Ahmedabad plane crash: एअर इंडिया विमान अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम

0
एअर

गुरुवारी, अहमदाबाद येथून लंडनकडे रवाना झालेले एअर इंडिया कंपनीचे बोईंग-787 (ड्रीमलाईनर) विमान, उड्डाणानंतर काही मिनिटातंच कोसळले. या भीषण अपाघातामध्ये आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी अधिकार्‍यांनी दिली आहे. ही गेल्या दहा वर्षांतील सर्वात भीषण आंतरराष्ट्रीय विमान दुर्घटना ठरली आहे. हे विमान ब्रिटनमधील गॅटविक विमानतळाकडे जात होते.

स्थानिक पोलिसांच्या अहवालानुसार, विमानातील प्रवाशांपैकी एकजण या अपघातातून जिवंत वाचला आहे. या व्यक्तीने मीडियाला दिलेल्या बाईटनुसार, “विमान टेकऑफनंतर एक मोठा आवाज झाला आणि क्षणातच विमान कोसळले.”

अहमदाबाद विमानतळालगत असलेल्या एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहावर, हे विमान जाऊन आदळले. त्यावेळी वसतीगृहात दुपारच्या जेवणाची वेळ असल्याने, अनेक निवासी डॉक्टर्स, विद्यार्थी आणि कर्मचारी अपघाताच्यावेळी तिथल्या मेसमध्ये हजर होते, ज्यातील बहुतांशी लोकांचा दुर्देवी अंत झाला.

शहराचे पोलीस प्रमुख जी.एस. मलिक यांनी सांगितले की, “अपघातस्थळी आतापर्यंत 204 मृतदेह सापडले आहेत आणि शोधकार्य अजून सुरू आहे.” तर वरिष्ठ पोलीस अधिकारी विधी चौधरी यांनी सांगितले की, “सीट 11A वर बसलेला एक प्रवासी या भीषण अपघातातून बचावला असून, रुग्णालयात दाखल असलेले अन्य काहीजणही जिवंत असण्याची शक्यता आहे.”

बचावलेल्या व्यक्तीचा अनुभव

या भीषण अपघातातून बचावलेले,  40 वर्षीय रमेश विश्वासकुमार यांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितले की, “टेकऑफनंतर साधारण तीस सेकंदांनी जोराचा आवाज झाला आणि मग विमान कोसळले. मी उठून पाहिले तर सगळीकडे मृतदेहच होते. मी भीतीने पळालो. कोणीतरी मला उचलून अ‍ॅम्ब्युलन्समध्ये टाकले आणि रुग्णालयात आणले.”

त्यांनी सांगितले की, “त्यांचा भाऊ अजॉय विमानात दुसऱ्या सीटवर होता मात्र तो अद्याप सापडलेला नाही.”

पोलीस प्रमुख मलिक यांनी सांगितले की, “मृतांमध्ये प्रवासी आणि जमिनीवरील नागरिक दोघेही असू शकतात. केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांनी सांगितले की, मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे.”

पोलीस अधिकारी चौधरी यांनी सांगितले की, “काही जण रुग्णालयात जिवंत असण्याची शक्यता आहे, पण मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. सध्या 50 हून अधिक जखमी रुग्णालयात आहेत.”

राज्याचे आरोग्य सचिव धनंजय द्विवेदी यांनी सांगितले की, “मृतांची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांचे डीएनए नमुने घेतले जात आहेत.”

प्रचंड मोठी जीवितहानी

द्विवेदी यांनी सांगितले की, “जेथे विमान कोसळले त्या भागात मेडिकल कॉलेजचे वसतिगृह, कर्मचारी क्वार्टर्स आणि अन्य निवासी परिसर आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकही अपघातात जखमी झाले आहेत.” विमानाचे अवशेष संपूर्ण इमारतीभोवती विखुरले होते. विमानाची शेपटी इमारतीवर अडकलेली आढळली.

सीएनएन-न्यूज १८ने सांगितले की, ‘विमान बी.जे. मेडिकल कॉलेजच्या मेसवर कोसळल्यामुळे, तिथे उपस्थित कर्मचारी, निवासी डॉक्टर्स यांच्यासह अनेक मेडिकल स्टुडंट्सचा मृत्यू झाला.’

अपघातग्रस्त विमानात 217 प्रौढ व्यक्ती, 11 मुलं आणि 2 तान्ही बाळं होती. प्रवाशांपैकी 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज प्रवासी आणि 1 कॅनेडियन प्रवासी होता.

फ्लाइटरडार 24 नुसार, हे विमान बोईंग 787-8 ड्रीमलाइनर होते, ज्याने 2013 साली प्रथम नागरी उड्डाण केले आणि 2014 मध्ये एअर इंडियाकडे सुपूर्द झाले. 2011 पासून व्यावसायिक वापरात आलेल्या या ड्रीमलाइनरचा हा पहिलाच अपघात होता.

टेकऑफनंतर नेमके काय घडले?

विमानाने टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनीटांत वेळात ही दुर्घटना घडली. व्हायरल झालेल्या व्हिडिओजमध्ये, ड्रीमलाईनर विमान टेकऑफनंतर रनवेपासून काही मीटर अंतर गेल्यावर खाली कोसळल्याचे स्पष्ट दिसत आहे.

