NATO (North Atlantic Treaty Organization) मधील सदस्य देशांनी, संरक्षण खर्चाचा उद्दिष्टांक वाढवून GDP च्या 5% पर्यंत नेण्याच्या निर्णयाला सहमती दर्शवली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांच्या तीव्र दबावानंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र, स्पेनने या नवीन उद्दिष्टांपासून स्वतःला वेगळे ठेवले आहे, ज्यामुळे द हेगमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या NATO शिखर परिषदेआधीच अंतर्गत मतभेद समोर आले आहेत.
बुधवारी होणाऱ्या शिखर संमेलनाआधीच, संयुक्त निवेदनावर सहमती मिळवण्यासाठी NATO अधिकारी प्रयत्नशील होते. मात्र स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी गुरुवारी स्पष्ट केले की, ते 5% वाढीच्या उद्दिष्टाशी बांधील राहणार नाहीत.
NATO प्रमुख मार्क रुटे यांनी प्रस्ताव मांडला की, मुख्य संरक्षण खर्चाचे उद्दिष्ट 2% वरून 3.5% करावे आणि उर्वरित 1.5% सायबर सुरक्षेसाठी तसेच लष्करी वाहनांकरता रस्ते व पूल वापरायोग्य करण्यासाठी वापरावे.
“आम्ही हे करणार नाही”
रविवारी, राजकीय चर्चेनंतर तयार झालेल्या तडजोडीच्या मसुद्यानंतर, पंतप्रधान सांचेझ यांनी तत्काळ स्पष्ट केले की, स्पेन 5% खर्च वाढीला बंधनकारक नाही. त्याऐवजी, 2.1% GDP खर्च केल्यास NATO ची मुख्य लष्करी गरजा पूर्ण होतील, असे त्यांनी सांगितले.
“इतर देशांनी आपला संरक्षण खर्च वाढवण्याचा घेतलेला निर्णय आम्ही पूर्णपणे मान्य करतो, पण आम्ही तसे करणार नाही,” असे सांचेझ यांनी स्पॅनिश टेलिव्हिजनवरील भाषणात म्हटले.
2024 मध्ये, स्पेनने आपल्या GDP च्या फक्त 1.24% संरक्षणावर खर्च केला होता, म्हणजे अंदाजे 17.2 अब्ज युरो (19.8 अब्ज डॉलर्स) — हे NATO मधील सर्वात कमी टक्केवारीचे संरक्षण बजेट होते.
NATO च्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, रशियाकडून वाढत असलेला धोका आणि अमेरिकेचा चीनकडे वळलेला लष्करी फोकस, यामुळे युरोपने स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी अधिक घ्यावी लागेल.
ट्रम्प यांचा दुटप्पीपण
सांचेझ यांच्या भूमिकेमुळे, शिखर परिषदेत ट्रम्प यांच्यासोबत संभाव्य संघर्ष निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला होता. ट्रम्प यांनी यापूर्वी अनेक वेळा युरोपीय देशांवर पुरेसा संरक्षण खर्च न केल्याचा आरोप केला आहे, आणि जर त्यांनी उद्दिष्ट पूर्ण केले नाही, तर त्यांचे संरक्षण न करण्याची धमकीही दिली आहे.
शुक्रवारी ट्रम्प यांनी स्पष्टपणे म्हटले की, “स्पेनने इतर देशांप्रमाणेच खर्च करावाच लागेल,” आणि माद्रिदचा “संरक्षण खर्च कमी ठेवण्याबाबत कुप्रसिद्ध” इतिहास असल्याचेही सांगितले.
मात्र, ट्रम्प यांनी हेही सूचित केले की, अमेरिकेने युरोपचे दीर्घकाळ संरक्षण करण्यासाठी भरपूर खर्च केला असल्यामुळे, नवीन उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असू नये. NATO च्या माहितीनुसार, वॉशिंग्टनने 2024 मध्ये आपल्या GDP च्या सुमारे 3.19% संरक्षणावर खर्च केला होता.
सांचेझ यांनी मात्र ठामपणे सांगितले की, स्पेनसाठी हे उद्दिष्ट पूर्ण करणे आवश्यक नाही, कारण ते करण्यासाठी राज्य निवृत्तिवेतन योजनेमध्ये कपात किंवा करवाढ करावी लागेल, जे स्पेनसाठी योग्य नाही.
भाषा बदलामुळे स्पेनला तडजोड शक्य
NATO च्या अंतिम निवेदनाचा मसुदा अद्याप अधिकृत जाहीर करण्यात आलेला नाही, परंतु त्यात ‘we commit’ ऐवजी ‘allies commit’ असा भाषा बदल केल्यामुळे, स्पेनने हा निर्णय आपल्यावर बंधनकारक नाही असे घोषित केले.
मार्क रुटे यांनी, सांचेझ यांना लिहिलेल्या पत्रात सांगितले की, “स्पेनला स्वतःचा सार्वभौम मार्ग ठरवण्याची लवचिकता असेल”, ज्याद्वारे ते NATO चे लष्करी क्षमता उद्दिष्ट पूर्ण करू शकतील.
एका NATO मुत्सद्दीने सांगितले की, “हे पत्र केवळ याची पुनःपुष्टी आहे की प्रत्येक देशाला स्वतःचा मार्ग ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे”
तथापि, काही NATO अधिकारी शंका व्यक्त करतात की, स्पेन केवळ 2.1% खर्चात सर्व लष्करी क्षमता उद्दिष्टे पूर्ण करू शकेल का. ही उद्दिष्टे गोपनीय आहेत, त्यामुळे त्यांचा स्वतंत्रपणे तपास करता येत नाही.
डेडलाइन पुढे ढकलली
NATO च्या तडजोडीनुसार, सर्व देशांनी नव्या संरक्षण गुंतवणूक योजनेला मान्यता दिली आहे, असे एका मुत्सद्दीने सांगितले.
मूळ प्रस्तावानुसार, 2032 पर्यंत हे उद्दिष्ट गाठणे अपेक्षित होते, पण आता ही डेडलाइन 2035 पर्यंत पुढे ढकलण्यात आली असून, 2029 मध्ये याचा पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल.
($1 डॉलर = 0.8679 युरो)
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)