युक्रेनच्या ईशान्य खार्किव प्रदेशात मंगळवारी रात्रीच्या वेळी झालेल्या रशियन हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून उत्तरेकडील चेर्निहिव्ह शहरात अनेकजण जखमी झाल्याचे निवेदन स्थानिक युक्रेनियन अधिकाऱ्यांनी दिले.
रशियाच्या सीमेवर असलेल्या खार्किव प्रदेशातील बालाकलिया या छोट्या शहरात एका खाजगी उद्योगाच्या ठिकाणावर हल्ला झाला, ज्यामध्ये एक कर्मचारी ठार झाला असून अनेक जण जखमी झाले, असे शहराच्या लष्करी प्रशासनाचे प्रमुख विटाली काराबानोव्ह यांनी टेलिग्राम मेसेजिंग ॲपवर सांगितले.
“शहरावर मोठा यूएव्ही (मानवरहित हवाई वाहन) हल्ला झाला,” काराबानोव्ह म्हणाले. मात्र या हल्ल्यांची तीव्रता किती होती याची माहिती त्यांनी दिली नाही.
शांतता चर्चेसाठी तुर्कीमध्ये रशियन आणि युक्रेनियन शिष्टमंडळांची भेट झाल्यानंतर काही तासांतच हे हल्ले झाले. या शांतता चर्चेत कीव्हने मोठ्या प्रमाणात नवीन भूभाग सोडून दिला आणि आपल्या सैन्याचा आकार मर्यादित केला तरच आपण युद्ध संपवण्यास सहमत होऊ असे रशियाने स्पष्ट केले होते.
युक्रेनने रशियाच्या अटी वारंवार नाकारल्या असून या अटी स्वीकारणे म्हणजे शरण येण्यासारखे आहे असे मत त्याने व्यक्त केले आहे.
निवासी क्षेत्रांवर ड्रोनहल्ले
चेर्निहिव्हच्या उत्तरेकडील शहरातील रस्त्यांवर आणि निवासी इमारतींवर ड्रोन पडल्याने घरांसह अनेक ठिकाणी आग लागली, असे शहराच्या लष्करी प्रशासनाचे प्रमुख दिमित्र ब्रायझिन्स्की यांनी टेलिग्रामवर सांगितले.
ब्रायझिन्स्की म्हणाले की, चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेने सांगितले की, आठ मुलांसह आणखी 20 जणांना घटनास्थळी वैद्यकीय मदत देण्यात आली.
आपात्कालीन सेवेने त्यांच्या टेलिग्राम अकाउंटवर अंधारात आगीशी झुंजणारे अग्निशमन दलाचे जवान आणि मुलांच्या गटाची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांचे फोटो पोस्ट केले आहेत.
दक्षिणेकडील बंदर शहर ओडेसामध्ये, रात्रभर झालेल्या रशियन हवाई हल्ल्यांमुळे निवासी इमारती आणि नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान झाले, मात्र कोणालाही दुखापत झाली नाही, असे महापौर हेनाडी ट्रुखानोव्ह यांनी टेलिग्रामवर लिहिले.
युक्रेनवर रात्रीच्या वेळी झालेल्या रशियन हल्ल्याचे नेमके प्रमाण किती होते ते लगेच कळू शकले नाही. मॉस्कोकडून तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही आणि युक्रेनियन अहवालांची पडताळणी करता आली नाही.
फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने सुरू केलेल्या युद्धात नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप दोन्ही बाजूंनी नाकारला आहे. परंतु या संघर्षात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे, त्यातील बहुतेक युक्रेनियन आहेत.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)