अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी बुधवारी इस्रायल सरकारला आवाहन केले की, “पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावरचा भ्रष्टाचार खटला तात्काळ रद्द करण्यात यावा किंवा त्यांना माफ करण्यात यावे.” “अमेरिकेने जसे इस्रायलला वाचवले, तसेच ते नेतान्याहू यांनाही सहाय्य करेल,” असेही ट्रम्प म्हणाले.
नेतान्याहू यांच्यावर 2019 मध्ये लाचखोरी, फसवणूक आणि जनतेचा विश्वासभंग केल्याचे आरोप लावण्यात आले होते, जे त्यांनी फेटाळले आहेत. हा खटला 2020 मध्ये सुरू झाला, ज्यात तीन वेगवेगळ्या फौजदारी प्रकरणांचा समावेश आहे. आपण स्वतः निर्दोष असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले आहे.
ट्रम्प यांनी Truth Social प्लॅटफॉर्मवर लिहिले की: “बेंजामिन नेतान्याहू यांचा खटला तात्काळ रद्द केला जावा किंवा त्यांना माफी दिली जावी, त्यांनी इस्रायलसाठी आजवर खूप काही केले आहे.”
त्यांनी असेही नमूद केले की, नेतान्याहू यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे.
इस्रायली प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, नेतान्याहू यांची उलटतपासणी 3 जूनपासून तेल अवीवमधील न्यायालयात सुरू झाली असून, ती एक वर्षभर चालण्याची शक्यता आहे.
माफीची शक्यता कमी
इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष इसाक हर्झोग, यांच्याकडे नेतान्याहू यांना माफ करण्याचा अधिकार आहे. मात्र, स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांनी स्पष्ट केले की, “सध्या माफीचा प्रश्नच नाही आणि असा कोणताही औपचारिक अर्जही करण्यात आलेला नाही.ठ
ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना ‘योद्धा’ असे संबोधत आपल्या पोस्टमध्ये लिहीले की: “अमेरिकेने इस्रायलला वाचवले आहे आणि आता अमेरिकाच नेतान्याहूंनाही वाचवेल.”
या विधानात, त्यांनी इस्रायलच्या इराणविरोधी लष्करी कारवायांमधील अमेरिकेच्या मदतीचे संकेत दिले.
मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांचे हे विधान प्रत्यक्षात कायदेशीरदृष्ट्या नेतान्याहूंना कितपत मदतगार ठरेल, हे स्पष्ट नाही. त्यांनी नेतान्याहूंविरोधातील खटल्याला ‘Witch hunt’ (राजकीय सूडासाठी चालवलेली कारवाई) असे संबोधले. हेच विशेषण शब्द ट्रम्प स्वतःवर सुरू असलेल्या खटल्यांसाठीही वापरत असतात.
एका बाजूला नेतान्याहू यांची बाजू घेताना, दुसरीकडे ट्रम्प यांनी मंगळवारी मात्र इस्रायलच्या युद्धोत्तर कारवायांवर टीका केली होती.
ते म्हणाले की, “जसा आमचा करार झाला, तसेच इस्रायलने बाहेर येऊन इतका मोठा बॉम्बवर्षाव केला की मी कधी पाहिले नव्हते. मी इस्रायलवर नाराज आहे.”
इराण आणि इस्रायलबाबत बोलताना त्यांनी म्हटले की: “ते एकमेकांविरोधा इतका काळ आणि इतक्या तीव्रतेने लढले आहेत, की त्यांना आता कळतही नाहीये की ते आता काय करत आहेत.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)