गुजरातमधील गांधीनगर येथे 18 ते 22 ऑक्टोबर 2022 दरम्यान होणाऱ्या भारताच्या 12व्या डेफेक्स्पो 2022मध्ये अमेरिकेतील संरक्षण क्षेत्रातील प्रमुख कंपनी लॉकहीड मार्टिन संरक्षण क्षमता आणि उत्पादनांचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ प्रदर्शित करणार आहे. या वेळी, कंपनी एरोनॉटिक्स, रोटरी आणि मिशन सिस्टीमपासून क्षेपणास्त्र आणि अग्निशामक नियंत्रणापर्यंतच्या विविध क्षेत्रांमधील अत्युच्च तंत्रज्ञान क्षमतेचे सादरीकरण करणार आहे. यावर्षी प्रदर्शनात लॉकहीड मार्टिनचे प्राथमिक आकर्षण असेल ते तांत्रिकदृष्ट्या सर्वात प्रगत कॉम्प्लेक्स एरोस्ट्रक्चर – इंधन वाहून नेणारी ‘मेड इन इंडिया’ फायटर विंग.
या फायटर विंगची निर्मिती हैदराबादमधील टाटा लॉकहीड मार्टिन एरोस्ट्रक्चर्स लिमिटेडमध्ये (TLMAL) करण्यात आली आहे. TLMAL भारत सरकारच्या मेक इन इंडियाच्या उद्दिष्टांना पाठिंबा देणारी असून नवीन सुपर हर्क्युलस विमानात बसवल्या जाणार्या C-130J एम्पेनेज असेंब्लीचा एकमेव जागतिक पुरवठादार आहे. आजपर्यंत TLMALने 180पेक्षा अधिक C-130J Empanageची निर्मिती आणि निर्यात केली आहे.
भारत-अमेरिकेमधील मजबूत भागीदारीच्या वारशाचे प्रतीक असणारे C-130J सुपर हर्क्युलस एअरलिफ्टर देखील लॉकहीड मार्टिनच्या बूथवर ठेवण्यात येणार आहे. भारतीय हवाई दल या विमानाच्या ताफ्याचा वापर कार्गो वितरणापासून मानवतावादी सहाय्य प्रदान करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध मोहिमांसाठी करते. भारतीय हवाई दलाने कोविड-19 या महामारीच्या काळात मानवतावादी दृष्टीकोनातून मदत पुरवण्यासाठी आणि तौक्ते तसेच यास चक्रीवादळांमुळे बाधित झालेल्या भागांत कर्मचारी आणि मदत सामग्री पोहोचवण्यासाठी सुपर हर्क्युलस विमानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता.
एफ 21 लढाऊ विमाने
भारतीय हवाई दलाला F21 हे लढाऊ विमान सुपूर्द करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, कंपनी आपले हे उत्पादन प्रदर्शित करणार आहे. त्यामुळे प्रदर्शनात लॉकहीड मार्टिन हे प्रमुख आकर्षण बनेल, अशी आशा आहे. 4जी आणि 5जी तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन बनवलेले हे विमान भारतीय हवाई दलाच्या सर्व गरजा पूर्ण करण्याची क्षमता बाळगून आहे. शिवाय त्यामुळे मेक इन इंडियाअंतर्गतच नव्हे तर, प्रगत तंत्रज्ञानामध्येही अमेरिका-भारत सहकार्याच्या नवीन औद्योगिक संधी उपलब्ध करण्यालाही चालना मिळाली आहे. भारतीय हवाई दलाला – भारताकडून आणि भारतासाठी F21 लॉकहीड मार्टिनची प्रगत, स्केलेबल सिंगल-इंजिन लढाऊ विमाने पुरवण्यासाठी ही कंपनी वचनबद्ध असल्याचे यातून दिसते.
