रशिया आणि युक्रेनचे प्रतिनिधी, सोमवारी (2 जून) इस्तंबूलमध्ये, 2022 नंतरच्या त्यांच्या दुसऱ्या प्रत्यक्ष शांतता चर्चेसाठी भेटणार आहेत. मात्र, या संघर्षाच्या समाप्तीबाबत दोन्ही बाजूंमध्ये अद्याप खोल मतभेद आहेत आणि दुसरीकडे लढाई देखील अजून तीव्र होत चालली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात शांतता निर्माण करावी अशी मागणी केली आहे, पण आतापर्यंत कोणतीही शांतता कराराची चिन्हे दिसत नाहीत. व्हाइट हाउसने वारंवार इशारा दिला आहे की, “जर दोन्ही बाजू अशाचप्रकारे हट्ट करत राहिल्या, तर अमेरिका या युद्धातून मागे हटेल”.
16 मे रोजी झालेल्या शांतता बैठकीच्या पहिल्या फेरीत, युद्धातील सर्वाधिक कैद्यांची अदलाबदल झाली होती, मात्र शांतता कायम करण्याची कोणतीही निश्चित वाट सापडली नव्हती. चर्चेदरम्यान, अगदी तात्पुरत्या युद्धविरामाचाही उल्लेखही नव्हता, कारण दोन्ही बाजूंनी फक्त त्यांच्या प्राथमिक अटी मांडल्या होत्या.
दुसऱ्या फेरीत, युक्रेन सहभागी होईल का यावर अनिश्चितता असतानाच, अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी सांगितले की, ‘संरक्षण मंत्री रुस्तेम उमेरोव्ह हे इस्तंबूलमध्ये रशियन अधिकाऱ्यांना भेटतील.’
या फेरीत, रशियन प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व, क्रेमलिनचे सल्लागार व्लादिमीर मेडिन्स्की करणार आहेत. त्यांनी पहिल्या फेरीनंतर फ्रेंच सेनापती नेपोलियन बोनापार्ट यांचा हवाला देत सांगितले होते की, ‘युद्ध आणि वाटाघाटी एकाच वेळी चालू शकतात.’
रविवारी, युक्रेनने युद्धांतर्गत एक अतिशय धाडसी हल्ला करत, सायबेरियामधील रशियन अण्वस्त्रक्षम दीर्घ-पल्ल्याच्या बॉम्बफेक करणाऱ्या विमानांवर आणि इतर लष्करी तळांवर लक्ष्य साधले. याचवेळी क्रेमलिनने युक्रेनवर एकाच रात्रीत 472 ड्रोन हल्ले केले, ही युद्धातील आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रोन कारवाई असल्याचे युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले.
या प्रत्यक्ष चर्चेची कल्पना प्रथम रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मांडली होती, जेव्हा युक्रेन व युरोपीय देशांनी त्यांच्याकडे युद्धविराम मान्य करण्याची मागणी केली होती, मात्र क्रेमलिनने ती फेटाळली होती.
पुतिन म्हणाले होते की, “रशिया संभाव्य शांतता कराराची रूपरेषा असलेले एक दस्तऐवज तयार करेल आणि त्यानंतरच युद्धविरामावर चर्चा होईल.”
युक्रेनने सांगितले की, “त्यांना अजून रशियाच्या बाजूने कोणताही मसुदा प्राप्त झालेला नाही.”
मेडिन्स्की यांनी रविवारी सांगितले की, “रशियाने युक्रेनकडून मसुदा प्राप्त केला असून क्रेमलिन सोमवारी त्यावर प्रतिक्रिया देईल.”
ट्रम्प यांचे प्रतिनिधी कीथ केलॉग यांनी सांगितले की, “दोन्ही बाजू इस्तंबूलमध्ये त्यांचे स्वतंत्र दस्तऐवज सादर करतील, ज्यात त्यांच्या शांततेच्या अटींचा उल्लेख असेल. मात्र, तीन वर्षांच्या युद्धानंतर दोन्ही बाजू अजूनही एकमेकांपासून दूर आहेत.”
केलॉग यांच्या मते, ‘अमेरिकाही या चर्चेत सहभागी होईल आणि ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीचे प्रतिनिधीही सहभागी होतील.’ मात्र, अमेरिका कोणत्या स्तरावर सहभागी होईल हे स्पष्ट झालेले नाही.
झेलेन्स्की यांनी रविवारी जारी केलेल्या आदेशानुसार, युक्रेनच्या प्रतिनिधीमंडळात उपपरराष्ट्रमंत्री, काही लष्करी व गुप्तचर अधिकारी असतील.
पुतिन यांच्या अटी
गेल्यावर्षी जूनमध्ये, पुतिन यांनी युद्ध तत्काळ थांबवण्याच्या अटी मांडल्या होत्या: युक्रेनने नाटोमध्ये सामील होण्याचा विचार सोडावा आणि रशिया ज्या चार युक्रेनियन प्रदेशांवर दावा करतो तिथून युक्रेनच्या सर्व लष्कराने माघार घ्यावी.
युक्रेनियन प्रतिनिधी इस्तंबूलमध्ये रशियन बाजूकडे एक प्रस्तावित मार्गनकाशा सादर करतील, ज्यात दीर्घकालीन शांतता कराराचा आराखडा दिला आहे.
त्या दस्तऐवजानुसार, शांतता करारानंतर युक्रेनच्या लष्करी क्षमतेवर कोणतेही निर्बंध असणार नाहीत, रशियाने बळकावलेल्या युक्रेनच्या भागांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर रशियन सार्वभौमत्व मान्य केले जाणार नाही, आणि युक्रेनसाठी भरपाईची मागणी असेल.
दस्तऐवजात पुढे सांगितले आहे की, सध्याचा युद्धाचा आघाडीचा रेषा हा प्रादेशिक वाटाघाटींसाठी प्रारंभबिंदू असेल.
सध्या रशिया युक्रेनच्या सुमारे पाचव्या भागावर (सुमारे 1,13,100 चौ. किमी) नियंत्रण ठेवतो – जे अमेरिकेच्या ओहायो राज्याइतके क्षेत्रफळ आहे.
2022 मध्ये, पुतिन यांनी हजारो सैन्य घेऊन युक्रेनवर आक्रमण केले होते. त्याआधी आठ वर्षे रशियन समर्थित फुटीरतावादी आणि युक्रेनियन लष्करामध्ये पूर्व युक्रेनमध्ये लढाई सुरू होती. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, २०२२ पासून आतापर्यंत 12 लाखांहून अधिक लोक मारले गेले किंवा जखमी झाले आहेत.
ट्रम्प यांनी पुतिन यांना ‘क्रेझी’ असे संबोधले आहे आणि झेलेन्स्की यांच्यावरही व्हाईट हाऊसमध्ये टीका केली आहे. मात्र, त्यांनी असेही म्हटले आहे की, ‘दोन्ही देशात शांतता प्रस्थापित शक्य आहे आणि पुतिन यांनी जर उशीर केला, तर ते रशियावर कठोर निर्बंध लादू शकतात.’
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)