तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा, त्यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त या आठवड्यात होणाऱ्या तीन दिवसीय बौद्ध धार्मिक नेत्यांच्या बैठकीला संबोधित करणार आहेत. यानिमित्ताने अनुयायांना त्यांच्या उत्तराधिकाऱ्याविषयी काही माहिती मिळेल, अशी अपेक्षा आहे. ही घडामोड चीनसाठी अस्वस्थ करणारी ठरू शकते, त्यामुळे चीन यावर बारीक नजर ठेवून आहे.
1959 मध्ये, चिनी राजवटीविरुद्ध झालेल्या अयशस्वी उठावानंतर, तिबेटमधून पळून गेलेल्या दलाई लामा यांना बीजिंग फुटीरतावादी मानते आणि त्यांचा उत्तराधिकारी निवडेल असे म्हणते. दलाई लामा म्हणाले आहेत की, “त्यांचा उत्तराधिकारी चीनच्या बाहेर जन्माला येईल आणि त्यांनी त्यांच्या अनुयायांना बीजिंगने निवडलेल्या कोणालाही नाकारण्याचे आवाहन केले आहे.”
तिबेटी बौद्ध परंपरेनुसार, प्रबुद्ध भिक्षूंनी आपले आध्यात्मिक वारसत्व पुढे नेण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा, असा विश्वास आहे. 14वे दलाई लामा, रविवारी 90 वर्षांचे होत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “ते वरिष्ठ भिक्षू आणि इतरांसोबत सल्लामसलत करून, मृत्यूनंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध कुठे घेता येईल, याबाबत काही संकेत देतील, तो मुलगा असो किंवा मुलगी.”
“आपण दलाई लामांच्या संस्थेची सातत्याने सुरू ठेवण्याबाबत काही चौकट मांडू शकतो,” असे त्यांनी म्हटले, मात्र या चौकटीविषयी सविस्तर माहिती दिली नाही.
दलाई लामा यांनी यापूर्वी सूचित केले होते की, त्यांचा पुनर्जन्म भारतात होऊ शकतो, जिथे ते सध्या हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या धर्मशाळा जवळ निर्वासित म्हणून राहत आहेत.
धर्मशालेतील तिबेटी निर्वासित संसदेमध्ये उपसभापती असलेल्या, डोल्मा त्सेरिंग टेयखांग यांनी सांगितले की, “जगाने ही गोष्ट थेट दलाई लामांकडून ऐकणे गरजेचे आहे कारण चीन त्यांना प्रत्येक संधीवर बदनाम करत असून, दलाई लामांचा पुनर्जन्म कसा घ्यायचा याबाबत नियम तयार करत आहे.”
“चीन या संस्थेचा वापर राजकीय हेतूसाठी करण्याचा प्रयत्न करत आहे,” असेही त्यांनी सांगितले.
“दलाई लामा यांचा पुनर्जन्म फक्त तिबेटच्या वेगळ्या संस्कृती, धर्म आणि राष्ट्र म्हणून अस्तित्व टिकवण्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीच्या हितासाठीही आवश्यक आहे.”
तिबेटचे मुख्य राज्यीय भविष्यवक्ते थुप्टेन न्गोडुप यांनी सांगितले की, “सामान्यतः पुनर्जन्मावर चर्चा एखादा भिक्षू जिवंत असताना केली जात नाही, मात्र परिस्थिती वेगळी आहे कारण चीन सरकार हस्तक्षेप करत आहे.”
बीजिंगने मार्चमध्ये म्हटले होते की, “दलाई लामा हे राजकीय निर्वासित असून त्यांना तिबेटी जनतेचे प्रतिनिधित्व करण्याचा कोणताही अधिकार नाही.” चीनने असा प्रस्ताव दिला आहे की, जर दलाई लामा तिबेट आणि तैवान हे चीनचे अविभाज्य भाग मान्य करतील, तर त्यांच्या भविष्यावर चर्चा होऊ शकते. मात्र तिबेटी निर्वासित सरकारने तो प्रस्ताव नाकारला आहे.
या आठवड्यात होणारी धार्मिक परिषद, 2019 नंतर प्रथमच आयोजित केली जात आहे. यात 100 हून अधिक तिबेटी बौद्ध नेते सहभागी होणार असून, दलाई लामा यांचा व्हिडिओ संदेशही प्रसारित केला जाईल.
हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेअर, जे तिबेटी बौद्ध धर्माचे दीर्घकालीन अनुयायी आहेत, हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असे आयोजकांनी सांगितले आहे.
दलाई लामा ५ जुलै रोजी तिबेटी निर्वासित सरकारद्वारे आयोजित प्रार्थनांमध्ये सहभागी होतील आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हजेरी लावतील. त्यांच्या कार्यक्रमानुसार, ते सुमारे अर्धा तास भाषण करतील. भारताचे संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू आणि काही इतर भारतीय अधिकारीही उपस्थित राहतील.
मागील वर्षी यू.एस. मध्ये गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर तिबेटी अनुयायी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहेत. मात्र, डिसेंबरमध्ये दलाई लामांनी रॉयटर्सला सांगितले होते की, ते 110 वर्षांपर्यंत जगू शकतात.
दलाई लामा आणि तिबेटी अधिकारी म्हणतात की, त्यांच्या मृत्यूनंतर सरकारचे कार्य सुरू राहण्यासाठी एक व्यवस्था अस्तित्वात आहे. दरम्यान, ‘गदेन फोड्रांग फाउंडेशन’चे अधिकारी- पुढील दलाई लामांचा शोध घेतील आणि त्यांची ओळख पटवतील.
सध्या अस्तित्वात असलेल्या या फाउंडेशनची स्थापना, दलाई लामांनी 2015 मध्ये केली होती. त्याचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या विश्वासू सहाय्यकांपैकी आहेत.
टेयखांग आणि इतर तिबेटी अधिकाऱ्यांनी सांगितले की, 2011 मध्ये त्यांनी राजकीय नेतृत्व लोकनिर्वाचित सरकारकडे सोपवले, तेव्हापासून दलाई लामा तिबेटी जनतेला त्यांच्या अनुपस्थितीसाठी मानसिक तयारी करून देत आहेत. यामुळे 368 वर्षांची धार्मिक आणि राजकीय नेतृत्वाची परंपरा संपली.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)