मंगळवारी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, $175 अब्ज डॉलर्स खर्चाच्या ‘Golden Dome’ क्षेपणास्त्र संरक्षण कवच योजनेसाठी, एक डिझाईन निवडल्याचे जाहीर केले. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी, त्यांनी स्पेस फोर्सचे जनरल मायकेल गुएटलेन यांची मुख्य कार्यक्रम व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली. ही योजना चीन आणि रशियाकडून उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आखण्यात आली आहे.
ट्रम्प यांनी जानेवारी महिन्यात या योजनेची कल्पना दिली होती. ‘Golden Dome Missile’ योजनेअंतर्गत शेकडो उपग्रहांचे जाळे तयार केले जाईल, जे क्षेपणास्त्रांचा शोध, मागोवा आणि हस्तक्षेपाच्या कार्यात मदत करेल.
व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत, ट्रम्प यांनी सांगितले की, “गोल्डन डोम आपल्या मातृभूमीचे संरक्षण करेल.” यावेळी त्यांनी कॅनडानेही यामध्ये सहभागी व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी, यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही अमेरिकेशी एक नवीन सुरक्षा व आर्थिक भागीदारी निर्माण करण्यावर चर्चा करत आहोत. यात NORAD व गोल्डन डोमसारख्या योजना नैसर्गिकरित्या अंतर्भूत आहेत.”
राजकीय छाननी आणि निधीची अनिश्चितता
या योजनेचा अंदाजित खर्च $175 अब्ज डॉलर्स असून, 2029 च्या सुरुवातीपर्यंत ती कार्यान्वित करण्याचा ट्रम्प यांचा मानस आहे. मात्र उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ याबाबत साशंक आहेत.
CSIS चे टॉम कराको म्हणाले की, “$175 अब्ज डॉलर्स ही रक्कम नव्याने समोर आली असली, तरी ती कोणत्या कालखंडासाठी आहे हे अजून स्पष्ट नाही. बहुधा ती 10 वर्षांची योजना असावी.”
काँग्रेसनल बजेट ऑफिसने यावर्षी असा अंदाज व्यक्त केला की, ही योजनेचा खर्च पुढील 20 वर्षांत $831 अब्ज डॉलर्सपर्यंत जाऊ शकतो.
लोकशाही पक्षाचे काही खासदार, एलॉन मस्कच्या स्पेसएक्स आणि पालंटिअर व अँड्युरिल यांच्या योजनेतील सहभागाविषयी चिंता व्यक्त करत आहेत. हे सर्व ट्रम्प यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात.
सिनेटर केविन क्रेमर म्हणाले, “ही नवी संरक्षण व्यवस्था सिलिकॉन व्हॅलीशी संबंधित आहे, ‘बिग मेटल’शी नव्हे.” (‘बिग मेटल’ म्हणजे जुने परंपरागत संरक्षण ठेकेदार.)
इस्रायलच्या Iron Dome वर आधारित, अधिक व्यापक संकल्पना
‘Golden Dome’ ही संकल्पना इस्रायलच्या लँड-बेस्ड Iron Dome प्रणालीवर आधारित असली, तरी ती कित्येक पटीने मोठी आणि व्यापक आहे. यात शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करणारे उपग्रह, तसेच गहन निरीक्षण करणारे उपग्रह असतील.
या घोषणेनंतर, पेंटॅगॉनने या क्षेपणास्त्र प्रणालीसाठी चाचण्या घेणे आणि खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे.
अलास्का, फ्लोरिडा, जॉर्जिया आणि इंडियाना यांना या प्रकल्पामुळे आर्थिक व औद्योगिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
संभाव्य कंत्राटदार आणि निधी
प्रारंभिक उपकरणे प्रस्थापित उत्पादन यंत्रणांमधूनच घेतली जाणार आहेत. पत्रकार परिषदेत L3Harris Technologies, Lockheed Martin आणि RTX Corp या कंपन्यांची नावे संभाव्य कंत्राटदार म्हणून घेण्यात आली.
L3Harris ने फोर्ट वेन, इंडियाना येथील सुमारे $150 दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणुकीतून एक केंद्र विकसित केले आहे, जेथे Hypersonic आणि Ballistic Tracking Space Sensor उपग्रह तयार होतात. हे उपग्रह गोल्डन डोममध्ये रुपांतरित केले जाऊ शकतात.
गोल्डन डोमसाठी, प्रारंभिक $25 अब्ज डॉलर्सचा निधी रिपब्लिकन खासदारांनी प्रस्तावित केला आहे, जो $150 अब्जच्या व्यापक संरक्षण पॅकेजचा भाग आहे. मात्र, हा निधी काँग्रेसमधील वादग्रस्त ‘reconciliation’ विधेयकावर अवलंबून आहे.
“जोपर्यंत reconciliation विधेयक मंजूर होत नाही, तोपर्यंत गोल्डन डोमसाठी निधी उपलब्ध होणार नाही,” असे एका संरक्षण उद्योगातील अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले. यामुळे संपूर्ण प्रकल्पाचे वेळापत्रक धोक्यात येऊ शकते, अशी चिंता वर्तवली जात आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)