भारताकडून अस्तित्वाला धोका असल्याचा पाकिस्तानचा दावा

0

पाकिस्तान भारताला त्याच्या अस्तित्वासाठी असणारा धोका मानत असल्याने भारताकडून झालेले पारंपरिक लष्करी नुकसान भरून काढण्यासाठी युद्धभूमीतील अण्वस्त्रांच्या विकासासह लष्करी आधुनिकीकरणाचे प्रयत्न सुरूच ठेवेल, असे अमेरिकेच्या संरक्षण गुप्तचर संस्थेने 2025 साठी असणाऱ्या धोक्याच्या मूल्यांकन अहवालात म्हटले आहे.

22  एप्रिल रोजी पहलगाम शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 25  हिंदू पुरूष पर्यटक मृत्युमुखी पडल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. या हल्ल्याचा जागतिक पातळीवर निषेध करण्यात आला होता.

भारताने या दहशतवादी घटनेला ऑपरेशन सिंदूरने प्रत्युत्तर देत, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) असलेल्या नऊ दहशतवादी केंद्रांना लक्ष्य केले.

भारतीय सशस्त्र दलांकडून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने अनेक भारतीय शहरांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने लक्ष्य केले गेले मात्र हे सगळे प्रयत्न भारतीय दलांनी निष्क्रिय केले.

पाकिस्तानचे आण्विक शस्त्रागार

अमेरिकेच्या अहवालात पुढे म्हटले आहे की पाकिस्तान आपल्या आण्विक शस्त्रांचे आधुनिकीकरण करत असून आपल्या अणु सामग्री, अणु कमांड आणि नियंत्रणाची कडेकोट सुरक्षा राखत आहे.

चीनचा सहभाग

अहवालात म्हटले आहे: “पाकिस्तान प्रामुख्याने चीनकडून मिळणाऱ्य आर्थिक आणि लष्करी मदतीवर अवलंबून आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्य दरवर्षी चीनच्या पीएलएसोबत अनेक संयुक्त लष्करी सरावांमध्ये सहभाग घेते. यामध्ये अलिकडे म्हणजे नोव्हेंबर 2024 मध्ये पूर्ण झालेल्या नवीन हवाई सरावाचा समावेश आहे.”

“पाकिस्तानच्या WMD कार्यक्रमांना पाठिंबा देणारे परदेशी साहित्य आणि तंत्रज्ञान प्रामुख्याने चीनमधील पुरवठादारांकडून पाठवले जाते तर कधीकधी ते हाँगकाँग, सिंगापूर, तुर्की आणि संयुक्त अरब अमिरातीमधून पाठवले जाते,” असे त्यात म्हटले आहे.

तर दुसरीकडे चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या चिनी कामगारांना लक्ष्य करून केलेले दहशतवादी हल्ले या दोन देशांमधील संघर्षाचा मुद्दा म्हणून उदयास आले आहेत.

2024 मध्ये पाकिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात चिनी नागरिकांचा मृत्यू झाला.

अहवालात भारताचा उल्लेख

अहवालात भारताचा उल्लेख करण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संरक्षण प्राधान्य कदाचित जागतिक नेतृत्व प्रदर्शित करणे, चीनचा मुकाबला करणे आणि नवी दिल्लीची लष्करी शक्ती वाढवणे यावर केंद्रित असेल असे त्यात म्हटले आहे.

“भारत आणि पाकिस्तानच्या सैन्याने मे महिन्याच्या मध्यावर सीमापार हल्ले केले असले तरी, भारत चीनला आपला प्राथमिक शत्रू आणि पाकिस्तानकडे  हाताळण्यासाठी आवश्यक असलेली दुय्यम सुरक्षा समस्या म्हणून पाहतो,” असे अहवालात म्हटले आहे.

जम्मू  काश्मीरमधील 22 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत, अहवालात म्हटले आहे: “जम्मू आणि काश्मीरमध्ये एप्रिलच्या अखेरीस झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, नवी दिल्लीने पाकिस्तानमधील दहशतवादाशी संबंधित पायाभूत सुविधांवर क्षेपणास्त्र हल्ले केले.”

“या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे 7 ते 10 मे दरम्यान दोन्ही सैन्यांनी अनेक वेळा क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि इतर युद्धसामग्रीचा वापर करत हल्ले आणि तोफांचा जोरदार मारा केला. 10 मे पर्यंत, दोन्ही सैन्यांनी संघर्ष विरामावर सहमती दर्शविली,” असे अहवालात म्हटले आहे.

याशिवाय चीनच्या प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी आणि जागतिक नेतृत्वाची भूमिका वाढवण्यासाठी, भारत सराव, प्रशिक्षण, शस्त्रास्त्र विक्री आणि माहिती सामायिकरणाद्वारे हिंद महासागर प्रदेशात द्विपक्षीय संरक्षण भागीदारी वाढविण्यास प्राधान्य देत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

“भारताने इंडो-पॅसिफिक प्रदेशात त्रिपक्षीय सहभाग वाढवला आहे आणि Quadrilateral, BRICS, Shanghai Cooperation Organization and ASEAN सारख्या बहुपक्षीय मंचांमध्ये सक्रियपणे भाग घेत आहे,” असे अहवालात म्हटले आहे.

भारत या वर्षी आपला देशांतर्गत संरक्षण उद्योग उभारण्यासाठी, पुरवठा साखळीच्या चिंता कमी करण्यासाठी आणि आपल्या सैन्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी “मेड इन इंडिया” उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात स्वीकार करत राहील, असेही अहवालात स्पष्ट केले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articlePakistan Expands Its Nuclear Arsenal: US Intelligence Report
Next articleTurkey-Pakistan Ties: दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here