तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैय्येप एर्दोगान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, यांची रविवारी इस्तंबूल येथे भेट झाली. या भेटीदरम्यान त्यांनी संरक्षण, ऊर्जा आणि वाहतूक या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याची वचनबद्धता व्यक्त केल्याचे, एर्दोगान यांच्या कार्यालयाकडून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Turkey-Pakistan यांच्यातील संबंध ऐतिहासिक आणि धार्मिक आहेत, कारण दोन्ही देश प्रामुख्याने मुस्लिम लोकसंख्या असलेले आहेत. तुर्कीने भारतासोबत झालेल्या अलीकडील संघर्षाच्या काळात पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला होता.
भेटीदरम्यान, एर्दोगान यांनी शरीफ यांना सांगितले की, “दहशतवादाविरोधातील लढ्यात शिक्षण, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि तांत्रिक सहाय्य वाढवणे हे तुर्की आणि पाकिस्तान दोघांच्याही हिताचे आहे.”
या बैठकीला तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान, संरक्षण मंत्री यासार गुलर आणि गुप्तचर विभाग प्रमुख इब्राहिम कालिन हेदेखील उपस्थित होते.
मे महिन्यात, जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने लष्करी कारवाई केली होती. त्यानंतर एर्दोगान यांनी पाकिस्तानप्रती ऐक्य दर्शवले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा संघर्ष, गेल्या वीस वर्षांतील सर्वात तीव्र मानला जात आहे.
अंकारा भारताशी सौहार्दपूर्ण संबंध राखत असला, तरी एर्दोगान यांच्या पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यामुळे भारतात काही किरकोळ किराणा दुकानांनी आणि मोठ्या ऑनलाइन फॅशन विक्रेत्यांनी तुर्की उत्पादने विकण्यास नकार दिला.
भारताची विविध पावले
तुर्कीने पाकिस्तानला दिलेल्या खुल्या समर्थनानंतर, भारताने आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त करण्याहेतू अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.
भारत सरकारने, Celebi या तुर्की संबंधीत ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवठादाराचे संचालन परवाना रद्द केला आहे. यामुळे भारतीय विमानतळांवरील तुर्कीच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला असून, द्विपक्षीय संबंधांतील तणाव स्पष्टपणे दिसून येत आहे.
याशिवाय, भारतातील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी- इंडिगो आणि तुर्की एअरलाइन्स यांच्यातील कोडशेअर करार आणि इतर सहकार्याचाही भारत सरकार आढावा घेत आहे.
हे सर्व प्रकार तुर्कीच्या प्रादेशिक संघर्षातील भूमिकेवर भारताची नाराजी दर्शवतात आणि यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी तसेच राजनैतिक संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
या घडामोडींमुळे, भारत-तुर्की आर्थिक संबंधांवर काय परिणाम होतील हे अद्याप स्पष्ट नसले, तरी या घडामोडी प्रादेशिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बदलणाऱ्या आंतरराष्ट्रीय संबंधांचे सूचक आहेत.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)