अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, जगभरातील व्यावसायिक विमान कंपन्यांनी सोमवारी मध्य पूर्वेतील त्यांच्या उड्डाण निलंबनाच्या कालावधीचे पुनर्मूल्यांकन करण्यास सुरुवात केली. अमेरिकेने इराणच्या प्रमुख अणु सुविधांवर केलेल्या हल्ल्यांनंतर आणि त्याला प्रत्युत्तर देण्याच्या तेहरानने प्रतिज्ञेनंतर प्रादेशिक संघर्ष वाढल्याचे पाहायला मिळाले.
13 जून पासून, इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केल्यानंतर, इराण आणि इराकपासून भूमध्य समुद्रापर्यंतचा गजबजलेला हवाई पट्टा, गेल्या 10 दिवसांपासून जवळजवळ रिकामा आहे. हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे आणि सुरक्षेच्या चिंतेमुळे विमान कंपन्यांनी त्यांचे मार्ग वळवले आहेत, उड्डाणे रद्द केली आहेत किंवा विलंबित केली आहेत.
मिश्र प्रतिसाद
अलीकडच्या काही दिवसांत, दुबई (जगातील सर्वात वर्दळीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ) आणि कतारची राजधानी दोहा यांसारख्या विमान वाहतुकीच्या केंद्रांमध्ये उड्डाणे रद्द होणे सुरू झाले आहे. यामुळे विमान उद्योगात प्रचंड काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तथापि, काही आंतरराष्ट्रीय एअरलाइन कंपन्यांनी सोमवारी सेवा पुन्हा सुरू केली आहे.
सिंगापूर एअरलाइन्स (Leading Asian carrier) ने परिस्थितीला “अनिश्चित” म्हटले असून, रविवारी रद्द केलेले दुबई उड्डाण सोमवारी पुन्हा सुरू केले.
ब्रिटिश एअरलाइन्सनेही (British Airways) दुबई आणि दोहा मार्गांवरील उड्डाणे रद्द केल्यानंतर, सोमवारी पुन्हा सेवा सुरू केली, असे Flightradar24 ने सांगितले.
एअर फ्रान्स-केएलएम (Air France KLM) ने रविवारी आणि सोमवारी दुबई व रियाधसाठीची उड्डाणे रद्द केली होती.
रशिया व युक्रेनचे हवाई क्षेत्र आधीच बंद असल्यामुळे, युरोप आणि आशियामधील उड्डाणांसाठी मध्य पूर्व एक महत्त्वाचा पर्यायी मार्ग बनला होता. मात्र, आता मिसाइल आणि एअर स्ट्राइकच्या पार्श्वभूमीवर, विमान कंपन्या कॅस्पियन समुद्राच्या उत्तरेकडून किंवा इजिप्त व सौदी अरेबियाच्या दक्षिणमार्गे विमाने वळवत आहेत.
या बदललेल्या मार्गांमुळे इंधन आणि कर्मचाऱ्यांच्या खर्चात वाढ झाली असून, अमेरिकन हल्ल्यांनंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे जेट इंधनाच्या दरातही वाढ होण्याचा धोका आहे.
हवाई क्षेत्रातील धोके वाढले
‘वाढते संघर्ष क्षेत्र’ हे एअरलाइन कंपन्यांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे, कारण हवाई हल्ल्यांमुळे अपघाती किंवा हेतुपुरस्सर व्यावसायिक विमानांना लक्ष्य केले जाण्याची भीती वाढली आहे.
GPS इंटरफेरन्स आणि लोकेशन स्पूफिंग हे नवीन धोकेही वाढले आहेत- विशेषतः राजकीयदृष्ट्या संवेदनशील भागांमध्ये, जिथे जमिनीवरील GPS यंत्रणा चुकीची स्थान माहिती प्रसारित करतात, ज्यामुळे व्यावसायिक विमानांच्या मार्गांवर परिणाम होतो.
Flightradar24 ने रॉयटर्सला सांगितले की, “गेल्या काही दिवसांत पर्शियन गल्फमध्ये GPS जॅमिंग व स्पूफिंगमध्ये ‘तीव्र वाढ’ झाली आहे. स्वित्झर्लंडमधील SkAI कंपनीने रविवारी सांगितले की, 24 तासांत 150 हून अधिक विमाने स्पूफिंगला बळी पडली.”
Safe Airspace (OPSGROUP द्वारा चालवलेली वेबसाइट) ने रविवारी म्हटले की, “अमेरिकेने इराणच्या अणुउपक्रम केंद्रांवर केलेले हल्ले या भागातील अमेरिकन एअर ऑपरेटरसाठी धोका वाढवू शकतात.”
त्यामुळे बहरैन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या खाडी देशांमधील हवाई क्षेत्र अधिक धोकादायक होण्याची शक्यता आहे.
सावधगिरी
अमेरिकेने हल्ले सुरू करण्याआधीच, अमेरिकन एअरलाइन्सने कतारसाठीची उड्डाणे रद्द केली होती आणि युनायटेड एअरलाइन्स व एअर कॅनडाने दुबईसाठीची उड्डाणे थांबवली होती. ह्या सेवा अद्याप सुरू झालेल्या नाहीत.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय कंपन्या मागे सरकत असताना, जॉर्डन, लेबनॉन आणि इराकमधील स्थानिक एअरलाइन कंपन्यांनी काही उड्डाणे हळूहळू पुन्हा सुरू केली आहेत.
इस्रायलमध्ये उड्डाणे वाढवली
इस्रायलने स्वदेशी नागरिकांना परत आणण्यासाठी आणि स्थलांतरासाठी “रेस्क्यू फ्लाइट्स” वाढवल्या आहेत. इस्रायली विमानतळ प्राधिकरणानुसार, सोमवारपासून दररोज 24 बचाव उड्डाणे चालवली जातील, मात्र प्रत्येक फ्लाइटमध्ये 50 प्रवाशांचीच मर्यादा असेल.
इस्रायली विमान कंपनी El Al ने रविवारी सांगितले की, “एका दिवसात फक्त 25,000 हून अधिक लोकांनी देशातून बाहेर जाण्यासाठी अर्ज केले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)