पॅराग्वेचे अध्यक्ष सॅंटियागो पेना पॅलासिओस, यांनी सोमवारी भारतातील आपला पहिला अधिकृत दौरा सुरू केला. हा दौरा नवी दिल्लीच्या लॅटिन अमेरिकेशी वाढत्या संबंधांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा क्षण मानला जात आहे.
हा तीन दिवसीय दौरा, पॅराग्वेशी भारताची भागीदारी वेगाने पुढे नेईल, तसेच पश्चिम गोलार्धातील भारताच्या व्यापक धोरणाला बळकटी देईल, अशी अपेक्षा आहे. अध्यक्ष पेना यांचे स्वागत, नवी दिल्लीतील पालम विमानतळावर संपूर्ण राजकीय सन्मानासह करण्यात आले.
व्यापार, तंत्रज्ञान आणि ‘ग्लोबल साउथ’ अजेंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेत, अध्यक्ष पेना यांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी वैविध्यपूर्ण करण्याचा पॅराग्वेचा हेतू व्यक्त केला आणि भारताला दीर्घकालीन सहकार्याचा “नैसर्गिक भागीदार” म्हणून संबोधले.
“भारत आणि पॅराग्वे हे ‘ग्लोबल साउथ’चे अविभाज्य घटक आहेत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. “आपल्या आशा, आकांक्षा आणि आव्हाने एकसमान आहेत. परस्पर सहकार्याद्वारे आपण सामायिक समृद्धीचा मार्ग खुला करू शकतो,” असे मत मोदींनी व्यक्त केले.
दोन्ही नेत्यांनी यावेळी- डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, अवकाश तंत्रज्ञान, महत्त्वाच्या खनिजे, शेती आणि आरोग्य क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली.
ऊर्जेच्या क्षेत्रात, भारत ‘इंटरनॅशनल सोलर अलायन्स’द्वारे पराग्वेला आधीच मदत करत आहे. पॅराग्वेमधील 500 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पासाठी भारताची एनटीपीसी कंपनी तांत्रिक सल्लागार म्हणून मार्गदर्शन करत आहे. पुढील टप्प्यात दोन्ही देश ग्रीन हायड्रोजन आणि जैवइंधन यावर लक्ष केंद्रित करत आहेत.
पॅराग्वे आणि भारताचे लॅटिन अमेरिका धोरण
व्यापारविषयक चर्चा या दौऱ्यात केंद्रस्थानी होत्या. पराग्वेने दक्षिण अमेरिकेच्या MERCOSUR (व्यापार गट) सोबत भारताच्या वाढत्या भागीदारीला पाठिंबा दर्शवला. जरी नवीन व्यापार करार झालेला नसला तरी MERCOSUR सदस्य देशांसोबत प्राधान्य व्यापार करार विस्तारित करण्याच्या चर्चा सुरू आहेत.
परराष्ट्र मंत्रालयातील सचिव (पूर्व) पेरियासामी कुमारन म्हणाले की: “पॅराग्वे स्वतःला दक्षिण अमेरिकेतील मोठ्या बाजारपेठांसाठी एक ‘ब्रिज’ म्हणून प्रेझेंट करत आहे.” भारतीय कंपन्यांनी पॅराग्वेला केवळ एक गंतव्य नव्हे, तर व्यापाराचा नवा मंच म्हणून पाहावे, याकरता अध्यक्ष पेना त्यांना प्रोत्साहित करत आहेत.
“भारत MERCOSUR सोबतच India-CELAC संवाद व्यासपीठाद्वारेही, लॅटिन अमेरिकेत आपली उपस्थिती मजबूत करत आहे. भारतीय निर्यात, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भागीदारीसाठी लॅटिन अमेरिका हे एक मोठे संधी क्षेत्र आहे.”
CELAC (लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन राष्ट्रांचा समुदाय) या संघटनेचा सदस्य असलेला पराग्वे भारताच्या संरचित भागीदारीचा भाग आहे. भारताने २०२३ मध्ये तिसरी India-CELAC परराष्ट्र मंत्र्यांची बैठक ऑनलाइन आयोजित केली होती. फार्मा, फिनटेक आणि शाश्वत विकास यासारख्या क्षेत्रांतील सहकार्यावर दोन्ही बाजूंनी काम सुरू आहे.
IDB सदस्यत्वाबद्दल कोणतीही चर्चा नाही
StratNews Global च्या प्रश्नाला उत्तर देताना, भारत ‘इंटर-अमेरिकन डेव्हलपमेंट बँक’ (IDB) मध्ये सामील होईल का, याबद्दल परराष्ट्र सचिव कुमारन यांनी स्पष्ट केले की, “भारताने धोरणात्मक स्तरावर रस दाखवला असला तरी, “या दौऱ्यात यावर विशेष चर्चा झाली नाही.” मात्र, IDB सदस्य देशांबरोबर, विशेषतः पराग्वेबरोबर सह-वित्तीय विकास प्रकल्पांवर भारत लक्ष ठेवून आहे.