सदर विमानाने, अहमदाबाद विमानतळाच्या रनवे 23 वरुन, दुपारी 1:39 मिनिटांनी (08:09 GMT) उड्डाण केले. त्यानंतर काही वेळातच विमानाच्या कॉकपीटमधून ‘Mayday, Mayday, Mayday‘ असा आपत्कालीन स्थितीतील बचावासाठीचा संदेश ATC ला देण्यात आला, मात्र त्यानंतर विमानाशी पूर्णत: संपर्क तुटला.

तांत्रिक त्रुटीची शक्यता

अमेरिकन एअरोस्पेस सुरक्षा सल्लागार- अँथनी ब्रिकहाऊस यांनी सांगितले की, “अपघाताच्या व्हिडिओंमध्ये एक गंभीर बाब आढळून आली, ती म्हणजे उड्डाणा केल्यानंतर जिथे विमानाचे लँडिंग गिअर वर असायला हवेत, ते खाली दिसत होते.”

“जर कुणाला परिस्थितीची कल्पना नसती, तर त्यांना वाटले असते की हे विमान उतरण्याच्या प्रयत्नात आहे,” असे ब्रिकहाऊस यांनी स्पष्ट केले.

बोईंग कंपनीने आपल्या निवेदनात सांगितले की, “त्यांना प्राथमिक अहवालांची माहिती आहे आणि त्यांनी अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. या अपघातामुळे कंपनीचे शेअर्स 5% नी घसरले. हा अपघात बोईंगसाठी मोठे अपयश मानले जात आहे, विशेषतः जेव्हा कंपनीचा नवा CEO विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.”

विमानाचे इंजिन बनवणाऱ्या GE Aerospace कंपनीने, भारतात तपासासाठी एक टीम पाठवणार असल्याचे सांगितले असून, ती कॉकपिटमधील डेटा तपासणार आहे, असे CNBC TV18 ने सांगितले.

अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डने (NTSB) सांगितले की, “अमेरिकन तपास पथक भारतात पाठवले जाणार असून ते अपघाताच्या चौकशीसाठी मदत करेल.”

ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, “ब्रिटिश अधिकारी भारतीय प्रशासनासोबत मिळून अपघाताविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रभावित नागरिकांना मदत करत आहेत.”

दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताप्रकरणी व्यक्त होत, एक्स (X) वर लिहिले की: “अहमदाबादमधील ही दुर्घटना अत्यंत धक्कादायक ऱ्हदय द्रावक आहे.”

तर, ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांनीही प्रतिक्रिया देत म्हटले की, “अपघाताची दृश्ये धक्कादायक आहेत. मी परिस्थितीबाबत सातत्याने माहिती घेत आहे.”

बकिंगहम पॅलेसकडून सांगण्यात आले की, किंग चार्ल्स यांनाही यांना दुर्घटनेबाबत सातत्याने अपडेट्स दिले जात आहे.

अपघाताचे पडसाद

भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बचाव कार्यासाठी संपूर्ण मदत दिली जावी, असे निर्देश दिले आहेत.

अपघातानंतर अहमदाबाद विमानतळावरील सर्व उड्डाणे काही वेळासाठी थांबवण्यात आली होती. नंतर विमानतळाने पुन्हा काही प्रमाणात कामकाज सुरू केले. हे विमानतळ भारतातील अदानी समूहाद्वारे चालवले जाते.

गौतम अदानी, संस्थापक आणि अध्यक्ष, यांनी एक्स (X) वर पोस्ट करत सांगितले की : “आम्ही सर्व संबंधित प्रशासनांसोबत समन्वय साधत आहोत आणि घटनास्थळी असलेल्या कुटुंबांना संपूर्ण मदत करत आहोत.”

भारतातील यापूर्वीचा मोठा विमान अपघात 2020 मध्ये झाला होता. तो अपघात एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचा होता, जी एअर इंडियाची लो-कॉस्ट शाखा आहे.

त्यावेळी विमान कोझीकोड आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना “टेबल-टॉप” धावपट्टीवरून घसरून खोल दरीत पडले होते आणि नाकाच्या बाजूने आदळले होते. या दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला होता.

पूर्वी सरकारी मालकीची असलेली एअर इंडिया कंपनी, 2022 मध्ये भारतीय टाटा समूहाकडे आली. 2024 मध्ये, टाटाने सिंगापूर एअरलाइन्सबरोबर असलेल्या ‘विस्तारा’ या संयुक्त उपक्रमात एअर इंडिया एकत्र केली.

टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले की, “अपघातात मृत झालेल्या प्रत्येक कुटुंबाला 10 लाख रुपये (अंदाजे $1,17,000) दिले जातील. जखमींच्या वैद्यकीय खर्चाची सर्व जबाबदारी टाटा समूह उचलणार असून, मेडिकल कॉलेजचे वसतिगृहही पुन्हा उभारले जाईल.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleमुलीच्या रूपाने शी जिनपिंग आपला उत्तराधिकारी तयार करत आहेत का?
Next articleभारत-चीन संबंध सुधारण्यासाठी नव्याने प्रयत्न; वाहतूक व व्यापार चर्चांना गती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here