संयुक्त राष्ट्राच्या मोहिमेत हुतात्मा झालेल्या वीरांना अभिवादन
दि. २९ मे: संयुक्त राष्ट्राकडून जगातील विविध संघर्षग्रस्त देशांत सुरु असलेल्या शांतता प्रस्थापित करण्याच्या मोहिमांत हुतात्मा झालेल्या वीर जवान आणि अधिकाऱ्यांना अभिवादन करीत भारतीय लष्कराकडून आज, बुधवारी आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतीदूतदिन (इंटरनॅशनल डे ऑफ यूएन पीसकीपर्स) साजरा करण्यात आला. या वेळी लष्कराचे उपप्रमुख (माहिती व समन्वय) लेफ्टनंट जनरल राकेश कपूर, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी आणि संयुक्त राष्ट्राच्या विविध संस्थांचे अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. २९ मे १९४८ रोजी संयुक्त राष्ट्राची पहिली शांतता मोहीम ‘संयुक्त राष्ट्र संधी निरीक्षण संघटना’ या नावाने पॅलेस्टाईनमध्ये सुरु करण्यात आली होती, त्याची स्मृति म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.
On the 76th anniversary of #UNPeacekeepersDay, #IndianArmy salutes the professionalism, dedication & courage of all Peacekeepers serving in UN Peacekeeping Missions and also pays tribute to those who have laid down their lives for the cause of peace.@UN@UNPeacekeeping… pic.twitter.com/BefpIYg9zI
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) May 29, 2024
संयुक्त राष्ट्राकडून सुरु असलेल्या जगभरातील शांतता मोहिमांत काम केलेल्या किंवा करीत असलेल्या शांतीदुतांबद्दल सहवेदना व्यक्त करण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि जगभरातील देशांकडून हा दिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो. तसेच, संघर्षग्रस्त भागांत शांतता प्रस्थापित करताना आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सैनिकानीची स्मृति आजच्या दिवशी जागविण्यात येते. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांत भारताने मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. या मोहिमात भारताने सर्वाधिक सैनिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी विविध देशांत संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून तैनात केले आहेत. आत्तापर्यंत भारताने अशा मोहिमांमध्ये दोन लाख ८७ हजार सैनिक पाठविले आहेत. भारतीय सैनिकांनी अतिशय कठीण आणि खडतर भागांत काम करून असामान्य धैर्य आणि वीरतेचा परिचय अशा मोहिमांत दिला आहे. या मोहिमांत वीरगती प्राप्त झालेल्या भारतीय सैनिकांची संख्याही मोठी आहे. आत्तापर्यंत या शांतता मोहिमांत १६० भारतीय सैनिकांनी सर्वोच्च बलिदान केले आहे. सध्या भारतीय सैनिक जगभरातील सिरीया (यूएनडीओएफ), लेबनॉन, पॅलेस्टाईन (अरब-इस्त्राईल संघर्ष), सायप्रस, काँगो, दक्षिण सुदान, अबेयी, मध्य आफ्रिका, पश्चिम सहारा आधी नऊ देशांत संयुक्त राष्ट्र शांतीसेनेत तैनात आहेत.
भारताने या शांतता मोहिमांत सहभागी होताना संयुक्त राष्ट्र, यजमान देश आणि भागीदार देश अशा सर्वांच्या क्षमतावृद्धीसाठीही कार्य केले आहे. या मोहिमांना सहकार्य करण्यासाठी चपळ आणि लवचिक सैन्यतुकड्या पाठवून भारताने नेहेमीच पतीम्बा दिला आहे. तसेच, शांतीपथकातील सैनिकांचे प्रशिक्षण, रसद पुरवठा, लिंग समभाव जागृती, तांत्रिक मदत, यजमान देशाला मदत, पायाभूत सुविधांची निर्मिती, नागरी-लष्करी सहकार्य आदी बाबतीत महत्त्वाचे कार्य केले आहे. त्याचबरोबर लष्कराबरोबर पशुवैद्यकीय तुकड्या पाठवून स्थानिक शेतकरी, मेंढपाळ यांनाही भारताने मदत केली आहे. पशुवैद्यकीय तुकडीचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल गुरप्रीत बाली यांना या कार्याबद्दल संयुक्त रस्त्राने सन्मानितही केले आहे. या सैनिकांना शांतता मोहिमेबाबत प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय लष्कराने नवी दिल्लीत एका केंद्राची (सीयूएनपीके) स्थापनाही केली आहे. या केंद्रातून दरवर्षी सुमारे १२ हजार सैनिकांना प्रशिक्षण दिले जाते.
विनय चाटी
(पीआयबी ‘इनपुट्स’सह)