या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या, अॅडव्हान्स्ड लाईट हेलिकॉप्टर (ALH) – ‘ध्रुव’ च्या दुर्देवी अपघाताच्या पार्श्वभूमीवर, भारताच्या स्वदेशी हेलिकॉप्टर कार्यक्रमावर तीव्र संशय व्यक्त केला जात आहे. या अपघातात नियमित प्रशिक्षणादरम्यान तीन भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, विविध सुरक्षा दलांमध्ये वापरात असलेल्या 300 हून अधिक ALH हेलिकॉप्टर्सना तात्काळ जमिनीवर उतरवण्याचे आदेश देण्यात आले.
या घटनेनंतर, व्यासपीठाच्या सुरक्षिततेबाबत आणि विश्वासार्हतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर उत्तर देताना, ध्रुव हेलिकॉप्टरचा निर्माता असलेली कंपनी- हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने, या कार्यक्रमाचे समर्थन करण्यासाठी आणि वाढत्या सार्वजनिक आणि संस्थात्मक चिंता दूर करण्यासाठी एक जोरदार खंडन जारी केले आहे.
HAL चा हा प्रतिसाद, माध्यमांकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आणि दोष तपासणी समितीच्या अहवालाबाबतच्या मौन भूमिकेदरम्यान समोर आला आहे.
ALH ताफा का ग्राउंड करण्यात आला?
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने, 5 जानेवारी 2025 रोजी, गुजरातमधील पोरबंदर जवळ प्रशिक्षणादरम्यान, झालेल्या तटरक्षक दलाच्या ध्रुव Mk III (CG 859) अपघातानंतर, संपूर्ण 330+ ALH हेलिकॉप्टर्सचा ताफा तात्पुरता जमिनीवर उतरवण्याचा निर्णय घेतला. या अपघातात तीन कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर, या हेलिकॉप्टरचा अनुपस्थिती प्रजासत्ताक दिनाच्या फ्लायपास्टमध्ये आणि Aero India 2025 या एअर शोमध्ये स्पष्टपणे जाणवली.
याआधीही, सप्टेंबर 2024 मध्ये वैद्यकीय आपत्कालीन सेवेसाठी झालेल्या उड्डाणात आणखी एक ALH अपघात झाला होता, ज्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता.
प्राथमिक विश्लेषणानंतर HAL ने, फ्लाइट रेकॉर्डरमधील डेटा पाहून ताफा ग्राउंड करण्याची शिफारस केली. या डेटानुसार, अपघाताच्या क्षणांपूर्वी विमानाने वैमानिकाच्या नियंत्रण आदेशांना प्रतिसाद दिला नव्हता. तपासादरम्यान हे लक्षात आले की, Integrated Dynamic System (IDS) मध्ये असलेल्या swash plate assembly मध्ये फ्रॅक्चर झाल्यामुळे नियंत्रण यंत्रणेत बिघाड झाला होता.
या घटनांनंतर, सार्वजनिक माध्यमांनी HAL वर तीव्र टीका झाली. यामध्ये गुणवत्ता नियंत्रणाच्या कमतरता, उत्तरदायित्वाचा अभाव, आणि लष्करी प्लॅटफॉर्मच्या विश्वासार्हतेबाबत जुन्या चिंता पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या. माजी चाचणी वैमानिक, निवृत्त अधिकारी आणि संरक्षण विश्लेषकांनीही HAL च्या उत्पादनांविषयी चिंता व्यक्त केली.
HAL ने या टीकांना, “दुर्भावनापूर्ण,” “काल्पनिक” आणि “एकतर्फी” ठरवत त्यांचे जाहीररित्या खंडन केले आहे. त्यांच्या मते, माध्यमांनी HAL चा दृष्टिकोन संपूर्णपणे दुर्लक्षित केला आहे.
पार्श्वभूमी
यावर्षी फेब्रुवारीत बेंगळुरूमध्ये पार पडलेल्या Aero India 2025 शोदरम्यान, आयोजित पत्रकार परिषदेत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक- डॉ. डी. के. सुनील यांनी सांगितले की, “भारतात विकसित करण्यात आलेल्या ध्रुव ALH च्या पुन्हा उड्डाणाला परवानगी देण्याचा निर्णय दोष तपासणी समितीचा अहवाल मिळाल्यानंतरच घेतला जाईल.”
डॉ. सुनील यांच्या म्हणण्यानुसार, “हा अहवाल तीन आठवड्यांत मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तीन महिने उलटूनही तो अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही, आणि ALH ताफा अजूनही जमिनीवरच आहे. या मौन भूमिकेमुळे ध्रुव हेलिकॉप्टरच्या सुरक्षिततेबाबत आणि HAL च्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न अधिकच तीव्र झाले आहेत.”
डॉ. सुनील म्हणाले की, “प्राथमिक तपासणीत असे दिसून आले की अपघाताचे कारण स्वॅश प्लेट मध्ये आलेली तडक होती. मात्र, दोष तपासणी समिती सध्या सविस्तर चौकशी करत आहे… हा अहवाल तीन आठवड्यांत सादर होईल, त्यानंतर आम्ही ALH चे उड्डाण पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ.”
