चीनचे सर्वोच्च नेते सार्वजनिक आयुष्यात अनेकदा गायब होतात हे सर्वश्रुत आहे. यापैकी काही नेते कायमचे गायब होतात तर बहुतेक नेते पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात येतात. असेच काहीसे चित्र सध्या अध्यक्ष शी जिनपिंग (आणि त्यांच्या पत्नी पेंग लियुआन) यांच्या बाबतीतही बघायला मिळाले. दोन आठवड्यांपासून सार्वजनिकरित्या अनुपस्थित असलेले हे जोडपे बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्यासाठी आयोजित डिनरमध्ये पुन्हा बघायला मिळाले.
मात्र यावेळी उपस्थितांचे लक्ष शी किंवा लुकाशेन्को यांच्याकडे केंद्रित झाले नव्हते, तर चिनी राष्ट्राध्यक्षांची एकुलता एक मुलगी शी मिंगझे यांची डिनरमध्ये लागलेली उपस्थिती याकडे होते. 32 वर्षीय हार्वर्डची पदवीधर असलेली शी मिंगझी हिने त्या परंपरेचे पालन केले आहे ज्यात उच्च पातळीवरील चिनी नेत्यांची कुटुंबे सार्वजनिकरित्या कमी वेळा जनतेसमोर येतात आणि त्यांच्याबद्दल फारच कमी माहिती लोकांना ठाऊक असते.
बेलारूसचे पहिले उपपंतप्रधान निकोलाई स्नोपकोव्ह यांच्यासाठी शी जिनपिंग यांनी केलेल्या स्वागतपर भाषणात ते म्हणाले :
“माझ्या मित्रा, तू आणि मी एक विशेष नातेसंबंध शेअर करतो, म्हणूनच आज आपण कुटुंबासाठी डिनर करू. इतिहासात पहिल्यांदाच माझी मुलगी एका परदेशी नेत्यासोबत डिनर करणार आहे.”
आता चीनमध्ये ओळखला जाणारी घराणेशाही किंवा लाल राजवंशाचे राजकारण हा एक धोकादायक वाक्यांश आहे. पण तो अस्तित्वात होता आणि अजूनही अस्तित्वात आहे. यांचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कम्युनिस्ट चीनचे संस्थापक माओ त्से तुंग यांची चौथी पत्नी जियांग किंग. त्यांनी तिच्या लक्षणीय राजकीय महत्त्वाकांक्षेला चालना दिली होती.
ज्या राजकीय कारणांमुळे हजारो लोक मारले गेले किंवा ग्रामीण भागात हद्दपार झाले अशा सांस्कृतिक क्रांतीदरम्यान तिची सक्रिय भूमिका होती असे सांगितले जाते. जिआंग किंग हिने चीनच्या संस्कृती आणि कला जगाचे अध्यक्षपद भूषवले. तसेच तिला पॉलिटब्युरो म्हणूनही पदोन्नती मिळाली.
तिचा हा प्रभाव 1976 मध्ये माओ यांच्या मृत्यूपर्यंत टिकला. त्यानंतर तिला पॉलिटब्युरोमधून काढून टाकण्यात आले, अटक करण्यात आली, तिच्यावर खटला चालवण्यात आला आणि विविध गुन्ह्यांसाठी तुरुंगावासाची शिक्षाही झाली. शेवटी 1991 मध्ये तिने आत्महत्या केली.
शी जिनपिंग यांच्या पत्नीकडे सध्यातरी कोणतीही राजकीय सत्ता नसल्याचे सांगितले जाते. परंतु त्यांच्या राजकीय उदयासाठी कदाचित त्यांच्या आईने मदत केली असावी अशी शक्यता आहे. त्यांची आई एक प्रमुख क्रांतिकारक ली झोंगक्सुन यांची पत्नी होती, तिने आपल्या मुलाला पदोन्नती मिळावी अशी विनंती करणारे पत्र कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना लिहिले होते.