अध्यक्ष पेना, यांनी बहुपक्षीय संस्थांनी जागतिक वास्तवाशी सुसंगत बदल करावेत अशी भूमिका घेतली असून, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह जागतिक वित्तीय संस्थांचे सुधारणा करण्याच्या मुद्द्यावर भारत व पराग्वे यांच्यात सामंजस्य आहे.
अवकाश, संरक्षण आणि अंतर्गत जलमार्ग
भारत आणि पॅराग्वे यांच्यात अवकाश सहकार्याचा चौकट करार अंतिम टप्प्यात आहे. “पॅराग्वे ISRO कडून मदतीची अपेक्षा करत असून, भारताने विकसित केलेल्या स्वस्त आणि कार्यक्षम लघुग्रह उपग्रह प्रणालीपासून शिकण्यास इच्छुक आहे,” असे कुमारन यांनी सांगितले.
“संरक्षण सहकार्य अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असले तरी, पॅराग्वे अंतर्गत जलमार्ग सुरक्षेवर लक्ष केंद्रित करत आहे. भारताच्या कमी खर्चिक, पण प्रभावी तंत्रज्ञानाचा पॅराग्वे वापर करू इच्छित आहे,” असेही ते म्हणाले.
“परंपरागत नसलेल्या सुरक्षेच्या क्षेत्रात, जसे की नदी सुरक्षा आणि आपत्ती प्रतिसाद, भारताच्या विश्वासार्ह संरक्षण तंत्रज्ञानाला पॅराग्वे मान्यता देत आहे,” असे कुमारन म्हणाले. प्रशिक्षण देवाणघेवाणीचे विस्तार आणि लघु-स्तरीय उपकरण खरेदीबाबत चर्चा सुरू आहे.
पॅराग्वे व्यापारासाठी प्रामुख्याने नद्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे, भारताच्या ‘Inland Waterways Authority’ सोबत तांत्रिक सहकार्य व ज्ञान देवाणघेवाण करण्यासाठी चर्चा सुरू झाली आहे.
शिक्षण, औषधनिर्माण आणि इतर भागीदारी
भारत आणि पॅराग्वे, यांनी शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यावर सहमती दर्शवली. पराग्वेतील ग्रामीण भागांसाठी भारताच्या डिजिटल शिक्षण प्रणालीचा उपयोग कसा करता येईल, यावर चर्चा झाली. अभ्यासक्रम विकास, शिक्षक प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा सुधारणे यांचा त्यात समावेश आहे.
पॅराग्वेच्या नेत्यांनी भारतीय कंपन्यांना कृषी-तंत्रज्ञान, औषधनिर्माण, नवीकरणीय ऊर्जा आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आमंत्रण दिले.
पंतप्रधान मोदींनी, लॅटिन अमेरिकेत भारतीय औषध कंपन्यांची वाढती उपस्थिती याचा उल्लेख केला आणि भारतीय औषध मानकांना पराग्वेच्या मान्यतेचे स्वागत केले. पारंपरिक औषध आणि योगाचा प्रचार हाही चर्चेचा भाग होता.
UPL, आदित्य बिर्ला आणि रॉयल एनफिल्ड यांसारख्या भारतीय कंपन्या पॅराग्वेत आधीच कार्यरत आहेत. पॅराग्वे हे भारतासाठी ब्राझील, अर्जेंटिना आणि दक्षिण अमेरिकेच्या विस्तृत बाजारपेठेत प्रवेशाचे प्रवेशद्वार ठरू शकते.
व्यापक लॅटिन अमेरिका दृष्टिकोन
अध्यक्ष पेना यांचा दौरा, लॅटिन अमेरिकेतील भारताच्या विविध राजनैतिक उपक्रमांनंतर येतो. यामध्ये कॅरिबियन देशांतील अलीकडील संपर्क आणि India-CELAC परराष्ट्र मंत्र्यांच्या संवादाची भूमिका महत्त्वाची आहे. भारत अन्न सुरक्षा, हरित ऊर्जा आणि डिजिटल पब्लिक गुड्स या क्षेत्रांतील सहकार्याद्वारे स्थानिक पुरवठा साखळीतही आपली उपस्थिती वाढवत आहे.
“लॅटिन अमेरिका हे भारतासाठी दीर्घकालीन व्यापार आणि विकास उद्दिष्टांसाठी एक धोरणात्मक भाग आहे,” असे सचिव कुमारन म्हणाले. “अध्यक्ष पेना यांचा दौरा भारताला एक स्थिर, विश्वासार्ह आणि नाविन्यपूर्ण भागीदार म्हणून पाहण्याचा वाढता कल दर्शवतो,” असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदींनी, अध्यक्ष पेना यांच्या पॅराग्वे दौऱ्याचे निमंत्रण स्विकारले असून, भारताच्या पंतप्रधानांचा पॅराग्वेला पहिल्यांदाच होणारा दौरा आयोजित करण्यासाठी दोन्ही देशांचे अधिकारी योजना आखत आहेत.
By Huma Siddiqui