वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी, आज स्वित्झर्लंड आणि स्वीडनच्या आपल्या पाच दिवसीय अधिकृत दौऱ्याला सुरुवात केली असून, यामुळे युरोपमध्ये आपली व्यापार उपस्थिती मजबूत करण्याच्या दिशेने भारत करत असलेल्या प्रयत्नांना गती मिळणार आहे. हा दौरा (9 ते 13 जून 2025) आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार अधिक दृढ करण्यावर केंद्रित आहे. हा दौरा पुढील आठवड्यात कॅनडामध्ये होणाऱ्या G7 शिखर संमेलनासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर होत आहे.
स्वित्झर्लंडमधील चर्चेत, भारत–EFTA व्यापार आणि द्विपक्षीय आर्थिक भागीदारी करारावर (TEPA) लक्ष केंद्रित केले जाईल, जिथे मंत्री पियुष गोयल या करारासंबंधी प्रगती वेगाने पुढे नेण्यासाठी सहभाग घेतील.
TEPA हा करार, युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन (EFTA) देश – स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिक्टेनस्टाईन यांच्याशी संबंधित असून, यामुळे औषधनिर्मिती, अचूक अभियांत्रिकी आणि उच्च तंत्रज्ञान उत्पादन यांसारख्या क्षेत्रांमध्ये नवीन संधी खुल्या होण्याची अपेक्षा आहे.
स्वित्झर्लंडमधील कार्यक्रमांमध्ये जागतिक कंपन्यांचे सीईओ आणि विविध क्षेत्रांतील उद्योग नेत्यांसोबत धोरणात्मक बैठका पार पडतील, ज्यामध्ये विशेषतः स्विस औषध, जीवन विज्ञान आणि यांत्रिकी-अभियांत्रिकी क्षेत्रांतील नेत्यांसोबतच्या चर्चा सहभागी आहेत.
‘स्विसमेम इंडस्ट्री डे’ चा एक भाग म्हणून स्विस यांत्रिक आणि विद्युत (MEM) उद्योग क्षेत्रासोबत होणाऱ्या गोलमेज चर्चेमध्ये, भारताने औद्योगिक सहकार्य बळकट करण्याचा आणि तंत्रज्ञान हस्तांतरण व गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचा आपला स्पष्ट हेतू अधोरेखित केला जाईल.
एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, मंत्री गोयल यांची स्विस फेडरल कौन्सिलर गाय पर्मेलिन यांच्यासोबत होणारी बैठक, जी आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि द्विपक्षीय व्यापार संरचना बळकट करण्यावर केंद्रित असेल. भारतीय उद्योग प्रतिनिधी देखील, मंत्री गोयल यांच्यासोबत प्रमुख स्विस कंपन्यांशी एक-तेक बैठकीत सहभागी होतील, ज्यातून थेट व्यावसायिक संबंध निर्माण होतील आणि संयुक्त उपक्रमांच्या संधींचा शोध घेतला जाईल.
स्वित्झर्लंड दौऱ्यानंतर पियुष गोयल स्वीडनकडे रवाना होतील, जिथे ते मंत्री बेंजामिन डोसा यांच्यासोबत भारत–स्वीडन आर्थिक, औद्योगिक आणि वैज्ञानिक सहकार्य संयुक्त आयोगाच्या 21 व्या सत्राचे सह-अध्यक्षपद भूषवतील. या आयोगामार्फत सहकार्यासाठी प्राधान्य क्षेत्रे निश्चित केली जातील, विशेषतः शाश्वतता, नवकल्पना आणि प्रगत उत्पादन यावर भर राहील.
स्वीडनमधील मंत्री दोसा आणि राज्य सचिव हॉकान जेव्रेल, यांच्यासह होणाऱ्या द्विपक्षीय बैठका, भारत–स्वीडन यांच्यातील आधीच मजबूत असलेल्या आर्थिक भागीदारीला आणखी बळकटी देतील. या चर्चांमध्ये व्यापार विस्तार, हरित तंत्रज्ञानातील सहकार्य आणि औद्योगिक नवकल्पना यांचा समावेश असेल, जे भारताच्या व्यापक आर्थिक धोरणाशी सुसंगत आहे.
स्वीडन दौऱ्यात भारत–स्वीडन उद्योगविषयक गोलमेज परिषद देखील होणार आहे, जिथे एरिक्सन, आयकिया, व्होल्वो ग्रुप आणि सॅन्डविक यांसारख्या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील. या कंपन्यांचा भारतात आधीच मोठा सहभाग आहे.
गोयल यांचा हा युरोपीय दौरा, केवळ ठोस व्यापार परिणाम साध्य करण्यापुरता मर्यादित नाही, तर नवकल्पनांवर आधारित अर्थव्यवस्थांशी दीर्घकालीन, सक्षम आणि लवचिक आर्थिक भागीदारी विकसित करण्याच्या भारताच्या व्यापक धोरणालाही अधोरेखित करतो.
टीम स्ट्रॅटन्यूज