कर्करोगाशी झुंज देत असलेल्या केट मिडलटन यांच्या तब्येतीत सुधारणा

0
केट
केट मिडलटन (द प्रिन्स अँड प्रिन्सेस ऑफ वेल्सच्या अधिकृत हँडलवरून)

ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स विल्यम यांच्या पत्नी प्रिंसेस ऑफ वेल्स केट मिडलटन कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अलीकडेच, त्यांच्या प्रकृतीमुळे कदाचित शाही कर्तव्यांसाठी त्या परत येऊ शकणार नाही, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, राजकुमारीने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आपली केमोथेरपी सुरू आहे, ज्यामुळे प्रकृती सुधारत आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे असे केट यांनी जाहीर केले होते. आता आपल्या प्रकृतीबद्दल एक नवीन माहिती त्यांनी दिली आहे. द प्रिन्स अँड प्रिन्सेस ऑफ वेल्सच्या अधिकृत हँडलद्वारे एक्सवर शेअर केलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले की आपली प्रकृती सुधारत आहे. ‘मी उपचार घेत आहे. तो आणखी काही महिने सुरू राहील.” केट मिडलटन यांच्या या पोस्टवर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “कर्करोगाशी झुंज देत असलेल्यांसाठी किंवा त्यांच्या कुटुंबियांसाठी राजकुमारींचा संदेश विशेष करून प्रेरणादायी आहे,” अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली आहे.

वेल्सच्या राजकुमारीने सांगितले की आपली प्रकृती सुधारत आहे. मात्र प्रकृतीला असलेला धोका पूर्णपणे कळलेला नाही.  आरोग्यविषयक या प्रवासात चांगले –  वाईट दिवस आल्याचेही त्यांनी धैर्याने मान्य केले. त्या म्हणाल्या  की वाईट दिवसांत तुम्हाला अशक्तपणा, थकवा जाणवतो. तुम्हाला विश्रांतीची गरज असते. पण चांगल्या दिवशी तुम्हाला सामर्थ्यवान वाटते. तुम्हाला बरे वाटत असल्याचा पूर्ण फायदा घ्यायचा असतो.

राजाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित होणाऱ्या संचलनात कुटुंबासमवेत उपस्थित राहण्यास आपण उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले. पोस्टच्या शेवटी त्यांनी लिहिले, “तुम्ही सातत्याने मला समजून घेतले त्यासाठी आणि ज्यांनी धैर्याने त्यांच्या कथा माझ्याबरोबर शेअर केल्या त्या सर्वांचे खूप आभार.”

पंतप्रधान सुनक यांनी एक्सवर त्यावर प्रतिक्रिया देताना लिहिले, “वेल्सच्या राजकुमारींचा संदेश विशेषत्वाने कर्करोगाशी झुंज देत असलेल्या लोकांसाठी किंवा त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रेरणादायी आहे. ते त्यांच्या संघर्षाचा शोध राजकुमारींच्या शब्दात घेण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांच्या सामर्थ्यातून आशा आणि प्रेरणा घेतील. मला माहीत आहे की संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे.”

खरंतर केट मिडलटन यांना ओटीपोटावरील शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या शस्त्रक्रियेदरम्यानच त्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले. मार्चमध्ये, केट मिडलटन यांनी एक सार्वजनिक निवेदनाद्वारे जाहीर केले की त्या कर्करोगावर उपचार घेत असून जोपर्यंत प्रकृती सुधारत नाही तोपर्यंत आपण सार्वजनिक जबाबदाऱ्यांपासून दूर राहणार आहे.

केट मिडलटन यांनी नंतर एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केला होता, “मी चांगली आहे आणि दररोज मजबूत होत आहे. केट म्हणाल्या होत्या, “शस्त्रक्रियेतून बरे होत असताना तुम्ही सगळ्यांनी दिलेला पाठिंबा आणि प्रेमपूर्वक संदेशांबद्दल मला तुमचे वैयक्तिक आभार मानायचे आहेत. हे दोन महिने आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अविश्वसनीयरित्या कठीण होते. “माझ्याकडे एक उत्तम वैद्यकीय पथक आहे ज्यांनी माझी भरपूर काळजी घेतली आहे. यासाठी मी वैद्यकीय चमूची खूप आभारी आहे.”

केट मिडलटनन यांनी आपल्या या आजारपणाचा कल्पना अपल्या मुलांना देताना सांगितले होते की ती कर्करोगाशी झुंज देत आहे. “आमची मुले जॉर्ज, शार्लोट आणि लुई यांना सर्व काही समजावून सांगण्यास आम्हाला बराच वेळ लागला. आम्हाला मुलांना अशा प्रकारे सांगावे लागले की या सगळ्याचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही. आपण लवकरच बऱ्या होणार आहोत असे वचन त्यांनी मुलांना दिले आहे.

आराधना जोशी
(रॉयटर्स इनपुट्ससह)


+ posts
Previous articleChina’s Li Visits Fonterra, New Zealand
Next articleNeed For Assured Credible Deterrence To Prevent Kargil 2.0

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here