MH-60R ‘रोमियो’ मल्टी-मिशन हेलिकॉप्टर
भारतीय नौदलाने लॉकहीड मार्टिनकडून अलीकडेच विकत घेतलेले MH-60-R रोमियो मल्टी-मिशन हेलिकॉप्टर हे या शोचे आणखी एक खास आकर्षण असेल. MH-60R हे जगातील सर्वात प्रगत आरमारी हेलिकॉप्टर आहे; ज्यात हिंद महासागरामध्ये पाणबुडीविरोधी आणि युद्धनौकाविरोधी युद्धाचे विशेष कौशल्य विकसित केले आहे. MH-60R हे लॉकहीड मार्टिन आणि भारत-यूएस सहकार्याच्या मालिकेतील पुढचा टप्पा आहे. अमेरिकन नौदलाने 2021मध्ये पहिली तीन विमाने भारतीय नौदलाला सुपूर्द केली. जुलै-ऑगस्ट 2022मध्ये, अमेरिकी नौदलाने भारताला आणखी तीन हेलिकॉप्टर दिली आहेत; जी आधी कोची येथील नौदलाच्या INS गरुड एअर स्टेशनवर तैनात असतील. येत्या काही वर्षांत देशाला 24 MH-60R हेलिकॉप्टर मिळणार आहेत.
सुरक्षितता आणि विश्वासार्हतेच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट मानले जाणारे, S-92 हेलिकॉप्टर लॉकहीड मार्टिनच्या स्टॉलची शोभा वाढवणार आहे. S-92 हेलिकॉप्टरने अलीकडेच 2 दशलक्ष फ्लीट फ्लाईट अवर्स (उड्डाण तास) ओलांडले आहेत, जे या मल्टी-मिशन एअरक्राफ्टच्या विश्वासार्हतेचा पुरावा आहे.
जॅव्हलिन अँटी-टँक गायडेड मिसाइल सिस्टीम
जॅव्हलिन जॉइंट व्हेंचरचा एक भाग म्हणून लॉकहीड मार्टिन जॅव्हलिन अँटी-टँक गायडेड मिसाइल सिस्टीम देखील तयार करते. ही बहुउपयोगी आणि प्रभावी वन-मॅन-पोर्टेबल सिस्टीम आधुनिक युद्ध क्षेत्रात क्लोज कॉम्बॅटसारख्या विविध प्रकारच्या धोक्यांना सामोरे जाण्याची क्षमता प्रदान करते. फायर अँड फॉर्गेट टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला असून हे शस्त्र बाहेरून कोणतीही कमांड दिल्याशिवाय आपोआप आपल्या लक्ष्याचा भेद करते. यामुळे सैनिकांना शत्रूपासून कव्हर करण्यासाठी किंवा स्वत:ला रिपोझिशन करायला संधी मिळते. 65 मीटरपासून अगदी अनुकूल स्थितीत 4 किलोमीटरच्या टप्प्यात तसेच वातावरणातील आणि युद्धक्षेत्रातील प्रतिकूल परिस्थितीतही हे ऑपरेट करता येते, त्यामुळेच वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वातावरणात जॅव्हलिन प्रणालीचा वापर करता येऊ शकतो.
“भारताच्या धोरणात्मक सुरक्षा क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने तसेच देशांतर्गत सुरक्षाविषयक उत्पादनाच्या इकोसिस्टीमला चालना देण्याच्या दृष्टीने योगदान देण्यासाठी लॉकहीड मार्टिन वचनबद्ध आहे. टाटासोबतचे आमचे जॉइंट व्हेंचर्स तसेच अशोक लेलँड, लक्ष्मी मशीन वर्क्स, मिधानी, रॉसेल टेकसिस आणि सास्मोस यासारख्या अनेक भारतीय कंपन्यांबरोबर आमचे औद्योगिक संबंध असून भारत सरकारच्या संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाच्या यशस्वीतेचे हे उदाहरण आहे,” असे लॉकहीड मार्टिनचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विल्यम एल ब्लेअर यांनी डेफेक्स्पो 2022च्या निमित्ताने सांगितले.
डेफेक्स्पो 2022मध्ये सहभागी झाल्याने आम्हाला आमची अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी तसेच नावीन्यपूर्ण क्षमता संरक्षण तसेच एरोस्पेस पार्टनर्स आणि भारतातील आमच्या ग्राहकांना प्रत्यक्षात दाखवण्याची संधी मिळाली आहे, असे ब्लेअर म्हणाले. भारताची राष्ट्रीय सुरक्षा, स्वदेशी उत्पादन आणि ह्युमन कॅपिटल डेव्हलपमेन्ट अजेंडा यांची प्रगती साधण्याच्या दृष्टीने आमच्या ग्राहक तसेच औद्योगिक भागीदारांचा प्राधान्यक्रमाबाबत विचारविमर्श करण्याची देखील ही संधी आहे आणि त्याची आम्हाला प्रतीक्षा आहे, असेही ते म्हणाले.