गुरुवारी चीनने अमेरिकेला सर्व “एकतर्फी” शुल्क (Tariff) रद्द करण्याचे आवाहन केले, कारण असे संकेत मिळाले आहेत की, ट्रम्प प्रशासन बीजिंगसोबत सुरू असलेल्या व्यापार युद्धातील (Trade War) तणाव कमी करण्यासाठी काही पावले उचलू शकते.
चीनने स्पष्ट केले की, ‘अमेरिकेच्या सरकारकडून वारंवार चर्चेच्या दाव्यांनंतरही बीजिंगने वॉशिंग्टनसोबत कोणतीही व्यापार चर्चा केलेली नाही.’
‘अमेरिकेचा चीनसोबत करार होणारच,’ असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकवेळा सांगितले आहे. बुधवारी त्यांनी सांगितले की, “दोन्ही देशांमध्ये थेट संपर्क झाला आहे.” ट्रम्प यांनी त्यांच्या शुल्कांना “परस्पर” (reciprocal) असे म्हणत त्याचे समर्थन केले असून, ‘या शुल्कांचा उद्देश अमेरिकेच्या विरोधात असलेल्या अन्यायकारक व्यापार तफावतीचे समाधान करणे आहे,’ असे त्यांचे म्हणणे आहे.
“जर अमेरिकेला खरोखर व्यापार वाद सोडवायचा असेल, तर त्यांनी सर्व एकतर्फी शुल्क हटवावीत,” असे चीनच्या वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते हे यादोंग यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
“याची सुरुवात ज्या व्यक्तीने वाजवली, तिनेच त्याची समाप्ती केली पाहिजे,” असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.
अमेरिकेचा शुल्क कमी करण्याचा विचार
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासन सध्या चिनी वस्तूंवर लावण्यात आलेले 145% पर्यंतचे शुल्क कमी करून, ते 50% ते 65% दरम्यान आणण्याचा विचार करत आहे, हे निर्णय बीजिंगसोबत होणाऱ्या चर्चांवर अवलंबून असतील.
चीनच्या हे यादोंग यांनी अमेरिकेला आवाहन केले की, ‘त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायातील आणि देशांतर्गत पक्षांतील “Rational voices”कडे लक्ष द्यावे.’
“चीन आणि अमेरिका यांनी शुल्कांवर कोणत्याही प्रकारची सल्लामसलत किंवा चर्चा केलेली नाही, करार तर दूरची गोष्ट,” अशी प्रतिक्रीया परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी दुसऱ्या एका पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केली. त्यांनी अशा बातम्यांना “खोट्या बातम्या” असे संबोधले.
चिनी गुंतवणुकीवर परिणाम
‘चीनने बुधवारी एका बैठकीचे आयोजन केले, ज्यामध्ये 80 हून अधिक परदेशी कंपन्या आणि उद्योग संघटनांनी अमेरिकेच्या शुल्कांचा त्यांच्या चीनमधील गुंतवणुकीवर आणि व्यवसायावर होणाऱ्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली,’ असे वाणिज्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
“विदेशी कंपन्यांनी या संकटांचे संधीमध्ये रूपांतरित करावे,” असे उप वाणिज्यमंत्री लिंग जी यांनी बैठकीत सांगितले आणि त्यांनी परदेशी कंपन्यांच्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले.
वॉशिंग्टन डी.सी. मध्ये, चीनचे केंद्रीय बँक गव्हर्नर पान गोंगशेंग यांनी IMF-World Bank च्या वसंत ऋतूतील बैठकांच्या अनुषंगाने, G20 बैठकीत सांगितले की, “चीन मुक्त व्यापार नियम आणि बहुपक्षीय व्यापार प्रणालीला ठामपणे पाठिंबा देईल.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)