भारत आणि चीन यांनी, पुन्हा एकदा परस्पर संबंध अधिक स्थिर आणि सकारात्मक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करणे, लोकांमधील देवाणघेवाण वाढवणे आणि व्यापाराशी संबंधित मुद्दे सोडवणे यावर विशेष भर दिला जात आहे.
गुरुवारी, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी, भारत दौऱ्यावर आलेले चीनचे उपपरराष्ट्र मंत्री सुन वेईडॉंग यांची भेट घेतली. जानेवारी 2025 मध्ये, झालेल्या त्यांच्या शेवटच्या बैठकीनंतर, द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या घडामोडींचा त्यांनी आढावा घेतला, असे परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सांगितले.
दोन्ही बाजूंनी जनतेशी संबंधित उपक्रमांना प्राधान्य देण्यावरही दोन्ही बाजूनी सहमती दर्शवली गेली, जे भारत-चीन संबंध सामान्य करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरेल. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, भारत आणि चीनमधील थेट विमानसेवा लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्यावर दोघांनीही भर दिला.
मिस्री यांनी, नवीन आणि अद्ययावत Air Services Agreement (हवाई सेवा करार) त्वरीत पूर्णत्वास नेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच दोन्ही देशांमधील प्रवास आणि संपर्क सुलभ करणे हा एक व्यापक उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
व्हिसा प्रक्रिया आणि संवादाला चालना
परराष्ट्र मंत्रालयाने याचीही पुष्टी केली की, दोन्ही देश व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच विचारमंचांतील (think tanks) देवाणघेवाण वाढवण्यासाठी प्रत्यक्ष उपाययोजना राबवतील. यामुळे पारस्परिक विश्वास निर्माण होण्यास आणि खुले संवाद वाढण्यास मदत होईल.
कैलास मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात
मिस्री यांनी, यावर्षी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यासाठी चीनने दिलेल्या सहकार्याचे कौतुक केले. याशिवाय एप्रिलमध्ये सीमा भागांतील नद्यांबाबत झालेल्या तज्ज्ञ पातळीवरील सकारात्मक चर्चांचा त्यांनी उल्लेख केला. विशेषतः जलसंपत्तीविषयक माहिती (hydrological data) सामायिक करण्यासंबंधी झालेल्या चर्चेमुळे पुढील प्रगतीची आशा व्यक्त केली.
संयुक्त उपक्रमांची तयारी
भारत आणि चीन यांनी आपल्या परस्पर राजनैतिक संबंधांच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त काही संयुक्त उपक्रम आयोजित करण्याची तयारीही या बैठकीत केली.
या संवादात व्यापार आणि आर्थिक मुद्द्यांना विशेष महत्त्व देण्यात आले. दोन्ही देशांनी ठोस तांत्रिक चर्चांचा पुनरारंभ करण्यावर सहमती दर्शवली, जेणेकरून विशिष्ट समस्या सोडवता येतील.
त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चीनकडून काही रेअर अर्थ मटेरियल्स (दुर्मिळ पृथ्वी धातू) च्या निर्यातीवर लावण्यात आलेले निर्बंध. हे पदार्थ भारतात वाहन उद्योगासह अनेक महत्त्वाच्या उद्योगांसाठी अत्यावश्यक आहेत.
गुरुवारी झालेल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत, या विषयासंदर्भात बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की: “आपली चीनसोबत चर्चा सुरू आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने आणि कस्टम प्रशासनाने एप्रिलच्या सुरुवातीला काही रेअर-अर्थ संबंधित वस्तूंवर निर्यात नियंत्रण लागू करण्याचा निर्णय जाहीर केला होता.”
ते पुढे म्हणाले की: “दिल्ली तसेच बीजिंग येथील चिनी अधिकाऱ्यांशी आमचा नियमित संवाद सुरू आहे. आंतरराष्ट्रीय प्रथांनुसार व्यापारासाठी आवश्यक पुरवठा साखळी (supply chain) स्थिर व विश्वासार्ह राहावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
परराष्ट्र मंत्रालयाने या आठवड्यातील बैठकीचा उल्लेख करताना म्हटले की, “भारत चीनसोबत संवादाचे मार्ग खुले ठेवण्यासाठी आणि रचनात्मक चर्चा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामागे दोन्ही देशांची स्थिर व सहकार्यात्मक द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करण्याची समान इच्छा आहे, हे या चर्चेतून स्पष्ट होते.”
– Huma Siddiqui