आता शी सुज्ञपणे आपल्या मुलीचा प्रचार करत आहेत का? हा इथे खरा कळीचा प्रश्न आहे.
सेंटर फॉर चायना अॅनालिसिस अँड स्ट्रॅटेजीचे अध्यक्ष जयदेव रानडे यांचा असा विश्वास आहे की चिनी कम्युनिस्ट पक्षाचे 99 दशलक्ष सदस्य, विशेषतः त्यांचे पदाधिकारी, शी मिंगझे हिला तिच्या वडिलांचा उत्तराधिकारी बनू देतील याची शक्यता फारच कमी आहे.
“उत्तर कोरियासारख्या वंशवादी राजवटीप्रमाणे कम्युनिस्ट पक्षाला वंशपरंपरागत नेतृत्वाचा इतिहास नाही”, असे त्यांनी स्ट्रॅटन्यूज ग्लोबलला सांगितले. “असे संबंध शांत फायदे देऊ शकतात, परंतु पक्ष बाहेरून सामूहिक नेतृत्व आणि गुणवत्तेवर आधारित पदोन्नतींचे पालन करतो. जर शी जिनपिंग यांनी आपल्या मुलीला आधी खालच्या स्तरावरील नोकऱ्यांमध्ये काम करू न देता एकदम पदोन्नती दिली, तर ते त्याच पक्षाचे नियम मोडतील, ज्यामुळे त्यांना सत्तेवर येण्यास मदत झाली.”
रानडे म्हणतात की, नेत्यांनी कौटुंबिक संबंधांऐवजी वर्षानुवर्षे अनुभवातून पद मिळवावे असे नियम आहेत. चीनच्या व्यवस्थेत, एखाद्या व्यक्तीचा कोणत्याही उच्च पदासाठी विचार करण्यापूर्वी त्याला सामान्यतः केंद्र आणि प्रांतीय सरकारी भूमिकांमध्ये काम करावे लागते.
शी जिनपिंग यांना आधीच अंतर्गत असंतोषाचा सामना करावा लागत आहे, लष्करात अस्वस्थता आणि पक्षातील वरिष्ठांकडून टीका होत असल्याचे वृत्त आहे. त्यांच्या मुलीला बढती दिल्याने बाजूला केलेल्या गटांकडून आणि लष्कराकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ शकतात, कम्युनिस्ट पक्षाची प्रतिमा खराब होऊ शकते आणि वंशपरंपरागत राजवटीशी तुलना होऊ शकते.
शी मिंगझे यांच्यासाठी लाक्षणिकरित्या असणाऱ्या भूमिका एकवेळ सहन केल्या जाऊ शकतात, परंतु नेतृत्वासाठी तिला उघडपणे तयार करत असल्याचे लक्षात आले तर अशांतता वाढू शकते आणि शी यांच्याविरोधात प्रतिस्पर्ध्यांची एकजूट होऊ शकते. अध्यक्ष माओ यांच्याच कर्यकाळाइतकी सत्ता उपभोगणाऱ्या शी यांना मुलीसाठी राजकीय महत्त्वाकांक्षा असू शकतात. परंतु चीनमध्ये असणाऱ्या इतर अभूतपूर्व शक्ती त्यांना असे करण्यापासून नक्कीच रोखू शकतात. त्यामुळे आपल्या मनसुब्यांमध्ये शी यशस्वी होतीलच यांची खात्री कोणीही देऊ शकत नाही.
सर्वोच्च पदी पोहचण्यासाठी जिनपिंग यांना प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करताना, अगदी जुने, खास मित्र आणि सहकाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसताना अनेकांनी पाहिले आहे. आजही त्यांचे अनेक शत्रू बहुधा त्यांच्या सभोवती वावरत आहेत. त्यांनी अशी एखादी चूक करावी यासाठी ते सगळे वाट पाहत आहेत. या चुकीमुळे ते शी यांना पदच्युत करू शकता. म्हणूनच शी दुप्पट सावध असतील यात कोणालाही शंका असण्याचे कारण नाही.
रेश्मा