लष्कराच्या हेलिकॉप्टर्सना ‘भारतीय इंजिन’ची गरज!

0

संपादकीय टिप्पणी

आपल्या 50 वर्षांच्या प्रदीर्घ भागीदारीत साफ्रान आणि एचएएल यांनी अनेक प्रकारच्या इंजिन्सची निर्मिती केली, ज्याचा वापर आपल्या हेलिकॉप्टरच्या ताफ्यांमध्ये करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आयएमआरएचसाठीच्या इंजिन निर्मितीसाठी साफ्रानची निवड हा एक योग्य निर्णय ठरू शकतो, ज्यामुळे अद्ययावत इंजिन तंत्रज्ञानाने बनलेला हेलिकॉप्टरचा ताफा आपल्याकडे असेल.


सर्वसाधारणपणे हेलिकॉप्टरमध्ये रोटर्सचा उपयोग केलेला असतो, ज्यामुळे हेलिकॉप्टरला उड्डाणासाठी आवश्यक वेग घेणे, उड्डाण करणे आणि घिरट्या घालणे यासाठी मदत होते. रोटर्सना फिरण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती इंजिनमधून येते. सध्या बहुतेक हेलिकॉप्टर्समध्ये सर्वसाधारणपणे टर्बोशाफ्ट इंजिन्सचा वापर केला जात असला तरी खर्चात होणारी बचत लक्षात घेऊन काही लाइट हेलिकॉप्टर्समध्ये पिस्टन इंजिन्स वापरली जात आहेत.

सर्वात जुन्या हेलिकॉप्टर डिझाईन्समध्ये वीज निर्माण करण्यासाठी रबरबॅण्ड किंवा स्पिंडल्स यांचा वापर करणे अशी संकल्पना वापरली गेली होती. यात पहिले यश मिळाले ते अंतर्गत ज्वलन इंजिनच्या वापरामुळे, ज्याने हेलिकॉप्टर हवेत उडण्यासाठी पुरेशी ऊर्जा प्रदान केली आणि म्हणूनच पहिल्या टॉवरच्या हेलिकॉप्टर्समध्ये कस्टम बिल्ट किंवा रोटरी इंजिन होते – काही हेलिकॉप्टर्समध्ये ऑटोमोबाईल इंजिनचा देखील वापर झाला. मात्र ही इंजिन्स यशस्वी झाली नाहीत, कारण सतत होणाऱ्या उड्डाणांसाठी आवश्यक असणारी ऊर्जा निर्माण करण्याइतपत ही इंजिन्स सक्षम नव्हती. 1939 मध्ये इगोर सिकोर्स्कीने व्हीएस-300 ची निर्मिती करताना दोन्ही रोटर यंत्रणांना ऊर्जा देण्यासाठी सिंगल फोर-सिलेंडर 75 एचपी पिस्टन इंजिन वापरले. त्यानंतर, 1950 च्या दशकाच्या उत्तरार्धात टर्बोशाफ्ट इंजिनच्या आगमनापर्यंत चार-सिलेंडर पिस्टन इंजिन्सचा हेलिकॉप्टरमध्ये सर्रास वापर झाला. टर्बोशाफ्ट इंजिनांनी विमान उद्योगात क्रांती घडवून आणली; कारण ती हलकी, अधिक विश्वासार्ह आणि टिकाऊ उच्च-ऊर्जा उत्पादन प्रदान करण्यास सक्षम होती.

नंतरच्या दशकांमध्ये, हेलिकॉप्टर इंजिन अधिक अचूक आणि उत्तम कार्य करण्यासाठी आणखी सुधारणा करण्यात आल्या. सध्या, जगातील बहुतेक हेलिकॉप्टरमध्ये, लष्करी आणि नागरी दोन्ही, टर्बोशाफ्ट इंजिन्स आहेत, मात्र आधी सांगितल्याप्रमाणे, काही हलकी हेलिकॉप्टर पिस्टन इंजिनद्वारे चालविली जातात आणि अनेकदा ती पायलटच्या प्रारंभिक प्रशिक्षणासाठी वापरली जातात.

