2020 नंतर पहिल्यांदाच मॉस्को आणि उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग दरम्यान थेट प्रवासी रेल्वे सेवा या महिन्यात पुन्हा सुरू होईल अशी घोषणा सोमवारी रशियाच्या सरकारी रेल्वे ऑपरेटरने केली.
रशियन रेल्वेने सांगितले की 17 जून रोजी दोन्ही राजधान्यांमध्ये महिन्यातून दोनदा ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी उत्तर कोरियाच्या रेल्वे मंत्रालयाशी सहमती दर्शविली आहे. या प्रवासाला आठ दिवस लागतील आणि 10 हजार किमीपेक्षा (6,213 मैल) जास्त अंतराचा हा प्रवास असेल. जगातील सर्वात लांब थेट रेल्वेचा हा प्रवास ठरणार आहे.
प्योंगयांग आणि खाबारोव्स्क -चीनच्या ईशान्य सीमेजवळ असणारे रशियन शहर- यांच्या दरम्यानची आणखी एक सेवा दोन दिवसांनी पुन्हा सुरू होईल.
या सेवा कोरियन स्टेट रेल्वे, राज्य ऑपरेटरद्वारे चालवल्या जातील आणि मॉस्को-प्योंगयांग मार्गावर, उत्तर कोरियाची प्रवासी रेल्वे नियमित मॉस्को-व्लादिवोस्तोक सेवेशी जोडली जाईल आणि नंतर ती दुसऱ्या ट्रेनला जोडली जाईल.
फेब्रुवारी 2020 मध्ये कोविड-19 साथीच्या आजाराच्या प्रारंभी रशिया आणि उत्तर कोरियामधील प्रवासी रेल्वे वाहतूक स्थगित करण्यात आली होती. ती सेवा अद्यापपर्यंत सुरू करण्यात आली नव्हती.
रशिया-उत्तर कोरिया संबंध
गेल्या वर्षी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी व्यापक धोरणात्मक भागीदारी करारावर स्वाक्षरी केल्यापासून मॉस्को आणि प्योंगयांग यांच्यातील लष्करी क्षेत्रातील सहकार्य वाढले आहे.
एप्रिलच्या अखेरीस उत्तर कोरियाने या गोष्टीला दुजोरा दिला की, त्यांनी युक्रेनविरुद्धच्या युद्धात मदत करण्यासाठी रशियाला 10 हजारांहून अधिक सैन्य आणि शस्त्रे पाठवली आहेत. या मदतीमुळे रशियाला पश्चिम कुर्स्क प्रदेश युक्रेनपासून परत मिळवण्यासाठी मॉस्कोसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.
दोन्ही देश आधीच रशियाच्या सुदूर पूर्वेतील व्लादिवोस्तोक आणि उत्तर कोरियाचे बंदर शहर रासन यांच्यामध्ये प्रवासी रेल्वे सेवा चालवतात.
दोन्ही देश मालवाहतूक रेल्वे नेटवर्कद्वारे देखील जोडलेले आहेत, अर्थात रशियाने याद्वारे किती मालवाहतूक होते हे मात्र उघड केलेले नाही.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)