Israel strikes Iran: हल्ल्यानंतर विमानांची उड्डाणे वळवली, हवाई क्षेत्र बंद

0

गुरुवारी, इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर (Israel strikes Iran), शुक्रवारी इस्रायलसह इराण, इराक आणि जॉर्डनच्या हवाई क्षेत्रातून विमान कंपन्यांनी आपली नियमीत उड्डाणे त्वरित वळवली, अशी माहिती Flightradar24 च्या डेटामधून समोर आली आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता राखण्यासाठी विमान कंपन्यांनी उड्डाणे वळवल्याचे किंवा रद्द केल्याचे समजते.

जगभरातील संघर्षप्रवण क्षेत्रांमुळे, विमान कंपन्यांच्या ऑपरेशन्सवर आणि नफ्यावर मोठा ताण येत आहे, तसेच प्रवास सुरक्षेच्या दृष्टीनेही धोका वाढत आहे.

Osprey Flight Solutions या विमान सुरक्षा संस्थेनुसार, 2001 पासून आतापर्यंत सहा व्यावसायिक विमाने, चुकून गोळ्या झाडून पाडण्यात आली आहेत, आणि अशाप्रकारचे अन्य तीन अपघात थोडक्यात टळले आहेत.

इराणच्या न्युक्लियर तळांवर लक्ष्य

इस्रायलने शुक्रवारी जाहीर केले की, त्यांनी इराणच्या अणुउद्योगाशी संबंधित ठिकाणांवर, क्षेपणास्त्र निर्मिती केंद्रांवर आणि लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ले केले. हल्ल्यांचे हे सत्र दीर्घकाळ चालेल असा इशाराही दिला गेला आहे, ज्यामागे तेहरानला अण्वस्त्र निर्माण करण्यापासून रोखणे हा मुख्य उद्देश आहे.

तेल अवीव्हच्या, बेन गुरियन विमानतळावरील सर्व उड्डाणे पुढील आदेश येईपर्यंत थांबवण्यात आली असून, इराणकडून प्रतिहल्ल्याची शक्यता असल्यामुळे इस्रायलचे हवाई संरक्षण दल हाय अलर्टवर आहेय

इस्रायलची प्रमुख विमान कंपनी El Al Airlines ने, इस्रायलमधील सर्व उड्डाणे तात्पुरती बंद केली आहेत.

इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी सांगितल्यानुसार, इराणचे हवाई क्षेत्रही पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आले असून, वैमानिकांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.

इराणवरील हल्ल्यांच्या अहवालानंतरही, एमिरेट्स, लुफ्तहांसा आणि एअर इंडिया यासारख्या काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांची विमाने इराणच्या हवाई क्षेत्रातून जात होती.

एअर इंडिया, जी युरोप आणि उत्तर अमेरिकेसाठी उड्डाणांमध्ये इराणच्या हवाई क्षेत्राचा वापर करते, तिने सांगितले की न्यूयॉर्क, व्हॅन्कुव्हर, शिकागो आणि लंडन येथून येणारी काही उड्डाणे वळवण्यात आली आहेत किंवा त्यांना मूळ गंतव्यस्थळी परत पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, एमिरेट्स आणि लुफ्तहांसा यांनी अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

इराकने हवाई क्षेत्र बंद केले

शुक्रवारी सकाळी, इराकने आपले संपूर्ण हवाई क्षेत्र बंद करत, देशातील सर्व विमानतळांवरील उड्डाणे थांबवली, अशी माहिती इराकच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

इराणच्या सीमेजवळ असलेल्या पूर्व इराकमधून जगातील एक अतिशय गजबजलेला हवाई मार्ग जातो, ज्या मार्गावरून युरोप आणि गल्फ देशांदरम्यान अनेक उड्डाणे सातत्याने होतात. आशियामधून युरोपकडे जाणाऱ्या अनेक विमानांसाठीही हा प्रमुख मार्ग आहे.

फ्लाईट ट्रॅकिंग डेटानुसार, अनेक विमाने पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली असून, ती मध्य आशिया किंवा सौदी अरेबियामार्गे जाताना दिसत आहेत.

इस्रायलच्या हल्ल्यानंतर काही तासांनी जॉर्डननेही आपले हवाई क्षेत्र बंद केले. जॉर्डन हे इस्रायल आणि इराक यांच्या दरम्यान स्थित आहे, त्यामुळे या बंदीचा व्यापारी उड्डाणांवर मोठा परिणाम झाला आहे.

Safe Airspace या OPSGROUP द्वारे चालवल्या जाणाऱ्या वेबसाइटने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार: “परिस्थिती अजूनही चिघळू शकते, या भागात उड्डाण करणाऱ्या कंपन्यांनी उच्च पातळीची सावधगिरी बाळगावी.”

शुक्रवारी पहाटे दुबईकडे येणारी अनेक विमाने इतर ठिकाणी वळवण्यात आली. एमिरेट्सचे मँचेस्टरहून दुबईकडे येणारे विमान इस्तंबूलला वळवण्यात आले. फ्लाईदुबईचे बेलग्रेडहून येणारे विमान आर्मेनियातील यरेवानला वळवण्यात आले.

फ्लाईदुबईने जाहीर केले की, त्यांनी अम्मान, बेरूत, दमास्कस, इराण आणि इस्रायलकडे जाणारी उड्डाणे तात्पुरती बंद केली आहेत. याशिवाय देखील, काही उड्डाणे रद्द केली गेली असून, काही विमाने परत पाठवण्यात आली आहेत किंवा वळवण्यात आली आहेत.

कतार एअरवेजनेही दमास्कसकडे नियोजित असलेली दोन उड्डाणे रद्द केली असल्याचे, Flightradar24 च्या डेटामधून समोर आले आहे.

मध्य पूर्वेतील संघर्षांचा हवाई वाहतुकीवर परिणाम

ऑक्टोबर २०२३ पासून, सुरू असलेल्या इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षामुळे मध्य पूर्वेतील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक गंभीर अडचणीत आली आहे.

विमान कंपन्यांना आता अचानक उद्भवणाऱ्या ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये, आपली उड्डाणे पार पाडावी लागत आहेत. काही हल्ले विमानतळाच्या इतके जवळ घडले की, वैमानिक आणि प्रवाशांना देखील ते स्पष्टपणे दिसले, असे अहवाल सांगतात.

युरोप आणि मध्य पूर्व यामधील दररोज सुमारे 1,400 व्यावसायिक विमाने या हवाई मार्गांवरून जात असल्याचे Eurocontrol च्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.

मागील वर्षभरात कझाकिस्तान आणि सुदानमध्येही विमाने शस्त्रास्त्रांमुळे पाडली गेली, असे अहवाल सांगतात.
हे प्रकार यापूर्वीच्या मलेशिया एअरलाइन्स फ्लाइट MH17 (2014, युक्रेनच्या पूर्व भागात पाडले गेले) आणि युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्स फ्लाइट PS752 (2020, तेहरानहून उड्डाण करत असताना पाडले गेले) या दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर घडले आहेत.

या प्रकारांमुळे, संपूर्ण हवाई वाहतूक व्यवस्थेसमोर सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे आणि विमान कंपन्यांनी आता हवाई मार्ग निवडताना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक झाले आहे.

टीम स्ट्र्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleApache Fleet in Trouble as Forced Landings Mount
Next articleAir India: बॉम्ब ठेवल्याच्या धमकीमुळे, फुकेत-दिल्ली विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here