अमेरिकेने सौदी अरेबियाला, सुमारे $142 अब्ज डॉलर्सच्या शस्त्रास्त्र पॅकेज विक्रीस मंजुरी दिली असून, हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा “संरक्षण सहकार्य करार” असल्याचे व्हाइट हाऊसने सांगितले आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी मंगळवारी आपल्या Gulf दौऱ्याच्या सुरुवातीला या कराराची घोषणा केली. त्यांनी सौदी अरेबियाकडून अमेरिकन अर्थव्यवस्थेत $600 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची अनपेक्षित घोषणा देखील केली. ट्रम्प आणि सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्यात झालेल्या या करारामध्ये संरक्षण, ऊर्जा, खाणकाम, आणि पायाभूत सुविधा यांसारख्या विविध क्षेत्रांचाही समावेश आहे.
या शस्त्रास्त्र करारामध्ये, डझनभराहून अधिक अमेरिकन संरक्षण कंपन्यांसोबतचे करार समाविष्ट आहेत. यामध्ये वायू व क्षेपणास्त्र संरक्षण, एअरोस्पेस व अंतराळ प्रणाली, सागरी सुरक्षा, आणि प्रगत संवाद तंत्रज्ञान यांचा समावेश आहे, असे व्हाईट हाऊसच्या माहितीपत्रकात म्हटले आहे. लॉकहीड मार्टिनच्या F-35 फायटर जेट्सचा समावेश या करारात आहे की नाही हे तत्काळ स्पष्ट झालेले नाही, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार याबाबत चर्चा सुरू आहे.
युवराज मोहम्मद यांनी सूचित केले की, “पुढील काही महिन्यांत अपेक्षित अधिक करारांमुळे एकूण व्यवहाराची किंमत 1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत जाऊ शकते.”
सौदी अरेबिया अनेक वर्षांपासून अमेरिकन लष्करी उपकरणांचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. हा संबंध एक अनौपचारिक समजुतीवर आधारित आहे, ज्यात सौदी अरेबिया तेलाच्या स्थैर्याची हमी देतो आणि त्याच्या बदल्यात अमेरिकन सुरक्षेची खात्री मिळते.
रियाध दौऱ्यानंतर, डोनाल्ड ट्रम्प बुधवारी कतार आणि गुरुवारी संयुक्त अरब अमिरातीत जाणार आहेत. सुरक्षा हा विषय महत्त्वाचा असला तरी, या दौऱ्याचा प्रमुख उद्देश आर्थिक संबंध मजबूत करणे व गुंतवणूक वाढवणे आहे.
या घोषणेसाठी झालेल्या उच्चस्तरीय गुंतवणूकदार परिषदेत, टेस्ला चे सीईओ एलॉन मस्क, ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन, ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक, आणि ब्लॅकस्टोनचे सीईओ स्टीफन श्वार्झमन यांसारख्या अमेरिकेतील प्रमुख उद्योगपतींची उपस्थिती होती.
या दरम्यान, ट्रम्प यांनी सौदी गुंतवणूक प्राधिकरणाचे प्रमुख यासिर अल-रुमय्यान, अरामकोचे सीईओ अमीन नास्सेर, आणि गुंतवणूक मंत्री खालिद अल-फालिह यांच्यासोबत संवाद साधला आणि सौदी अरेबियाच्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांचे मॉडेल्स पाहिले.
सौदी नेतृत्वाने “व्हिजन 2030” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यापक आर्थिक सुधारणांचा आराखडा तयार केला आहे, ज्याचा उद्देश देशाचे तेलावरील अवलंबित्व कमी करणे आहे. या व्हिजनचा मुख्य भाग म्हणजे NEOM — एक नियोजित भविष्यवादी शहर, जे बेल्जियमएवढ्या आकाराचे आहे. मात्र वाढत्या खर्चामुळे आणि तेलाच्या अनिश्चित उत्पन्नामुळे काही प्रकल्प कमी करावे लागले आहेत. गेल्यावर्षी तेलाने सौदी सरकारच्या एकूण उत्पन्नातील 62% वाटा उचलला होता.
टीम भारतशक्ती