केरळमधील F-35B जेटचे ईमर्जन्सी लँडिग: तांत्रिक घटना, सामरिक परिणाम

0
F-35B

शनिवारी संध्याकाळी, ब्रिटिश F-35B लाइटनिंग II फायटर जेटने, इंधनाची कमतरता आणि अरबी समुद्रावरील प्रतिकूल हवामानामुळे, त्रिवेंद्रम (थिरुवनंतपूरम) आंतरराष्ट्रीय विमानतळावर ईमर्जन्सी लँडिंग केले. युनायटेड किंग्डमच्या HMS प्रिन्स ऑफ वेल्स कॅरियर स्ट्राइक ग्रुपचा भाग असलेले हे विमान, कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरले.

ही परिस्थीती सुरक्षितपणे हाताळली गेली असली, तरी या घटनेने अमेरिकेत बनवलेल्या या स्टेल्थ फायटरविषयी नव्याने उत्सुकता निर्माण केली आहे, विशेषतः त्याच्या भारतीय वायूदलात (IAF) समावेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर.

या घटनेशी संबंधित स्त्रोतांनी सांगितले की, ‘विमानवाहू जहाजाजवळील हवामानाची परिस्थिती खालावल्यामुळे जहाजावर परतणे सुरक्षित नव्हते. अशातच इंधनाची पातळी कमी होत असल्यामुळे, वैमानिकाला जवळच असलेल्या त्रिवेंद्रम धावपट्टीकडे वळावे लागले.’

भारतीय वायुदलाने त्यांच्या अधिकृत निवेदनात सांगितले की: “सुरक्षेच्या कारणास्तव वैमानिकाला हा निर्णय घ्यावा लागला.  IAF ने आवश्यक ती मदत केली असून सर्व संबंधित यंत्रणांशी संपर्कात आहे.”

याप्रकरणी आतापर्यंत कोणत्याही यांत्रिक बिघाडाच्या नोंदी आलेल्या नाहीत, परंतु तांत्रिक तपासणी अद्याप सुरू आहे. या घटनेबाबत, यूकेचे संरक्षण मंत्रालय किंवा विमाननिर्माता लॉकहीड मार्टिन यांनी अद्याप कोणतेही जाहीर निवेदन दिलेले नाही.

F-35: पुढच्या पिढीचे लढाऊ विमान

F-35 लाइटनिंग II हे विमान अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्रातील दिग्गज कंपनी लॉकहीड मार्टिनने विकसित केले असून, हे स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. हे विमान वायुसामर्थ्य, अचूक हल्ले, गुप्तचर गोळा करणे आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध या सर्व गोष्टींसाठी डिझाइन करण्यात आले आहे. हे जगातील सर्वात प्रगत लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते.

या विमानाचे तीन प्रमुख प्रकार आहेत:

F-35A – पारंपरिक टेकऑफ व लँडिंग करणारे विमान, मुख्यतः वायुदलासाठी वापरला जाते.

F-35B – कमी धावपट्टीवरून उड्डाण घेऊ शकणारे आणि थेट खाली उतरू शकणारे STOVL प्रकारातील विमान. कॅटपल्टशिवाय वापरल्या जाणाऱ्या विमानवाहू नौकांसाठी डिझाइन करण्यात आलेला हा प्रकार शनिवारी केरळमध्ये उतरलेला होता.

F-35C – कॅटपल्टच्या सहाय्याने उड्डाण करणारे जेट, जे अमेरिकन नौदलाच्या विमानवाहू नौकांसाठी अनुकूल आहे.

या सर्व प्रकारांमध्ये स्टेल्थ डिझाइन, एकत्रित सेन्सर फ्यूजन आणि प्रगत डेटा शेअरिंग प्रणाली आहे, जी हवाई, स्थल आणि नौदल प्लॅटफॉर्मसोबत थेट समन्वय साधू शकते.

