अमेरिकेने पाकिस्तानच्या लांब पल्ल्याच्या ‘क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात’ सहभागी झालेल्या, चार पाकिस्तानी संस्थावर निर्बंध घालण्याची घोषणा केली आहे. यावरुन राज्य विभागाने सामूहिक नाश करणाऱ्या शस्त्रांच्या प्रसाराबाबत चिंता व्यक्त केली आहे.
कार्यकारी आदेश 13382 अंतर्गत हे निर्बंध लागू करण्यात आले असून, इस्लामाबादमधील ‘नॅशनल डेव्हलपमेंट कॉम्प्लेक्स’ (NDC) या कंपनीला आणि सोबतच कराचीतील- अफिलिएट्स इंटरनॅशनल, अख्तर अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, आणि रॉक्साइड इंटरप्रायझेस या तीन कंपन्याना टार्गेट केले आहे.
निर्बंध घालण्यामागील कारणे
पहिली कंपनी ‘NDC’ (‘नॅशनल डेव्हलपमेंट कॉम्प्लेक्स’ (NDC)), जी पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे नेतृत्व करते आणि जी क्षेपणास्त्र प्रक्षेपण समर्थन आणि चाचणी उपकरणांसाठी विशेष वाहन चेसिस घेण्याच्या प्रयत्नासाठी ओळखले जाते. दरम्यान पाकिस्तानची शाहीन-सिरीज बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करण्यासाठी ही संघटना जबाबदार असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
याशिवाय अन्य ३ कंपन्या या कराचीस्थित असून, त्यांच्या सहाय्यक भूमिकांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. ‘अख्तर अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘रॉकसाइड एंटरप्राइझ’ या दोन कंपन्यांनी NDC मार्फत पाकिस्तानच्या लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाला उपकरणे पुरवली असल्याची माहिती समोर आली आहे. तर ‘एफिलिएट्स इंटरनॅशनल’ या कंपनीने पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात NDC आणि इतर संस्थांसाठी क्षेपणास्त्र संबंधित वस्तूंच्या खरेदीच्या व्यवहारात सहभाग घेतल्याचे समजते.
अशा वस्तूंचे उत्पादन वा संपादन करणे, त्या ताब्यात घेणे, त्या विकसित करणे, त्यांची वाहतूक करणे, त्या हस्तांतरित करणे किंवा त्यांचा थेट वापर करणे यासह सामुहिक संहारक शस्त्रे किंवा त्यांच्या वितरण प्रणालीच्या प्रसारास हातभार लावणे हे सर्वच अवैध असून, यामध्ये सक्रिय सहभाग घेतल्यामुळे अमेरिकेने या चारही कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत.
यानिमित्ताने US प्रशासनाने, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या कारवायांविरोधात कठोर पावले उचलण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अधोरेखित केले आहे.
पाकिस्तानची यावर प्रतिक्रिया
दरम्यान, या प्रकरणी प्रतिक्रिया देतेवळी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, ”अमेरिकेची कृती ही खेदजनक आणि पक्षपाती आहे. त्यांची ही कृती, सैन्याच्या विषमतेला अधिक तीव्र करण्याचा उद्देशातून घेतला असून, यातून असे दिसते की आण्विक हत्यारांच्या निर्मितीमध्ये पाकिस्तानच्या भारतासोबतच्या प्रतिस्पर्धतेला टार्गेट करुन त्यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रादेशिक स्थिरतेला हानी पोहचेल.”
याबाबत ‘बुलेटिन ऑफ द ॲटॉमिक सायंटिस्ट रिसर्च ऑर्गनायझेशनचे’ म्हणणे आहे की, शाहीन सीरिजची क्षेपणास्त्रे अण्वस्त्रधारी आहेत. 1998 मध्ये पाकिस्तानने पहिली अण्वस्त्र चाचणी घेतली होती आणि ही चाचणी करणारा, पाकिस्तान जगातला सातवा देश ठरला.’
बुलेटिन संस्थेचा असा अंदाज आहे की, सध्या पाकिस्तानच्या शस्त्रागारात सुमारे 170 अण्वस्त्रे आहेत.
दरम्यान, इस्लामाबादने न्यूक्लियर शस्त्रांचा प्रसार थांबवण्यासाठी तयार केलेल्या आणि आंतरराष्ट्रीय प्रणालीचा मुख्य आधार असलेल्या ‘नॉन-प्रोलिफरेशन’ करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे.
(रॉयटर्स)