राष्ट्राध्यक्ष पुतीन म्हणाले की, युक्रेनमधील युद्धावर शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या चीनच्या योजनेला रशियाने पाठिंबा दिला आहे.
शिन्हुआला दिलेल्या मुलाखतीचा काही भाग बुधवारी प्रसिद्ध झाला आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष चीनला भेट देणार असून त्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत घेण्यात आली आहे. पुतीन गुरुवारी दोन दिवसांच्या स्टेट व्हिजीटसाठी चीन दौऱ्यावर जाणार आहेत.
पुतीन यांनी नुकतीच रशियाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांचा पाचवा कार्यकाळ नुकताच सुरू झाला आहे. सूत्रे हाती घेतल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. आफ्रिका, मध्य पूर्व आणि दक्षिण अमेरिकेत वर्चस्व प्राप्त करण्याचा नाटो संघटनेचा प्रयत्न सुरू आहे. तसाच प्रयत्न चीन आणि रशियाचा देखील आहे. त्यामुळे पुतीन यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी 2022 मध्ये उभय देशांमधील ‘नो लिमिट’ भागीदारीची घोषणा केली होती. संकटावर तोडगा काढण्याच्या शी जिनपिंग यांच्या प्रयत्नांचेही पुतीन यांनी कौतुक केले आहे.
शी यांनी साधारण वर्षभरापूर्वी 12 कलमी अहवाल मांडला होता, परंतु त्यात युद्ध संपवण्याच्या दृष्टीने मांडण्यात आलेले मुद्दे अत्यंत सामान्य होते.
“युक्रेनच्या संकटावर तोडगा काढण्याच्या चीनच्या दृष्टिकोनाबाबत रशिया सकारात्मक आहे,” असे पुतीन म्हणाले.
या मुलाखतीचे क्रेमलिनच्या संकेतस्थळावर रशियन भाषेतील ट्रान्सस्क्रीप्ट उपलब्ध झाले आहे. आपल्या मुलाखतीत पुतीन म्हणाले, “बीजिंगमध्ये त्यांना त्याची मूळ कारणे आणि त्याचा जागतिक भू-राजकीय अर्थ खरोखर समजतो.”
जिनपिंग यांच्या शांतता योजनेला पाश्चिमात्य देशांमध्ये फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. अमेरिकेने म्हटले की चीन ‘शांतता प्रस्थापित करणारा’ अशा भूमिकेत स्वतःला जरी सादर करत असला, तरी त्यातून रशियाचे ‘खोटे कथन’ करणारा देश असेच प्रतिबिंबित होताना दिसत आहे.
याशिवाय या आक्रमणाचा निषेध करण्यात चीन अपयशी ठरल्याबद्दलही अमेरिकेने चीनवर हल्ला चढवला आहे.
जिनपिंग यांनी रशिया युक्रेनमधील परिस्थिती “थंड” करण्याचे, शांतता पुनर्प्रस्थापित करण्याचे, जागतिक स्थैर्य निर्माण करण्याचे तसेच जागतिक अर्थव्यवस्थेवरील ताण कमी करण्याचे आवाहन केले आहे.
याउलट युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी मांडलेल्या शांतता योजनेला पाश्चिमात्य देश पाठिंबा देत आहेत. त्यांच्या दहा कलमी शांतता सूत्रात रशियन सैन्याने माघार घेणे, 1991 नंतरच्या सोव्हिएत सीमेची पुनर्स्थापना करणे आणि रशियाला त्याच्या कृत्यासाठी जबाबदार धरण्याची मागणी केली आहे.
रशियाने मात्र झेलेन्स्की यांची हीशांतता योजना नाकारली आहे.
येत्या जूनमध्ये पाश्चिमात्य देशांनी स्वित्झर्लंडमध्ये ‘शांतता शिखर परिषदे’चे आयोजन केले आहे. मात्र या परिषदेचे रशियाला निमंत्रण दिलेले नाही.
दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष चीनला या परिषदेत सहभागी करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
अश्विन अहमद
(रॉयटर्स)