शुक्रवारी, फुकेतहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर, फुकेत एअरपोर्टवर या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.
AI 379 या विमानातील, सर्व 156 प्रवाशांना विमानातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले असल्याचे, थायलंडमधील विमानतळ प्राधिकरणातील अधिकाऱ्याने सांगितले. ही संपूर्ण प्रक्रिया आपत्कालीन प्रोटोकॉलनुसार पार पडली.
हे विमान, शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता (02:30 GMT), फुकेत विमानतळावरून भारताची राजधानी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. मात्र, फ्लाईट ट्रॅकर Flightradar24 च्या माहितीनुसार, विमानाने अंदमान समुद्रावर मोठा वळसा घेतला आणि पुन्हा फुकेतमध्ये लँडिंग केले.
या घटनेच्या एक दिवस आधीच, गुरुवारी, अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. टेकऑफनंतर काही मिनिटांतच घडलेल्या या दुर्घटनेत 240 पेक्षा जास्त जणांचा दुर्देवी अंत झाला.
दरम्यान, थायलंडच्या AOT संस्थेने (Airports of Thailand) बॉम्ब धमकीबाबत अधिक माहिती अद्याप दिलेली नाही. एअर इंडियेकडूनही यावर तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
गेल्या वर्षभरात भारतीय विमान कंपन्यांना आणि विमानतळांना बनावट बॉम्ब धमक्यांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला आहे. पहिल्या दहा महिन्यांत सुमारे 1,000 बनावट कॉल्स आणि मेसेजेस मिळाले, जे 2023 च्या तुलनेत दहापट अधिक होते.
AI171 दुर्घटना: एअर इंडियाच्या इतिहासातील सर्वात मोठा अपघात
गुरुवारी, भारताच्या अहमदाबादमध्ये एक अत्यंत भीषण विमान अपघात झाला. एअर इंडियाचे AI171 हे विमान अहमदाबाद येथून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले, ज्यात किमान 265 जणांचा मृत्यू झाला, असे स्थानिक प्रशासनाने सांगितले.
ही लंडनकडे जाणारी बोईंग 787-8 ड्रीमलाइनर फ्लाइट होती. अपघाताच्यावेळी फ्लाइटमध्ये एकूण 242 जण होते, ज्यापैकी 230 प्रवासी आणि 12 क्रू सदस्य होते.
हे विमान, अहमदाबाद विमानतळाजवळील वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलवर कोसळले, ज्यावेळी तिथे लंच टाईम सुरु होता. त्यामुळे या दुर्घटनेत हॉस्टेलमधील विद्यार्थी तसेच काही निवासी डॉक्टरांचीही मृत्यू झाला असून, स्थानिक माध्यमांनुसार त्यांची संख्या किमान 24 आहे, यामध्ये 5 मेडिकल स्टुटंट्स असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, “अपघाताच्यावेळी अचानक एक भयंकर स्फोट झाला आणि त्यानंतर आकाशात काळ्या धुराचे मोठे लोट उसळलेले दिसले.”
आपत्कालीन सेवांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जिवंत व्यक्तींना शोधण्याचे काम तातडीने सुरू केले, जे रात्री उशिरापर्यंत सुरूच राहिले.
बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचे आणि जळालेली प्रेते तसेच विमानाचे तुकडे गोळा करण्याचे काम सावधगिरीने करण्यात आले.
या दुर्घटनेत 242 पैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, केवळ एकच प्रवासी या अपघातातून वाचला. एअर इंडियाने गुरुवारी रात्री उशिरा याची पुष्टी केली.
चौकशी अद्याप सुरू
Flightradar24 च्या डेटानुसार, विमानाचा उंचीवरून अचानक घसरणे आढळले, त्यामुळे यंत्रसामग्रीतील बिघाड किंवा वैमानिकाची चूक यासारख्या शक्यतांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हवाई वाहतूक प्राधिकरणाने या घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून, एअर इंडियाने तत्काळ खबरदारी म्हणून आपल्या ताफ्यातील तत्सम विमाने तात्पुरती वापरातून हटवली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले असून, पीडित कुटुंबीयांना सांत्वन देत, सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.
ही दुर्घटना गेल्या दशकातील जगातील सर्वात भीषण विमान अपघात म्हणून नोंदवली गेली आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)