दिवसांनंतर केले तर त्याला तीव्र प्रत्युत्तर दिले जाईल.’
युद्धविराम लागू झाल्यानंतर काही तासांतच, पाकिस्तानने अटींचे उल्लंघन करत, जम्मू-काश्मीरमध्ये – श्रीनगरजवळ आणि गुजरातच्या काही भागांमध्ये सीमापार गोळीबार आणि ड्रोन घुसखोरी सुरू केली.
संपूर्ण आश्चर्य, निर्णायक परिणाम
सैन्य ऑपरेशन्सचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले की, “त्यांना 10 मे रोजी, दुपारी 3.35 वाजता त्यांच्या पाकिस्तानी समकक्षांकडून फोन आला, त्यानंतर संध्याकाळी 5:00 वाजता गोळीबार आणि हवाई घुसखोरी थांबली.” तथापि, त्यांनी पुष्टी केली की पाकिस्तानने काही तासांतच करार मोडला आणि रात्री ड्रोन घुसखोरी करून पुन्हा युद्ध सुरू केले.
लेफ्टनंट जनरल घई पुढे म्हणाले की, “7 मे ते 10 मे दरम्यान, नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराचे सुमारे 35-40 जवान मारले गेले. पुलवामा हल्ला आणि आयसी-814 अपहरणाचे सूत्रधार – युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदासिर अहमद यांच्यासह नऊ दहशतवादी केंद्रांवर 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले.”
हवाई दल: सर्व उद्दिष्टे गाठली, एकही भारतीय जवान गमावलेला नाही
एअर मार्शल ए.के. भारती, हवाई संचालन महासंचालक, यांनी स्ट्राईक्सचे सॅटेलाइट प्रतिमा दाखवून सांगितले की “काही पाकिस्तानी विमानं पाडण्यात आली, पण ती भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करु शकली नव्हती”.
“आमचे सर्व वैमानिक सुरक्षित परतले आहेत. आम्ही अचूकतेने स्ट्राईक केली. आमचे लक्ष्य दहशतवादी पायाभूत सुविधा होत्या — नागरिक वा सैनिकी लक्ष्य नव्हती.”
एअर मार्शल भारती यांनी सांगितले की पाकिस्तानच्या प्रत्युत्तरात भारतीय नागरी व सैनिकी ठिकाणे लक्ष्य करण्यात आली, त्यामुळे लाहोर, गुजरांवाला जवळील रडार आणि इस्लामाबादमधील चकला, रफीकी इ. लष्करी तळांवर हल्ले करण्यात आले.
“आम्ही वेस्टर्न फ्रंटवर हवाई तळ, कमांड सेंटर्स आणि हवाई संरक्षण यंत्रणा लक्ष्य केल्या. हे ऑपरेशन झपाट्याने, नियोजनबद्ध आणि समन्वयाने पार पडले.”
नौदल: कराची हे संभाव्य लक्ष्य होते
व्हाईस अॅडमिरल ए.एन. प्रमोद, नौदल संचालन महासंचालक, यांनी सांगितले की: “पाकिस्तानच्या वाढत्या कुरापतींमध्ये कराची हे संभाव्य लक्ष्य होते. ऑपरेशन सिंदूरबाबत त्यांनी सांगितले की भारतीय नौदल समुद्रावर तसेच जमिनीवरही आघात करु शकतो.”
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतीय नौदलाची कॅरिअर बॅटल ग्रुप, पृष्ठभागावरील जहाजं, पाणबुडी आणि नेव्हल एव्हिएशन पूर्ण लढाई सज्जतेत अरब सागरात तैनात करण्यात आली.
ऑपरेशन सिंदूर: पहिल्याच दिवशी सर्व धोरणात्मक उद्दिष्टे साध्य
भारतीय सैनिकी अधिकाऱ्यांनी सांगितले की, “ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी तिन्ही प्रकारची उद्दिष्टे — सैनिकी, राजकीय आणि मानसिकदृष्ट्या पूर्ण झाली.”
सैनिकी: बहावलपूर, मुरिदके, मुझफ्फराबादसह 9 उच्च मूल्य असलेली दहशतवादी केंद्रे उद्ध्वस्त करण्यात आली.
“ही ठिकाणे भारताने त्याच्या सर्वात प्रबळ स्फोटकांनी जमीनदोस्त केली. संदेश स्पष्ट आहे — पाकिस्तानात कुठलाही दहशतवादी सुरक्षित नाही.”
राजकीय: भारताने इंडस वॉटर ट्रीटी (सिंधू पाणी करार) तात्पुरता थांबवला — पाकिस्तानला सांगण्यासाठी की राज्य प्रायोजित दहशतवाद चालत नाही आणि भारत जुने करार मान्य ठेवणार नाही.
मानसिक: भारताच्या स्ट्राईकच्या प्रमाणामुळे पाकिस्तानी यंत्रणेवर मानसिक धक्का बसला.
“पाकिस्तानचे डीजीएमओ शांततेसाठी तातडीने संपर्क साधू लागले — याचे कारण म्हणजे भारतीय आक्रमणाची तीव्रता आणि त्यांच्या प्रतिसादातील विसंगती.”
बॅकचॅनल नाही, केवळ डीजीएमओ हॉटलाइन सुरु
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की राजकीय वा गुप्त संपर्क सुरू नाहीत — केवळ डीजीएमओ हॉटलाइन कार्यरत आहे.
“आम्ही स्पष्ट सांगितलं आहे — तुम्ही थांबा, आम्ही थांबतो. तुम्ही पुन्हा हल्ला करा — आम्ही अधिक कडक उत्तर देऊ.”
भारताचा संदेश: हीच नवी सामान्यता आहे
भारताने पुन्हा एकदा सांगितले की, “ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही. सशस्त्र दल पूर्ण सज्ज आहेत आणि जर समोरुन उकसवले गेले, तर पुढील कारवायांसाठी सज्ज आहेत.”
“पाकिस्तानातील कोणतीही जागा दहशतवाद्यांसाठी सुरक्षित नाही. हीच भारताची नवी रणनीतिक सामान्यता आहे.”
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांच्या प्रतिक्रियेवर बोलताना, भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की: “जम्मू-काश्मीरवर भारताची भूमिका अपरिवर्तित आहे आणि भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही बाह्य मध्यस्थी मान्य केली जाणार नाही.”
-रवी शंकर