भारतीय सैन्याकडे असणारा सध्याचा संपूर्ण हेलिकॉप्टर ताफा केवळ टर्बोशाफ्ट इंजिनयुक्त आहे, रशियन Mi-4 हे शेवटचे पिस्टन-इंजिन असलेले हेलिकॉप्टर होते, ज्याची सेवा 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली. जड आणि मध्यम दर्जाच्या हेलिकॉप्टरमध्ये दोन किंवा तीन टर्बोशाफ्ट इंजिन असतात, हलक्या हेलिकॉप्टरमध्ये सामान्यत: एकच इंजिन वापरतात. मात्र याला अपवाद आहे – रशियन Ka-226T हेलिकॉप्टर, जे आपल्या जुन्या चित्ता/चेतक फ्लीटची जागा घेणार होती, त्यात दोन इंजिने आहेत.

हेलिकॉप्टर पॉवर प्लांट्स/इंजिन: भारतीय संदर्भ

सध्या, टर्बाइन इंजिन निर्मितीमध्ये यूएस, यूके, फ्रान्स आणि रशिया या आघाडीच्या देशांचा समावेश होतो. जनरल इलेक्ट्रिक तसेच प्रॅट अँड व्हिटनीसारख्या उत्पादकांसह यूएस आघाडीवर आहे, तर यूकेकडे रोल्स-रॉयससारखी कंपनी आहे, फ्रान्सकडे साफ्रान हेलिकॉप्टर इंजिन्स आहेत आणि रशियाकडे Aviadvigatel आणि NPO Saturn या कंपन्या आहेत. साफ्रान ही हेलिकॉप्टर इंजिनची जगभरातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. चीननेही टर्बाइन इंजिनच्या उत्पादन व्यवसायात उडी घेतली असली तरी, त्यांचे तंत्रज्ञान तितकेसे प्रगत नाही आणि त्यामुळे त्यांना ऊर्जाविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. एक उदाहरण म्हणजे, चीनचे बहुचर्चित Z-10 अटॅक हेलिकॉप्टर तुर्कीच्या ATAK-129 हेलिकॉप्टरसमोर हाय अॅल्टीट्यूडमध्ये सुमार कामगिरीमुळे निष्प्रभ ठरले. चीनकडून ही हेलिकॉप्टर पाकिस्तानने घेतली होती.

तेजस तसेच प्रगत अत्याधुनिक हेलिकॉप्टर ध्रुव, लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH), लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (LUH – जे निर्मितीच्या प्रक्रियेत आहे) यासह HALच्या आगामी इंडियन मल्टी-रोल हेलिकॉप्टर (IMRH) प्रकल्पासारख्या स्वदेशी डिझाईन, विकास आणि निर्मितीमध्ये भारत यशस्वी ठरला आहे. मात्र तरीही, इंजिन तंत्रज्ञानाच्या विकास क्षेत्रात, विशेषत: लष्करासाठी, भारत दुर्दैवाने मागे राहिला आहे.
मात्र, भारताने जेट इंजिन GTX-35VS कावेरी विकसित करण्याचा प्रयत्न केला, ज्याची पहिली चाचणी 1996 मध्ये झाली. हे इंजिन गोदरेज आणि बॉयससह गॅस टर्बाइन रिसर्च एस्टॅब्लिशमेंटने विकसित आणि तयार केले होते. हे इंजिन तेजस लढाऊ विमानाच्या सुरुवातीच्या मॉडेलवर वापरण्यात आले होते. त्याच्या कार्यक्षमतेबद्दल काही उलटसुलट दावे केले जात असताना, ते त्या कसोटीवर उतरू शकले नाही. तेजस लढाऊ विमानांच्या उत्पादनाला देण्यासंदर्भात, एचएएलने या वर्षी जूनमध्ये यूएसच्या जनरल इलेक्ट्रिकसोबत आपल्या F414-GE-INS6 इंजिनच्या संयुक्त उत्पादनासाठी करार केला. कंपनीने 99 x F404 इंजिनची ऑर्डर पूर्ण करणेही अपेक्षित आहे, जे भारताच्या लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट प्रोग्रामला सहाय्यभूत ठरेल.

