रविवारी, बांगलादेश सरकारने कर आणि सीमाशुल्क अधिकाऱ्यांना, तात्काळ कामावर परतण्याचा आणि दोन दिवसांपासून सुरु असलेला देशव्यापी संप थांबवण्याचा आदेश दिला. या संपामुळे कर संकलनात अडथळा निर्माण झाला होता आणि देशाच्या प्रमुख व्यापारद्वार असलेल्या चिटगाव बंदरावरील कामकाज विस्कळीत झाले होते.
“अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ कामावर परतले पाहिजेत आणि राष्ट्रीय हिताला धोका पोहोचवणाऱ्या कोणत्याही कृतीपासून दूर राहिले पाहिजे. अन्यथा, लोकांचे आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी सरकारला कठोर पावले उचलावी लागतील,” असे सरकारच्या निवेदनात नमूद केले आहे. मात्र, या कठोर उपायांबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.
मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आयात-निर्यात व्यवहार अखंड सुरू राहणे अत्यावश्यक आहे जेणेकरून देशाची अर्थव्यवस्था सुरक्षित राहील.’ ‘राष्ट्रीय महसूल मंडळातील (NBR) सर्व नोकऱ्या अत्यावश्यक सेवांमध्ये मोडतात,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
कर अधिकाऱ्यांचा विरोध
12 मे रोजी, सरकारने एक आदेश काढत, NBR बरखास्त करून नवीन महसूल विभागांची निर्मिती केली. सरकारने सांगितले की, महसूल संकलनात सुधारणा करणे, प्रक्रियेत सुसूत्रता आणणे, कामांची पुनरावृत्ती कमी करणे आणि कार्यक्षमतेत वाढ करणे हे या बदलांचे उद्दिष्ट आहे.
मात्र, अनेक अधिकाऱ्यांना या नव्या रचनेमुळे, नोकरीच्या असुरक्षिततेची आणि संस्थात्मक स्वायत्ततेच्या गमावण्याची भीती वाटत आहे. ते नवीन रचनेत सुधारणा आणि NBR अध्यक्षाच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. आपल्या मागण्यांसाठी त्यांनी शनिवारी संपूर्ण देशभरात कामकाज बंद आंदोलन सुरू केले.
व्यवसायिक नेत्यांनी या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी इशारा दिला की, जर ही अडचण दीर्घकाळ टिकली तर पुरवठा साखळी खंडित होईल, महसूल संकलन घटेल आणि आधीच आर्थिक दबावाखाली असलेल्या गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासाला आणखी धक्का बसेल.
विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनांनंतर, माजी पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात पलायन करावे लागले, त्यानंतर सत्तेत आलेल्या मोहम्मद युनूस यांच्या सरकारविरुद्ध अलीकडच्या काळात नाराजी वाढत चालली आहे.
कामकाज पुन्हा सुरू
नवीन मीडिया अहवालानुसार, जवळपास 48 तास सुरु असलेला संप मिटल्यानंतर, चिटगाव बंदरावरील सर्व कामकाज सोमवारी पुन्हा सुरू झाले आहे. या संपामुळे आयात आणि निर्यात व्यवहारांमध्ये अडथळे निर्माण झाले होते.
NBR रिफॉर्म युनिटी कौन्सिलच्या सचिव आणि संयुक्त कर आयुक्त सेहेला सिद्दीका यांनी सांगितले की, ‘चिटगाव बंदरासह देशभरातील सर्व बंदरांवरील कामकाज आता पूर्वपदावर आले आहे.’
“देशातील सर्व बंदरे आता पूर्णपणे कार्यरत आहेत,” असे सिद्दीका यांनी सांगितले आणि सर्व कर्मचारी कामावर हजर झाले असल्याचेही स्पष्ट केले.
टीम स्ट्र्रॅटन्यूज
(रॉयटर्स आणि IBNS च्या इनपुटसह)