रशियाने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरून, कीववर रात्री मोठा हल्ला केला, ज्यामध्ये किमान 10 लोकांचा मृत्यू झाला. हा यावर्षी युक्रेनच्या राजधानीवर झालेला सर्वात मोठा हल्ला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांनी, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, थेट रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना “व्लादिमीर, STOP” अशी विनंती करत, जाहिररीत्या फटकारले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले की, “हा हल्ला गरजेचा नव्हता आणि अत्यंत चुकीच्या वेळेस तो करण्यात आला, कारण सध्या सगळे शांततेसाठी प्रयत्न करत आहोत.”
“या हल्ल्यात 90 लोक जखमी झाले, अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आणि अनेक भागात आगी लागल्या,” असे यूक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 12 तासांहून अधिक काळ उलटूनही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले होते.
हा हल्ला युक्रेनमधील रशियाच्या युद्धाच्या अत्यंत संवेदनशील टप्प्यावर झाला आहे. कीव आणि मॉस्को दोघेही ट्रम्प यांना दाखवू पाहत आहेत, की ते त्यांच्या जलद शांतता कराराच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करत आहेत.
“कीववरील रशियन हल्ल्यांचा मी निषेध करतो. याची गरज नव्हती आणि वेळही चुकीची होती. व्लादिमीर, थांबा! आठवड्याला 5 हजार सैनिक मरत आहेत. आपण शांततेचा करार पूर्ण करू या!” असे ट्रम्प यांनी Truth Social वर लिहिले.
याबाबत व्हाईट हाउसने इशारा दिला आहे की, “जर लवकरच अपेक्षित प्रगती झाली नाही, तर ते आपले मध्यस्थीचे प्रयत्न थांबवतील.” बुधवारी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना फटकारले, कारण त्यांनी पुन्हा एकदा सांगितले की, “कीव कधीच रशियाच्या क्रिमिया वरील ताब्याला मान्यता देणार नाही.”
ट्रम्प यांनी पुतिन यांच्याबद्दलच्या वक्तव्यात झेलेन्स्कींपेक्षा सौम्य भाषा वापरली आहे. झेलेन्स्की यांना त्यांनी एका वेळेस “हुकूमशहा” असेही म्हटले होते. ‘ट्रम्प यांचे विशेष दूत शुक्रवारी पुतिन यांची भेट घेणार आहेत,’ असे एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले.
झेलेन्स्की यांनी, गुरुवारी दक्षिण आफ्रिकेतील पत्रकार परिषदेत सांगितले की, “बुधवारी लंडनमध्ये यूक्रेन आणि पाश्चिमात्य अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेतून तयार झालेला दस्ताऐवज आता ट्रम्प यांच्या टेबलावर आहे.”
“आमच्या मूल्यांशी किंवा घटनेशी विसंगत असलेले कोणतेही मुद्दे कोणत्याही करारात समाविष्ट होऊ शकत नाहीत.”
कीवमध्ये झालेल्या रशियन हल्ल्यानंतर, झेलेन्स्की यांनी गुरुवारी दक्षिण आफ्रिकेचा आपला दौरा अर्धवट सोडला. त्यांनी सांगितले की, “वॉशिंग्टनकडून रशियावर तीव्र दबाव असल्याची चिन्हे दिसत नाहीत.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)