मात्र अजूनही हा निर्णय आलेला नाही. दरम्यान, HAL वर या संकट हाताळण्याच्या पद्धतीवरून वाढती टीका होत आहे.
विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
ध्रुव ALH, जे सर्व भारतीय लष्करी दलांकडून वापरले जाते आणि पाश्चात्त्य हेलिकॉप्टर्सच्या तुलनेत कमी किमतीचा पर्याय म्हणून प्रचारित केले जाते, त्याच्या 25 वर्षांच्या सेवेत आतापर्यंत 28 अपघात झाले आहेत. यातील 13 अपघात तांत्रिक कारणांमुळे, सुमारे तिसरे भाग मानवी चूकांमुळे, तर उर्वरित अज्ञात कारणांमुळे झाले आहेत.
हेलिकॉप्टरच्या रचनेविषयी चिंता व्यक्त होत असतानाही, डॉ. सुनील यांनी स्पष्ट केले की, “ध्रुव हेलिकॉप्टरच्या डिझाइनमध्ये कोणताही दोष नाही.” त्यांनी संभाव्य देखभाल आणि प्रशिक्षणाच्या त्रुटींवर लक्ष केंद्रित केले. “आम्ही भारतीय तटरक्षक दलाबरोबर त्यांच्या देखभाल पद्धती समजून घेण्यासाठी आणि आवश्यक असल्यास सुधारणा करण्यासाठी काम करत आहोत,” असे ते म्हणाले.
HAL चे म्हणणे काय?
10 एप्रिल 2025 रोजी, HAL ने माध्यमं आणि सोशल मीडियासाठी अधिकृत निवेदन जारी करत काही रिपोर्ट्सना, ‘तथाकथित संरक्षण विश्लेषक’ आणि ‘माजी वैमानिक’, यांनी लिहीले असल्याचा आरोप केला.
HAL च्या मते, या रिपोर्ट्समध्ये तथ्यात्मक चुकांसह, आधीच निकाली निघालेल्या समस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, बऱ्याच बातम्यांमध्ये HAL आणि भारतीय वायुदलासह इतर संबंधित भागधारकांमधील चालू सहकार्याचे योग्य चित्रण झालेलं नाही.
HAL ने निवेदनात हेही स्पष्ट केले की, ते ऑपरेशनल समस्यांवर काम करत आहेत आणि ग्राहकांचा विश्वास टिकवण्यासाठी कटिबद्ध आहेत. मात्र, निवेदनाच्या भाषेतून बाहेरील टीकेबाबत नाराजी आणि अस्वस्थता झळकते. संरक्षण उत्पादनांच्या संवेदनशीलतेमुळे प्रत्येक बातमीला वेगळी प्रतिक्रिया देता येत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
यामुळे चिंता मिटल्या का?
नाही. एएएलच्या या निवेदनामुळे जनतेच्या किंवा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या चिंता कमी झाल्या नाहीत. ALH ताफ्याचे महिन्यांपासूनचे ग्राउंडिंग ही HAL साठी गेल्या अनेक वर्षांतील सर्वात गंभीर ऑपरेशनल संकटांपैकी एक मानली जात आहे.
उद्योग निरीक्षकांच्या मते, माध्यमांवर जोरदार प्रत्युत्तर देण्यापेक्षा HAL ने नियमित आणि पारदर्शक तांत्रिक अपडेट्स द्यायला सुरुवात करायला हवी होती.
का?
कारण, अधिकृत माहितीच्या अभावामुळे अनुमानांना – त्यापैकी काही माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह – पोकळी भरून काढण्याची परवानगी मिळाली आहे.
HAL ने यापूर्वी टीकेला प्रत्युत्तर दिले होते का?
हो. 2020 मध्ये माजी नौदलप्रमुख अॅडमिरल अरुण प्रकाश यांच्या आरोपाला, HAL ने सार्वजनिकरित्या उत्तर दिले होते. जे त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेप्रती वाढत चाललेल्या संवेदनशीलतेचे लक्षण मानले गेले.
HAL समोर कोणती आव्हाने आहेत?
HAL साठी या संकटातून मार्ग काढणे, फक्त तांत्रिक उपायांपुरते मर्यादित नसून, पारदर्शक संवाद आणि भागधारकांशी विश्वासपूर्ण संबंध यांवर अवलंबून आहे.
‘Dhruv Program’ मध्ये, जर पुन्हा विश्वासर्हता निर्माण करायची असेल, तर केवळ इंजिनिअरिंगवर आधारित उपाय पुरेसे ठरणार नाहीत, तर त्यासाठी ऑपरेशनल समस्यांवर लक्ष केंद्रित करणे, सातत्याने विश्वासार्हता सिद्ध करत राहणे, आणि सैन्यदलांचा विश्वास पुन्हा कमावणे या गोष्टींची देखील आवश्यकता आहे.
पुढील काही महिन्यांतील HAL ची भूमिका, भारताच्या स्वदेशी हेलिकॉप्टर कार्यक्रमाचे भवितव्य ठरवू शकते.