F-35 चे हे ईमर्जन्सी लँडिंग अशावेळी घडले, आहे जेव्हा अमेरिकेने भारताला F-35 जेट्स देण्याबाबत अधिक सकारात्मक भूमिका घेतलेली दिसते, जी पूर्वीच्या धोरणामध्ये झालेली लक्षणीय बदलाची नोंद आहे. यावर्षी सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला हे अत्याधुनिक विमान देण्याच्या शक्यतेचा उल्लेख केला होता.

“आम्ही भारताला F-35 उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा करत आहोत,” असे ट्रम्प यांनी सांगितले आणि संरक्षण भागीदारी आणखी बळकट करण्याचा संकेत दिला.

भारत अनेक वर्षांपासून आपल्या हवाई क्षमतेसाठी पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानाचा शोध घेत आहे. मात्र, F-35 संदर्भात अद्याप कोणतेही औपचारिक करार झालेले नाहीत.

भारतात F-35 चे महत्त्व का आहे?

F-35 लढाऊ विमानातील अत्याधुनिक वैशिष्ट्ये, भारताच्या भविष्यातील युद्धसज्जतेसाठी एक आकर्षक आणि सामर्थ्यशाली पर्याय आहेत:

  • स्टेल्थ व बियॉन्ड व्हिज्युअल रेंज (BVR) क्षमता: हे विमान लक्ष्य शोधणे, त्याचा मागोवा घेणे आणि मोठ्या अंतरावरून न दिसता हल्ला करणे शक्य करते.
  • हेल्मेट-माउंटेड डिस्प्ले: उड्डाण व लक्ष्याशी संबंधित अत्यावश्यक माहिती थेट वैमानिकाच्या व्हायझरवर प्रक्षेपित होते, ज्यामुळे 360 अंशांची संपूर्ण जागरूकता प्राप्त होते.
  • सुसंगतता (Interoperability): मित्रदेशांच्या प्लॅटफॉर्मसोबत सहज आणि प्रभावी समन्वय साधण्याची क्षमता, संयुक्त लष्करी मोहिमांमध्ये प्रभावीपणे योगदान देते.

F-35B प्रकाराची लहान किंवा तात्पुरत्या धावपट्ट्यांवरून उड्डाण व लँडिंग करण्याची क्षमता: ही बाब भारताच्या सीमावर्ती तैनाती किंवा बाह्य मोहिमांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते आणि नुकत्याच केरळमधील आपत्कालीन लँडिंगमध्ये याचे ठळक उदाहरण दिसून आले.

जागतिक व्याप्ती असलेले लढाऊ विमान

F-35 जेट सध्या अमेरिकेसह युनायटेड किंगडम, जपान, आणि इस्रायलसारख्या डझनहून अधिक देशांच्या सेवेत आहे. हे विमान अनेकदा सक्रिय युद्धक्षेत्रांमध्ये, विशेषतः मध्य पूर्वेत, तैनात करण्यात आले आहे. एकदा इराणने इस्रायली F-35 पाडल्याचा दावा केला होता, मात्र त्यास पाठिंबा देणारा कोणताही विश्वासार्ह पुरावा आजपर्यंत समोर आलेला नाही.

भविष्यकालीन दिशा

भारताने अद्याप F-35 कार्यक्रमात औपचारिक सहभाग घेतलेला नसला, तरी Aero India 2025 मध्ये या लढाऊ विमानाच्या अपेक्षित उपस्थितीमुळे आणि वॉशिंग्टनकडून सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे, एक नव्या स्वरूपाचा धोरणात्मक बदल संकेत देत आहे.

शनिवारी घडलेली आपत्कालीन लँडिंगची घटना, ही लष्करी उड्डाणांच्या दृष्टीने नियमित घटना असली, तरी तिने भारतीय संरक्षण विश्लेषकांना या जेटचे जवळून निरीक्षण करण्याची दुर्मिळ संधी दिली, ही बाब भविष्यातील त्याच्या मोठ्या भूमिकेची चाहूलही देऊ शकते.

टीम भारतशक्ती


+ posts
Previous articleIndia Now Has More Nuclear Warheads Than Pakistan: SIPRI 2025
Next articleSIPRI अहवाल 2025: भारताकडे पाकिस्तानच्या तुलनेत अधिक अण्वस्त्रसाठा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here