हार्बिन शहरातील चिनी पोलिसांनी, फेब्रुवारीमध्ये झालेल्या आशियाई हिवाळी खेळांदरम्यान प्रमुख क्षेत्रांना लक्ष्य करून ‘प्रगत’ सायबर हल्ले केल्याबद्दल, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेला (NSA) जबाबदार धरले आहे.
मंगळवारी राज्य वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी तीन कथित NSA एजंट्सना वॉन्टेड यादीत समाविष्ट केले असून, तपासानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि व्हर्जिनिया टेकवरही हल्ल्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला आहे.
शिन्हुआने वॉन्टेड घोषित केलेल्या NSA एजंट्सची नावे, कॅथरीन ए. विल्सन, रॉबर्ट जे. स्नेलिंग आणि स्टीफन डब्ल्यू. जॉन्सन अशी आहेत. या तिघांनी “चीनच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर वारंवार सायबर हल्ले केले आहेत आणि Huawei [RIC:RIC:HWT.UL] आणि इतर उद्योगांवरील सायबर हल्ल्यांमध्ये भाग घेतला आहे” असे तपासादरम्यान आढळून आले आहे.
दोन्ही अमेरिकन विद्यापीठे प्रत्यक्षात यामध्ये कशी सहभागी होती, हे मात्र अद्याप स्पष्ट केलेले नाही.
चीनमधील अमेरिकन दूतावासाने, यावर कोणताही त्वरित प्रतिसाद दिलेला नाही.
जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था अमेरिका आणि चीन, सध्या व्यापार युद्धात अधिक खोल अडकल्या आहेत, ज्यामुळे अमेरिकेत जाणाऱ्या चिनी पर्यटकांना प्रवासी इशारे देण्यात आले आहेत आणि चीनमध्ये अमेरिकन चित्रपटांची आयात देखील थांबवण्यात आली आहे.
“अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने (NSA) हेइलोंगजियांग प्रांतातील ऊर्जा, वाहतूक, जलसंधारण, दळणवळण आणि राष्ट्रीय संरक्षण संशोधन संस्थांसारख्या महत्त्वाच्या उद्योगांवर सायबर हल्ले सुरू केले आहेत,” असे हार्बिन शहराच्या सार्वजनिक सुरक्षा ब्युरोचा हवाला देत, शिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
“चीनच्या महत्त्वाच्या माहिती पायाभूत सुविधांमध्ये व्यत्यय आणणे, सामाजिक व्यवस्था बिघडवणे आणि महत्त्वाची गोपनीय माहिती चोरणे हा या हल्ल्यांमागील उद्देश होता,” असे त्यांचे म्हणणे आहे.
अनामिक सर्व्हरद्वारे सायबर हल्ले
शिन्हुआ वृत्तसंस्थेनुसार, NSA च्या ऑपरेशन्स दरम्यान, जी हिवाळी क्रीडा स्पर्धांच्या वेळी झाली होती, त्यावेळी विशिष्ट उपकरणांवर Microsoft Windows ऑपरेटिंग सिस्टीममध्ये आधीपासून बसवलेल्या “बॅकडोअर्स” सक्रिय करण्यात आले, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ही उपकरणे हिलॉन्गजियांग प्रांतात असल्याचे सांगण्यात आले.
NSA ने आपले ठसे पुसण्यासाठी, जगभरातील अनेक देशांमधील IP ऍड्रेस विकत घेतले आणि युरोप व आशियात मोठ्या प्रमाणात नेटवर्क सर्व्हर “अज्ञातपणे” भाड्याने घेतले, असेही शिन्हुआने म्हटले आहे.
स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचा वैयक्तिक डेटा चोरणे, हा NSA चा उद्देश होता आणि हे सायबर हल्ले फेब्रुवारी 3 रोजी पहिल्या आइस हॉकी सामन्यापासून विशेषतः तीव्र झाले, असा दावा शिन्हुआने केला आहे आहे.
या हल्ल्यांनी Asian Winter Games च्या नोंदणी व्यवस्थेसारख्या माहिती प्रणालींना लक्ष्य केले, ज्या प्रणालींमध्ये स्पर्धेशी संबंधित कर्मचाऱ्यांची “संवेदनशील माहिती” साठवली होती.
अमेरिका नेहमीच चीनवर आरोप करत असते की, तेथील सरकारी पाठबळ असलेल्या हॅकर्सनी अमेरिकेच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर आणि सरकारी संस्थांवर सायबर हल्ले केले आहेत.
गेल्या महिन्यातच, वॉशिंग्टनने कथित चिनी हॅकर्सविरोधात आरोपपत्र सादर केले, ज्यामध्ये हॅकर्सनी अमेरिकेच्या Defence Intelligence Agency, Commerce Department तसेच तैवान, दक्षिण कोरिया, भारत आणि इंडोनेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयांना लक्ष्य केल्याचा आरोप आहे.
परंतु बीजिंगने हे सर्व आरोप सातत्याने फेटाळले असून, परदेशातील कोणत्याही सायबर गुप्तहेरगिरीमधला आपला सहभाग नाकारला आहे.
गेल्या काही वर्षांत, पाश्चिमात्य देशांकडून वारंवार सायबर हल्ले आणि औद्योगिक हेरगिरीचे आरोप सहन केल्यानंतर, मागील दोन वर्षांत चीनमधील अनेक संस्था आणि सरकारी विभागांनी अमेरिकेवर आणि त्यांच्या सहयोगी देशांवर अशाच प्रकारच्या वागणुकीचे आरोप सुरू केले आहेत.
डिसेंबरमध्ये चीनने असा दावा केला होता की, 2023 च्या मे महिन्यापासून दोन वेगवेगळे अमेरिकन सायबर हल्ले त्यांनी उघड केले आहे आणि त्यांच्यावर कारवाई देखील केली. हे हल्ले चीनी तंत्रज्ञान कंपन्यांकडून औद्योगिक गुपिते चोरण्यासाठी करण्यात आले होते, मात्र त्या हल्ल्यांमागे नेमकी कोणती अमेरिकी संस्था होती त्यावेळी, हे सांगितले गेले नव्हते.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)