अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, मंगळवारी सकाळी सौदी अरेबियात दाखल होणार असून, ते चार दिवसांच्या आपल्या ‘Gulf Tour’ला सुरुवात करतील. या दौऱ्यादरम्यान, गाझामधील युद्ध परिस्थिती आणि इराणच्या अणु कार्यक्रमासंदर्भातील तणाव, यांसारख्या सुरक्षा समस्यांपेक्षा मोठ्या आर्थिक करारांवर अधिक भर दिला जाणार आहे.
टेस्लाचे सीईओ आणि ट्रम्प यांचे सल्लागार एलोन मस्क, यांच्यासह अनेक प्रभावशाली अमेरिकन उद्योजक या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. ट्रम्प यांचा पहिला थांबा रियाध येथे असणार आहे, जिथे सध्या ‘सौदी-अमेरिका’ गुंतवणूक मंचाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी ट्रम्प कतारमध्ये असतील, तर गुरुवारी ते संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) भेट देणार आहेत.
गुरुवारीच डोनाल्ड ट्रम्प तुर्कस्तानमध्येही जाऊ शकतात, जिथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांच्यात प्रत्यक्ष चर्चा होण्याची शक्यता आहे.
हा गल्फ दौरा, ट्रम्प यांचा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरचा दुसरा परदेश दौरा आहे. त्यांच्या पहिल्या दौऱ्यात ते, रोम येथे पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते. मात्र, यावेळी जागतिक राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा दौरा होतो आहे. युक्रेन युद्धाबाबत तोडगा काढण्याबरोबरच, गाझामधील युद्धग्रस्त भागासाठी नवीन मदत यंत्रणा तयार करण्यावर आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना नवीन शस्त्रसंधी मान्य करण्यास भाग पाडण्यावर ट्रम्प प्रशासनाचा भर आहे.
शनिवार-रविवारी अमेरिका आणि इराणच्या चर्चांदरम्यान ओमानमध्ये इराणच्या अणु कार्यक्रमावर मर्यादा आणण्यासाठी एक संभाव्य करार साधण्यासाठी वाटाघाटी झाल्या. जर कूटनीती अयशस्वी ठरली, तर ट्रम्प यांनी लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे.
तरीदेखील, संभाव्य तुर्कस्तान भेट वगळता हे विषय डोनाल्ड ट्रम्प यांच्या या गल्फ दौऱ्याचा केंद्रबिंदू नाहीत.
संभाव्य गुंतवणुकी
अमेरिका, सौदी अरेबिया, कतार आणि संयुक्त अरब अमिराती मिळून अब्जावधी डॉलरची गुंतवणूक जाहीर करण्याची शक्यता आहे. सौदी अरेबियाने जानेवारी महिन्यातच अमेरिकेत पुढील चार वर्षांत $600 अब्ज गुंतवणुकीचे वचन दिले होते, पण ट्रम्प यांनी $1 ट्रिलियन (१ लाख कोटी डॉलर) गुंतवणुकीची मागणी करण्याचे जाहीर केले आहे.
मस्क व्यतिरिक्त, ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक आणि सिटीग्रुपच्या सीईओ जेन फ्रेझर हेही ट्रंप यांच्यासोबत दौऱ्यावर असणार आहेत. परराष्ट्र मंत्री व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मार्को रुबियो आणि संरक्षण मंत्री पीट हेगसेथ देखील अध्यक्षांसोबत प्रवास करतील.
रियाध येथे ट्रम्प सौदी अरेबियाला $100 अब्जांहून अधिक किंमतीचे शस्त्रसाठा देण्याची ऑफर देणार आहेत, ज्यामध्ये C-130 मालवाहू विमानांसह अत्याधुनिक शस्त्रांचा समावेश असेल.
सौदी अरेबिया आणि अमेरिका इस्रायल व रियाधमधील संबंध सामान्य करण्याच्या विषयावर चर्चा टाळण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांचे मध्यपूर्व दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, “अब्राहम करारांचा विस्तार लवकरच होईल अशी अपेक्षा आहे.” याच करारांतर्गत ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात युएई, बहारीन, सुदान आणि मोरोक्को यांनी इस्रायलला मान्यता दिली होती.
मात्र नेतान्याहू यांनी गाझामधील युद्ध कायमस्वरूपी थांबविण्यास व पॅलेस्टिनी राष्ट्र तयार करण्यास विरोध दर्शविल्यामुळे, रियाधसोबत अशा करारांबाबत प्रगती होण्याची शक्यता कमी आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
ट्रम्प यांचे कतार व युएईतील दुसरा आणि तिसरा थांबाही, प्रामुख्याने आर्थिक विषयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आहेतय
कतारचे राजघराणे या दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांना, खास ‘Airforce One’साठी सज्ज केलेले लक्झरी बोईंग 747-8 विमान भेट देण्याची शक्यता आहे. दरम्यान, ट्रम्प हे विमान त्यांच्या अध्यक्षीय ग्रंथालयासाठी दान करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)