साफ्रान इंजिन आणि हेलिकॉप्टर

फ्रेंच ‘साफ्रान हेलिकॉप्टर इंजिन’ ही रोटरक्राफ्ट टर्बाइनची जगातील आघाडीची उत्पादकच नव्हे तर, या बाजारपेठेतील ही एकमेव कंपनी आहे. जगभरात कार्यरत असणारी ही कंपनी 500 ते 3000 SHP पर्यंत हेलिकॉप्टर इंजिनची विस्तृत श्रेणी तयार करते. कंपनीचा 80 वर्षांहून अधिक काळ डिझाइन आणि उत्पादन उत्कृष्टतेसाठी वचनबद्ध असून सध्या तिची 21000 इंजिने कार्यरत आहेत. साफ्रान इलेक्ट्रिक हेलिकॉप्टरकडेही कंपनीने लक्ष केंद्रीत केले आहे.

चीता आणि चेतक हेलिकॉप्टरसाठी टर्बोमेका आर्टॉस्ट IIIB टर्बोशाफ्ट 550 SHP इंजिनच्या निर्मितीपासून HAL सोबत फ्रेंच फर्मची सुरू झालेली भागीदारी 50 वर्षांहून अधिक काळ सुरूच आहे. या भागिदारीअंतर्गत हेलिकॉप्टर आणि इंजिन दोन्ही HAL कडे असलेल्या लायन्ससअंतर्गत तयार केले गेले होते आणि ते आजही तसेच सुरू आहे. सध्या, साफ्रानने डिझाइन केलेले इंजिन असलेल्या हेलिकॉप्टरचा सर्वात मोठा ताफा भारतीय लष्कराकडे असून सध्या या ताफ्यात 1500 पेक्षा जास्त ही इंजिन्स असलेली हेलिकॉप्टर्स आहेत. साफ्रान आणि HAL यांनी संयुक्तपणे ध्रुव, शस्त्रसज्ज ध्रुव तसेच LCH ला सामर्थ्य देणारे नाविन्यपूर्ण प्रोपल्शन तंत्रज्ञान समाविष्ट करून शक्ती इंजिन (Ardiden1H1) तयार केले आहे. यापैकी प्रत्येक हेलिकॉप्टर दोन इंजिनांनी चालते, प्रत्येक इंजिन 1400-2000 SHP तयार करते. बंगळुरू येथे आतापर्यंत 500 पेक्षा जास्त शक्ती इंजिन्स तयार करण्यात आली आहेत.

याशिवाय, Safran Helicopter Engines ‘Ardiden 1U’ हा प्रकार नव्या एक-इंजिन हेलिकॉप्टर असलेल्या LUH मध्ये देखील बसवण्यात आला आहे. या वर्षी जुलैमध्ये एका महत्त्वपूर्ण घडामोडीनंतर HAL आणि साफ्रान हेलिकॉप्टर इंजिन्स यांनी भारतातच प्रगत हेलिकॉप्टर इंजिन तयार करण्यासाठी एक प्रमुख करार केला आहे. HALच्या साफ्रान सोबतच्या या करारामध्ये भारतीय सैन्यासाठी हेलिकॉप्टर इंजिनचे डिझाईन, विकास, प्रमाणीकरण, उत्पादन, विक्री आणि देखभाल यांचा समावेश असेल. हेलिकॉप्टरच्या Mi-17 फ्लीटची जागा घेणाऱ्या संकल्पित 13-16 टन IMRH प्रकल्पावर प्राथमिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या कराराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विकास प्रकल्प पूर्ण झाल्यावर HAL कडे इंजिनचे ‘टाइप सर्टिफिकेट’ असेल – हा खरोखरच एक महत्त्वपूर्ण निर्णय असून या क्षेत्रातील HALची क्षमता वाढवण्यास त्याची खूप मदत होणार आहे.

