रशियाने शुक्रवारी पहाटे, युक्रेनची राजधानी कीववर केलेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्यात, किमान 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती, युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली. हल्ल्यात ड्रोन्सचा देखील मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला, ज्याच्या स्फोटांचे आवाज त्या रात्री देशभरात घुमत होते.
हा हल्ला, रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांच्या मार्फत दिलेल्या गेलेल्या इशाऱ्यात, युक्रेनने रशियात आतपर्यंत जाऊन ड्रोन हल्ले केले, ज्यात रशियाची सामरिक बॉम्बविमाने उद्ध्वस्त केली गेली, या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाईल असे क्रेमलिनकडून सांगण्यात आले होते.
ऊर्जाव्यवस्थेचे नुकसान
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी सांगितले की, “कीव्हवर झालेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये तीन आपत्कालीन सेवा कर्मचारी ठार झाले.”
उत्तरेकडील चेर्निहीव्ह शहरात दोन मृत्यू झाले, तर उत्तर-पश्चिमेकडील लुत्स्क शहरात किमान एकजण मरण पावला.
“कीवमध्ये मृत्यू झालेले कर्मचारी पहिल्या हल्ल्यानंतर घटनास्थळी पोहोचले होते, परंतु दुर्दैवाने दुसऱ्या रशियन हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला,” असे झेलेन्स्की यांनी व्हिडिओ संदेशात सांगितले.
परराष्ट्रमंत्री अँद्री सिबिहा यांनी, X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले की, “रशियाने आपली विमाने उद्ध्वस्त झाल्यानंतर, युक्रेनमधील नागरिकांवर हल्ला करून ‘प्रत्युत्तर’ दिले आहे. या हल्ल्यांत बहुमजली इमारतींचे तसेच ऊर्जा पायाभूत सुविधांचे नुकसान झाले.”
पुतिन यांना आयते कारण
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, “रशियन सैन्याने युक्रेनच्या ‘दहशतवादी कारवायां’ना प्रत्युत्तर म्हणून सैन्य आणि सैन्यसंबंधित लक्ष्यांवर हल्ला केला.”
“त्यांनी पुतिन यांना मोठ्या प्रमाणावर बॉम्बहल्ले करण्याचे कारण दिले,” असे ट्रम्प यांन, एअरफोर्स वनवर पत्रकारांशी बोलताना सांगितले, जेव्हा युक्रेनच्या आधीच्या ड्रोन हल्ल्यांनी संघर्षावर कसा परिणाम केला, हे त्यांना विचारण्यात आले.
झेलेन्स्की यांनी सांगितले की, “या हल्ल्यांमध्ये संपूर्ण देशभरात 80 लोक जखमी झाले असून काहीजण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे.”
चेर्निहीव्हमध्ये राष्ट्रीय आपत्कालीन सेवांनी सांगितले की, एका उद्ध्वस्त औद्योगिक इमारतीच्या ढिगाऱ्यातून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले.
लुत्स्कमध्ये, एका इमारतीच्या अवशेषांमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडला असून, त्याची पत्नी अद्याप सापडलेली नाही. शहरातील शाळा आणि सरकारी इमारतींवरही हल्ला झाला असून, यात 30 लोक जखमी झाले आहेत.
‘रशियन सैन्याने पाश्चिमात्य शहर टर्नोपिलमध्ये, औद्योगिक सुविधा आणि पायाभूत रचनांना लक्ष्य केले, ज्यामुळे शहराच्या काही भागातील वीजपुरपवठा ठप्प झाला,’ अशी माहिती महापौर सेर्ही नाडाल यांनी दिली.
407 ड्रोन्स, 45 क्षेपणास्त्रांचा वापर
क्षेत्रीय प्रशासनाने सांगितले की, या हल्ल्यात 10 लोक जखमी झाले असून, आगीमुळे हवेत विषारी पदार्थांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांनी घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.
हवाई दलाने सांगितले की, रशियाने या हल्ल्यात 407 ड्रोन्स वापरले, जी आजवरच्या एका हल्ल्यातील सर्वाधिक संख्या आहे. तसेच रशियाकडून 45 क्रूझ क्षेपणास्त्रही डागण्यात आली.
कीवच्या वाहतूक प्रणालीवर परिणाम
रशियन हल्ल्यात, मेट्रो ट्रॅकचे नुकसान झाल्यामुळे कीव्हची मेट्रो सेवा विस्कळीत झाली. रेल्वे कंपनीनेही शहराबाहेर रेल्वे मार्गांवर झालेल्या नुकसानीमुळे काही गाड्या वळविल्या आहेत.
रॉयटर्सच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोट इतके प्रचंड होते की खूप दूरवरच्या इमारतींच्या खिडक्या हादरल्या.
कीवमधील काही रहिवाशांनी मेट्रो स्टेशनमध्ये किंवा पार्किंगमध्ये आश्रय घेतला.
कीवच्या सोलोमियान्स्की जिल्ह्यात, एका इमारतीच्या भिंतीवर ड्रोन आदळल्याने मोठी भगदाड पडले व आगीचे डाग दिसून आले. खाली उभ्या असलेल्या गाड्यांवर सिमेंटचे तुकडे कोसळले. पोलिस तपासक ड्रोनचा इंजिनसदृश भाग तपासत होते.
हल्ल्याच्या आधी, रॉयटर्सच्या पत्रकारांनी आकाशात रशियन ‘कामिकाझे’ ड्रोनचा आवाज ऐकला, तसेच युक्रेनच्या अँटी-एअरक्राफ्ट तोफा firing करत असल्याचेही ऐकले.
निर्णय घेणे आवश्यक
झेलेन्स्की यांनी रशियावर एकत्रित दबाव टाकण्याचे आवाहन केले. “जो कोणी दबाव टाकत नाही आणि युद्धाला अधिक वेळ देत आहे, तो या युद्धामध्ये सहभागी आहे आणि त्यासाठी जबाबदार आहे. आपल्याला निर्णायक पावले उचलावीच लागतील,” असे त्यांनी X वर लिहिले.
युक्रेनियन सैन्याने सांगितले की, त्यांनी रात्रीच्या सुमारास रशियातील सारातोव आणि र्याझान प्रांतातील एंगेल्स आणि डायगिलेवो हवाई तळांवर पूर्व-हल्ला केला. तसेच किमान तीन इंधन साठवणूक केंद्रांवरही हल्ला केला.
तीन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धातील, सर्वात धाडसी कारवायांपैकी एका कारवाईत, युक्रेनच्या गुप्तहेरांनी गेल्या आठवड्यात लाकडी शेडमध्ये लपवून ठेवलेले क्वाड्रोकॉप्टर ड्रोन वापरून रशियाची सामरिक बॉम्बविमाने जमिनीवर नष्ट केली.
बुधवारी, पुतिन यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्यानंतर ट्रम्प यांनी सांगितले की, “रशियन हवाई तळांवरील युक्रेनच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी क्रेमलिनकडून एखादी प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.”
(रॉयटर्सच्या माहितीच्या आधारे)