कॅनडाचे पोलीस अधिकारी हरिंदर सोही यांना ब्रॅम्प्टन, ग्रेटर टोरंटो येथील एका हिंदू मंदिरावर झालेल्या खलिस्तानी हल्ल्यात त्यांच्या सहभागाची चौकशी होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. सोही पील प्रादेशिक पोलिसात सार्जंट आहे.
पील पोलिसांकडून सीबीएसला आलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, “फोर्सला सोशल मीडियावरील पोस्टची माहिती आहे ज्यामध्ये एक ऑफ-ड्युटी पील पोलिस अधिकारी हल्ल्यात सहभागी असल्याचे दिसून येत आहे. सामुदायिक सुरक्षा आणि पोलिस कायद्यानुसार या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.”
खलिस्तान समर्थक घोषणा देत असलेल्या जमावामध्ये सोही पिवळा खलिस्तानी ध्वज घेऊन नागरी कपड्यांमध्ये दिसला. हा जमाव हिंदू सभा मंदिराजवळील दोन गटांमध्ये झालेल्या चकमकीत सहभागी असल्याचा व्हिडिओ वायरल झाला. या व्हिडिओत एक गट खलिस्तानचा झेंडा आणि दुसरा गट भारतीय तिरंगा घेऊन या मंदिराजवळ बघायला मिळाले.
भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या मंदिर भेटीदरम्यान हा संघर्ष झाला. सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी या घडामोडींची गंभीर दखल घेतली आहे.
“काल कॅनडातील हिंदू मंदिरात जे घडले ते अत्यंत चिंताजनक आहे. तुम्ही आमच्या अधिकृत प्रवक्त्याचे विधान आणि आमच्या पंतप्रधानांनी व्यक्त केलेली चिंता पाहिली असेल, जी आम्हाला त्याबद्दल किती तीव्रतेने या प्रकाराबद्दल काळजी वाटते ते तुम्हाला सांगेल,” असे ते म्हणाले.
गेल्या वर्षी जूनमध्ये खलिस्तानी फुटीरतावादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोप पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी केल्यानंतर दिल्ली आणि ओटावा यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत.
खलिस्तानी लोक कॅनडातील हिंदू आणि शीख यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यामुळे भारतातही अशाच प्रकारचे मतभेद निर्माण होतील अशी आशंका भारतीय वंशाच्या कॅनेडियन राजकारणी उज्ज्वल दोसांझ यांनी व्यक्त केली आहे.
“इथे असे विभाजन करण्याचा प्रयत्न आणि ते विभाजन भारतातही नेण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे,” असे ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, “ही त्यांची आशा आहे कारण त्यांना देशाचे तुकडे करायचे आहेत.”
खलिस्तानी हिंसाचारातील वाढीचा मागोवा घेतला तर तो जस्टीन ट्रुडो पंतप्रधान बनल्यानंतर जास्तच वाढल्याचे मत दोसांझ यांनी व्यक्त केले.
“हा नेमका काय प्रकार आहे हे पंतप्रधानांना माहीत आहे, खलिस्तानी त्याच्या सरकारमध्ये होते. माझ्या मते ते असे करत आहे कारण ‘उगाच शत्रूत्व का घ्या’? जरी तुमच्याकडे हजार मते असली तरी खलिस्तान्यांना का दुखवा?” असेही दोसांझ म्हणाले.
“कॅनडाचा राजकीय वर्ग या मुद्द्यांवर झोपलेला आहे. “त्यांनी खलिस्तानी हिंसाचाराचा निषेध केला नाही, त्याचे नाव घेतले नाही, त्याचा उल्लेख केला नाही. असे दिसते की हे लोक कुठूनतरी अचानक अवकाशात प्रकट झाले आहेत.”
कॅनडामधून हिंदूंची हकालपट्टी करण्याच्या अमेरिकेतील शीख फुटीरतावादी गुरपतवंत सिंग पन्नून यांच्या आवाहनाची त्यांनी आठवण करून दिली.
“जर कोणी ज्यू लोकांची हकालपट्टी करण्याची मागणी केली, तर त्याच्यावर खटला भरला जाणार नाही आणि त्याची चौकशी केली जाणार नाही असे तुम्हाला वाटते का?”
स्पष्टपणे सांगायचे तर येथे दुतोंडीपणा आहे. मात्र राजकीय वर्ग “झोपलेला” असल्याने, कॅनडाच्या सत्ताधारी आस्थापनेत याला फार महत्त्व देणारे कोणीही दिसत नाही.
सूर्या गंगाधरन
(रॉयटर्स)