गेल्या तीन-चार वर्षांत टप्प्याटप्प्याने समाविष्ट करण्यात आलेल्या आणि करण्यात येणाऱ्या लष्कराच्या अपाचे आणि नौदलाच्या सी हॉक्स यासारख्या हेलिकॉप्टर्सचाही विचार करू या. या हेलिकॉप्टर्समध्ये रशियन Mi-17V5 आणि अमेरिकन AH-64E अपाचे, चिनूक CH-47F आणि MH-60 रोमियो सी हॉक प्रकार आहेत, ज्यांत अनुक्रमे त्या त्या देशांमध्ये उत्पादित झालेल्या इंजिनांचा समावेश करण्यात आला आहे.

Mi-17V5 मध्ये अनुक्रमे 2100 आणि 2700 च्या शाफ्ट हॉर्स पॉवर (SHP) सह दोन Klimov TV3-117VM किंवा VK 2500 टर्बोशाफ्ट इंजिन बसवलेली आहेत, ज्यामुळे हेलिकॉप्टर सर्वोच्च उंचीवरही आपली कामगिरी करण्यास सक्षम बनते. Apaches मध्ये दोन जनरल इलेक्ट्रिक T700-GE-701D शक्तिशाली टर्बोशाफ्ट इंजिन्स प्रत्येकी 2000च्या SHP सह बसवलेली आहेत. यामुळे ती घातक शस्त्रास्त्रे मोठ्या प्रमाणात वाहून नेण्यास सक्षम होतात. म्हणूनच ती जगातील सर्वात भीषण हल्ला करू शकणारी हेलिकॉप्टर्स बनली आहेत. चिनूक, हे युद्ध आणि लढाऊ-चाचणी केलेले जगातील हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर असून त्यात दोन हनीवेल T-55 इंजिन्स आहेत, ज्यामुळे तोफा आणि रणगाडे वाहून नेणे शक्य होते. सी हॉक, एक बहु-मिशन हेलिकॉप्टर जहाजे आणि विमानवाहू युद्धनौकांवर कार्य करण्यास सक्षम असून दोन जनरल इलेक्ट्रिक T700-GE-401C इंजिन्स त्यात आहेत.

निष्कर्ष

धोरणात्मक स्वायत्ततेचा हा मार्ग गुंतागुंतीचा आणि महाग आहे, परंतु त्याचे संभाव्य फायदे वादातीत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, चंद्रावर अंतराळ यान उतरवू शकणारा आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली डिझाइन आणि विकसित करण्यासाठी एक मजबूत इको-सिस्टम विकसित करणारा देश आपल्या सैन्यासाठी आवश्यक असणाऱ्या लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरसाठी योग्य इंजिन विकसित करण्यासाठी धडपडत आहे. आज एखाद्या देशाची शक्ती जितकी त्याच्या लष्करी आणि आर्थिक सामर्थ्यावर असते तितकीच ती त्याच्या तांत्रिक क्षमतांवरही अवलंबून असते. या संदर्भात, एचएएलने भारतातील तेजस लढाऊ विमानाच्या एफ-414 इंजिनचे सह-उत्पादन करण्यासाठी अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिकसोबत आणि योग्य इंजिनच्या डिझाइन आणि विकासासाठी फ्रेंच साफ्रान हेलिकॉप्टर इंजिनसोबत करार केले आहेत. IMRH प्रकल्प ही एक मोठी झेप आहे, कारण यामुळे आत्मनिर्भर भारताला चालना मिळेल. मात्र या कंपन्यांचे तंत्रज्ञान पूर्णपणे आपल्याला हस्तांतरित करताना, करारात नमूद असूनही कंपन्या हा भाग कसा हाताळतील ते केवळ वेळच सांगेल.

लेफ्टनंट जनरल बीएस पवार (निवृत्त)

अनुवाद – आराधना जोशी


Spread the love
Previous article‘Everything Is Destroyed’: Civilians Trickle Out Of Avdiivka As Russian Assault Leaves Ukrainian Town In Ruins
Next articleRussia-Ukraine War Not Ending Before 2025-26
Lt. Gen. B. S. Pawar (Retd.)
During a career spanning four decades, the officer has held a number of prestigious command and staff appointments. He was head of the Army Aviation Corps and Commandant School of Artillery. Currently, he is the President of the Northern Region of The Helicopter Society of India. A defence analyst, he writes for defence journals and publications and is also on the editorial board of a few of them.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here